विचारवंतांच्या जगात प्रकृतिवाद किंवा निसर्गवादी हे सर्वसामान्यांना फारसे परिचित नसले, तरी त्यांचे वैचारिक योगदान महत्त्वाचे आहे. विशेषत:, अर्थशास्त्राच्या विकासात त्यांचा अतिशय महत्त्वपूर्ण सहभाग आहे. अर्थशास्त्राची सर्वांत पहिली शास्त्रशुद्ध मांडणी करण्याचे श्रेय प्रकृतिवादी विचारवंतांना जाते.

प्रकृतिवादी विचारसरणीची सुरुवात १७५७ पासून फ्रान्समध्ये पंधराव्या लूईच्या दरबारातील विख्यात राजवैद्य व अर्थशास्त्रातील प्रकृतिवादी संप्रदायाचा अध्वर्यू  फ्रांस्वा केने (François Quesnay) यांच्याकडून झाली. १७६७ पासून प्रकृतीवाद्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणण्याची पद्धत प्रचलित झाली. physiocracy या मूळ संज्ञेत physio म्हणजे प्रकृती (Nature) आणि cracy म्हणजे व्यवस्था  ही मूलभूत संकल्पना होती. मानवनिर्मित कृत्रिम व्यवस्थेविरोधी एक नैसर्गिक व्यवस्था कार्यरत असते. विचारवंत आणि राजकीय नेत्यांनी ही व्यवस्था समजून घेऊन ती अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे या विचारसरणीचे मूलभूत प्रतिपादन होते. प्रकृतिवाद हा एक प्रकारे संपत्तीचा सिद्धांत होता. केनेप्रणित या विचारसरणीचा ठाम विश्वास असा होता की, राष्ट्रांची संपत्ती केवळ शेतीक्षेत्रातील आधिक्यमूल्यामुळेच निर्माण होते. वस्तूउत्पादनामुळे संपत्ती निर्माण होऊ शकते, हे त्याला मान्य नव्हते. केवळ शेतकरी आणि शेतमजूर हे दोन वर्ग आधिक्यमूल्य निर्माण करत असल्याने उत्पादक ठरतात, असा त्याचा दावा होता. साध्या व सुलभ आर्थिक कल्पनांची शास्त्रशुद्ध मांडणी हे प्रकृतिवाद्यांचे सर्वांत महत्त्वाचे योगदान होय. त्यांचे विचार क्रांतिकारक ठरले.

प्रकृतिवाद्यांच्या पूर्वीच्या काळात अर्थशास्त्र ही स्वतंत्र अभ्यासशाखा नव्हती. सर्वप्रथम केने याने वैद्यकशास्त्रीय तत्त्वांचा वापर संपत्तीशास्त्राच्या अभ्यासात करण्याचा प्रयत्न केला. केनेच्या मते, मानवी शरीराच्या अभ्यासाप्रमाणेच अर्थव्यवस्थेचे विश्लेषण समजून घ्यायला हवे. अर्थव्यवस्था ही एखाद्या स्वकेंद्री राजाच्या लहरीप्रमाणे बदलत जाणारी व्यवस्था नाही, हे केनेने स्पष्ट केले. केने याने १७५८ मधील आपल्या टॅब्लो इकॉनॉमिक या ग्रंथात मांडलेली आर्थिक सारणी किंवा अर्थाभिसरणाची ही संकल्पना अभिजात अर्थशास्त्रातील गाभा आहे. चक्राकार ओघाची संकल्पना म्हणुनही ती विख्यात आहे. निसर्गनियमावर आधारित सामाजिक-आर्थिक अभिसरणाची प्रक्रिया या ग्रंथात स्पष्ट केली आहे. ही सारणी सर्वप्रथम १७५८ मध्ये केवळ चार प्रतींमध्ये प्रसिद्ध होऊन १७५९ मध्ये तिची दुसरी आवृत्ती केवळ तीन प्रतींत निघाली. नंतर अनेक आवृत्त्या निघाल्या. या सर्व आवृत्त्यांत दिलेली आकडेवारी भिन्नभिन्न असली, तरी त्यांतील मूलभूत तत्त्व सारखे आहे. ही सारणी तत्कालीन फ्रान्सच्या बंदिस्त भांडवलशाही कृषिअर्थव्यवस्थेचे प्रारूप आहे. या सारणीत केने याने समाजातील उत्पादक शेतकरीवर्ग, अनुत्पादक जमीनदारवर्ग आणि अर्धउत्पादक कारागीरवर्ग असे तीन गट गृहीत धरले आहेत. अर्थव्यवस्थेचा पाया शेतकरीवर्ग असून हा वर्ग आधिक्यमूल्य निर्माण करतो, असे केनेचे प्रतिपादन आहे. शेतकरीवर्गाकडून जमीनदारवर्ग आणि अर्धउत्पादक कारागीरवर्ग या दोन वर्गांना आणि त्यांच्याकडून पुन्हा उत्पादकवर्गांमध्ये संपत्तीचे अभिसरण कसे होते, हे त्याने पुढीलप्रमाणे सांगीतले आहे :

  • सुरुवातीला उत्पादकवर्गाने शेतीमध्ये तीन एकक गुंतवणूक करून पाच एकक उत्पादन घेतले, तर यात दोन एकक आधिक्यमूल्य झाले. हे मूल्य दरवर्षीच्या गुंतवणुकीसाठी वापरले जाईल. याला निव्वळ उत्पादन म्हटले जाते.
  • दुसऱ्या टप्प्यात, उर्वरित तीन एकक उत्पादनातील रक्कम शेतकरीवर्ग अनुत्पादक जमीनदारवर्गाला खंड, सारा इत्यादी देण्यासाठी दोन एकक, तर कारागीरवर्गांकडून तयार वस्तू, कृषिऔजारे इत्यादी घेण्यासाठी एक एकक खर्च करेल.
  • तिसऱ्या टप्प्यात, जमीनदारवर्ग आपल्याजवळील दोन एकक उत्पन्न शेतकरी व कारागीरवर्गांकडून शेतमाल व उत्पादित वस्तू अनुक्रमे प्रत्येकी एक एकक याप्रमाणे खर्च करतील.
  • शेवटच्या टप्प्यात, कारागीरवर्ग आपल्याजवळील दोन एकक उत्पन्न शेतमालाचे मूल्य देण्यासाठी शेतकऱ्यांना देईल. म्हणजेच, पुन्हा पाच एकक उत्पन्न शेतकरी या उत्पादकवर्गाकडे येईल व याप्रमाणे उत्पादन-उत्पन्न वितरणाचे चक्र अविरत सुरू राहील. या सारणीचक्राची सुरुवात आणि अखेर शेतकरी या उत्पादक वर्गात होते. केनेचे प्रतिपादन असे होते की, ज्याप्रमाणे शरीरातील रक्त हृदयाकडून पूर्ण शरीरभर आणि पुन्हा हृदयाकडे फिरत राहते, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेतील पैसा शेतकऱ्यांकडून परत शेतकऱ्यांकडे सतत खेळता राहतो. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, यावर प्रकृतिवाद्यांचा ठाम विश्वास होता.

उत्पादक शेतकरी वर्ग (Class De Productive)

(१) ५


(२) २                           (३) १                                                                 (२) १                     (४) १

 अनुत्पादक जमीनदार                                                                                अर्धउत्पादक कारागीर

(Class De Sterile)____________(३) १                 (class de proprietors)

अशा प्रकारची विचारसरणी त्या काळात महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारक ठरली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातील एक महत्त्वाचा विचारवंत ⇨ ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द मीराबो  याने जागतिक शोधांमध्ये केनेच्या आर्थिक सारणीला छपाईकला आणि पैशाच्या शोध यांप्रमाणेच महत्त्वाचे स्थान दिले आहे.

निसर्गनियम सर्वोच्च आहेत व त्यानुसार अर्थव्यवस्था चालली पाहिजे. हे नियम कधीही बदलत नसून तेच आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण करतात, अशी प्रकृतिवादाची तत्त्वे आहेत. प्रतृतिवाद्यांचा शासकीय हस्तक्षेपाला विरोध होता. त्यांच्या मते, शासनाचा मृत हात (Dead Hand) नैसर्गिक अर्थव्यवस्था भ्रष्ट करतो. जेकब वायनर या कॅनेडियन अर्थतज्ज्ञाने निर्हस्तक्षेप धोरणाचा शास्त्रशुद्ध पाया घालणाऱ्यांमध्ये प्रख्यात स्कॉटिश अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ (Adam Smith) याच्या बरोबरीने प्रकृतिवाद्यांना स्थान दिलेले आहे. तसेच काँडॉरसेट या प्रकृतिवाद्यांच्या मते, अन्नटंचाई काळात शासकीय रोजगार वाढवला जावा. म्हणजेच, प्रकृतिवाद्यांचे निर्हस्तक्षेपाचे तत्त्व कालानुरूप लवचिक होत गेल्याचे दिसून येते.

प्रकृतिवादी अर्थशास्त्रामध्ये शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानले असले तरी, ॲडम स्मिथ याने १७७६ मध्ये लिहिलेल्या आपल्या वेल्थ ऑफ नेशन्स या विख्यात ग्रंथाच्या अखेरीस म्हटले आहे की, शरीराप्रमाणे अर्थव्यवस्था मानणे हे मनोरंजक विचार आहेत. त्याच्या मते, निसर्गवाद्यांना संपूर्ण निर्हस्तक्षेपाची व्यवस्था किंवा कोणत्याही व्यवस्थेचा अभाव अनुस्यूत होता. ही विचारसरणी केवळ तार्किक आणि अव्यवहारी आहे; मात्र हे पूर्णत: खरे नाही. त्याचप्रमाणे टर्गो व लूई पॉल अबिली या अर्थशास्त्रज्ञांना प्रकृतिवादी अर्थशास्त्राची तत्त्वे मान्य नसली, तरी अर्थशास्त्राचा शास्त्रशुद्ध पाया निर्माण करण्याची  अजोड कामगिरी प्रकृतिवादी अर्थशास्त्राला द्यावे लागेल.

संदर्भ :

  • Albaum, M., The Moral Defenses of Physiocrats- Laissez Faire, Journal of the History of Ideas, 1955.
  • Meek, Ronald L., The Economics of Physiocracy: Essay and Translation, Press, U. S., 1963.
  • Robbins, Lionel, History of Economic Thought- LSE Lectures, U.S., 1998.
  • Rothschild, E., Economic Sentiments: Adam Smith, Condorcet and the Enlightenment, U. S., 2013.

समीक्षक – श्रीराम जोशी

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा