गोरिंग, हेरमान व्हिल्हेल्म : (१२ जानेवारी १८९३—१६ ऑक्टोबर १९४६). जर्मन मुत्सद्दी व वायुसेनाप्रमुख. ह्याचा जन्म बव्हेरियातील रोझेनहाइम ह्या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९१२ मध्ये त्याने कैसरच्या भूसेनादलात प्रवेश मिळविला. १९१४ मध्ये त्याची बदली जर्मन हवाई दलात करण्यात आली. हवाई दलातील शौर्याबद्दल व नैपुण्याबद्दल त्याला ‘पोवर ली मेरिट’ हे पद बहाल करण्यात आले.

पहिल्या महायुद्धातील जर्मनीच्या पराभवानंतर १९१८ साली तो स्वीडनमध्ये गेला. ह्या युद्धातील पराभवाबद्दल लष्कराऐवजी अंतर्गत राजकारणास व मुलकीव्यवस्थेस तो दोष देई. स्वीडनमधील एका हवाई कंपनीने त्यास नोकरी दिली. ह्या सुमारास केरिन नावाच्या विधवेशी त्याने लग्न केले. १९२२ मध्ये तो जर्मनीत परत आला, त्या वेळी त्याच्यावर हिटलरची छाप पडली. १९२३ च्या म्यूनिकच्या उठावात तो जखमी झाला व पुन्हा तो स्वीडनला पळून गेला. १९२७ मध्ये तो जर्मनीस परतला, पुन्हा त्याने आपले हिटलरबरोबरचे संबंध प्रस्थापित केले व त्याच्या साहाय्याने तो १९२८ मध्ये संसदेवर निवडून आला.

गोरिंगने व्यापारी व जमीनदार यांच्याशी संबंध वाढवून हिटलरच्या बाजूने मतपरिवर्तन केले. १९३१ मध्ये तो हिंडेनबुर्गला भेटला व १९३२ च्या संसदेच्या निवडणुकीत संसदेचा अध्यक्ष झाला. हिटलर सत्तारूढ झाल्यावर त्याने गोरिंगची बिनखात्याचा मंत्री, प्रशियाचा पंतप्रधान, हवाई दलाचा आयुक्त इ. पदांवर नेमणूक केली.

त्याने हवाई दलात आमूलाग्र सुधारणा केल्या. त्यास १९३५ मध्ये हवाई दलाचे प्रमुखपद व अंतर्गत व्यवस्थेचे मंत्रिपद देण्यात आले. ह्यानंतर जर्मनीची सर्व अर्थविषयक सूत्रे गोरिंगच्या हातात देण्यात आली. चतुर्वार्षिक योजना अंमलात आणून आर्थिक बाबतींत त्याने स्थैर्य आणले. दुसरे महायुद्ध सुरू होताच त्यास हवाई दलाचा मार्शल हा किताब दिला आणि नंतर संभाव्य उत्तराधिकारी म्हणून हिटलरने त्याचे नाव जाहीर केले. १९४३ नंतर गोरिंगचे हिटलरवरील वर्चस्व कमी झाले व दोघांत मतभेद निर्माण झाले. गोरिंग पळून जात असता त्यास दोस्त राष्ट्रांनी अटक केली आणि न्यूरेंबर्गच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने त्यास दोषी ठरवून देहान्ताची सजा फर्माविली.

रोमेलच्या मते गोरिंग सुखासीन व उच्चभ्रू होता. त्याने जर्मनीचे विमानदल पूर्णपणे विकसित केले. दुसऱ्या महायुद्धात त्याने प्रशंसनीय कामगिरी केली. फाशीच्या पूर्वी काही तास अगोदर त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली.

संदर्भ :

  • Butler, Ewan; Young, G. G. Marshal without Glory, London, 1951.
  • Frischauer, Willi, Rise and Fall of Hermann Goering, Boston, 1951.