दास,जगन्नाथ प्रसाद : (२६ एप्रिल १९३६). भारतीय साहित्यातील ओडिया भाषेतील कवी.ओडिया भाषेतील काव्याला नाविन्यता, तंत्रशुध्दता आणि काव्याकडे पाहण्याचा नवा आयाम देणारे ज्येष्ठ कवी म्हणून त्यांची ओळख आहे. सौंदर्यभाव आणि आनंदभाव यांच्या अभिजात संमिश्रनामुळे दास यांच्या कविता वाचकप्रिय झाल्या आहेत. कवितेशिवाय कथा, कादंबरी, नाट्य या साहित्यप्रकारातही त्यांनी लेखन केले आहे. मानवी जीवनाचे आणि त्याच्या अस्तित्वाचे विविध पैलू त्यांच्या लिखाणातून प्रकट होतात.
त्यांचा जन्म ओदिशातील पूरी जिल्हयातील बानपूर या खेडेगावात झाला. आई इंदूदेवी तर वडील श्रीधरदास. श्रीधरदास एक नामांकीत लेखक आणि प्राध्यापक होते.नोकरी निमित्त श्रीधरदास कटक येथे आले. त्यामुळे जे.पी. दास यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण रावनेशा महाविद्यालय कटक येथून झाले. पुढील शिक्षणासाठी ते अलाहाबाद येथे गेले. राज्यशास्त्र विषयात एम.ए. ही पदवी त्यांनी प्राप्त केली (१९५७). पुढे भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची निवड झाली (१९५८). ओदिशा सरकार आणि भारत सरकारच्या वाहतूक, बांधकाम,उद्योग, अर्थ आणि वाणिज्य विभागात त्यांनी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्य केले. प्रशासकीय सेवा सुरु असतानाच लोकप्रशासन विषयात एम.फील. पदवी त्यांनी प्राप्त केली (१९७६), नंतर कला आणि इतिहास विषय घेऊन पीएच.डी. ही पदवी त्यांनी प्राप्त केली. १९८४ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर दिल्ली हेच कार्यक्षेत्र निवडून स्वत: ला सृजनशील व संशोधनात्मक लेखनासाठी त्यांनी वाहून घेतले.
वयाच्या १३ व्या वर्षीच शालेय जीवनात त्यांची पहिली कविता कुमकुम या प्रसिध्द ओडिया भाषेतील नियतकालिकात प्रसिद्ध झाली (१९४९). स्तबक हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह (१९५१). त्यानंतर त्यांनी विपुल असे ओडिया भाषेतून लेखन केले आहे, ते पुढीलप्रमाणे : कवितासंग्रह – प्रथम पुरुषा (१९७१),अन्या साबू माटयूं (१९७६),जे जहारा निर्जनता (१९७९),अन्य देशा भिन्न समया (१९८२),जतरारा प्रथमा पदा (१९८८), अहनिका (१९९०), स्थीरा चरित्रा (१९९१),सच्चाराचारा (१९९४),स्मरतोरा सहारा (१९९५),परिक्रमा (१९९८) असमया (२००४), कविता समना (२०११); लघुकथा – भावनाथा ओ अन्यामाने (१९८२), दोनचर्या (१९८३),अमेजेऊनमाने (१९८६),साक्षात्कारा (१९८६), प्रीया, बिडूशाका (१९९१), शेषा पर्यन्ता (१९९५), इच्छापात्रा (२०००), इंद्रधन, अखी ओ कवितारा, दीर्घजीबाना (२००९); नाटक – सूर्यास्तापुरबरु (१९७७), सबा शेषा लोका (१९८०), असंगता नाटका (१९८१), पुरवारागा (१९८३), सुंदरादास (१९९३) कादंबरी – देशाकलापात्रा (१९९१) बालसाहित्य – अलिमलिका (१९९३),आलुकुची मलुकुची (१९९३),अनाबाना (२००८), अनामाना (२०१६); संशोधन कार्य – पुरी पेंटीग्ज (१९८२), चित्रपोथी (१९८५), पाम लिफ (१९९१) अनुवादित साहित्य – ग्रोव्हींग ॲण्ड इंडियन स्टार (मूळ लेखिका – कॅथरीन सेलेमंटस, १९९२), अंडर द सायलेन्ट सन (१९९२), ऑटोम मून (मूळ लेखक -गुलजार, १९९९) इत्यादी. दास यांच्या बहुतेक पुस्तकांचे इंग्रजीत झालेली भाषांतरे झाली आहेत.
दास यांच्या अहनिक (१९९०) या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार देऊ करण्यात आला होता; परंतु त्यांनी तो नाकारला. अकादमीने या साहित्यकृतीचे हिंदी, बंगला, आसामी व इंग्रजी भाषेत भाषांतर करुन प्रकाशन केले.
जगन्नाथ प्रकाश दास कथा, कादंबरी लेखनाकडे उशीरा वळलेत. १९८० मध्ये त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. त्यानंतर कथासंग्रह प्रकाशित झाले. कथेच्या प्रारंभापासूनच ते वाचकाला प्रभावित करतात आणि शेवटी अनाकलनीय रहस्यमयतेचा अनुभव आणून देतात. मनोरंजकता हा त्यांच्या कथांचा उपजत भाव आहे. देशकाल पात्रा (१९२२) ही एक त्यांची ऐतिहासिक कादंबरी. वसाहतवादाच्या प्रभावाखाली ओडियातील सामाजिक स्थित्यंतर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात कसे झाले याचे चित्रण या कादंबरीत आहे. शोषकांच्या दु:खाला वाचा फोडणारीच भावनाच नव्हे स्वअस्तित्वाची जाणीव या कादंबरीने करून दिली आहे. दास यांचे पहिले नाटक सूर्यास्ता पुरबुरु (सूर्यास्तापूर्वी). उच्चभ्रू अभिरुची संपन्नता, संवेदनशीलता आणि अभिजातता या नाटकातून प्रकट होते. आधुनिक नाटय वाड्मयात अभिजात नाटक म्हणून याकडे पाहिले जाते.
दास यांनी पूरी चित्रकांरावर संशोधन करुन पुरी पेंटीग्ज ,बर्किली विद्यापीठाने प्राध्यापक जोहान्स विल्यमस् यांच्या सहकार्याने चित्रपोथी, पाम लिफ हे संशोधनपर लेखन करुन ओडिया कला क्षेत्राला नवीन दिशा दिली. पारंपारिक व स्थापत्यकलेवर प्रकाश टाकला. दास यांचे नाटय, चित्रपट क्षेत्रात भरीव योगदान आहे. उत्कल रंगमंच ट्रस्ट, भारतीय नाटय संघ, नंदीकर थिएटर्स, भुवनेश्वर फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया,आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट पुरस्कार परीक्षण समिती, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समिती आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इत्यादी संस्थांवर महत्वाच्या कार्यकारी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यात.
जगन्नाथ प्रसाद दास यांना त्यांच्या अतुलनीय साहित्यिक आणि विद्याशाखीय कार्यासाठी विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. पूजातंत्र प्रचार समितीचा-विशुषा पुरस्कार (१९८४), ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कार (१९७५), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९०-स्वीकारला नाही), सरला ॲवार्ड (१९९८), नंदीकर नाटयलेखक पुरस्कार (२०००), सरस्वती सन्मान (२००६) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. संशोधन कार्यासाठी त्यांना होमीभाभा फेलोशीप (१९७९- ८१), इमरटीस फेलोशीप, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार (१९९४-९६) ह्या संशोधनवृत्ती प्राप्त आहेत. प्रशासकीय सेवेत ओडिशा राज्यातील कलहांडी जिल्हयात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.
संदर्भ : मोहंती, सच्चीदानंद , द वर्ल्ड ऑफ जे.पी. दास, द हिन्दु, मार्च, ४, २००७.