औद्योगिक संकेंद्रणाच्या अभ्यासात वापरला जाणारा निर्देशांक. अमेरिकन अर्थतज्ज्ञ ओरिस हरफिन्डाल यांनी १९५० च्या शकात या निर्देशंकाची मांडणी केली; परंतु प्रसिद्ध जर्मन अर्थशास्त्रज्ञ अल्बर्ट ओ. हर्शमन यांनी त्यापूर्वीच असाच निर्देशांक वापरून परकीय व्यापाराच्या आकृतीबंधाचे मूल्यमापन केले होते. त्यामुळे प्रस्तुत निर्देशांक ‘हरफिन्डाल निर्देशांक’ आणि ‘हर्शमन – हरफिन्डाल निर्देशांक’ (एचएचआय) या दोन्ही नावांनी ओळखला जातो.

बाजारात एखाद्या उद्योगसंस्थेला मक्तेदारी सत्ता किती प्रमाणात अवगत झाली आहे, हे या निर्देशांकाच्या मदतीने माहिती करता येते. एखाद्या विशिष्ट बाजारात कार्यरत असलेल्या सर्व उद्योगसंस्थांचा बाजार भांडवलातील वापर, रोजगारातील वापर, उत्पादनातील वापर, मूल्यवृद्धीतील वापर या निर्देशांकाच्या मदतीने मोजता येतो. उद्योगसंस्थांचा बाजारातील वापर ० ते १ या दरम्यान मोजल्यास हरफिन्डाल निर्देशांक किमान मूल्यापासून १ या मूल्यापर्यंत असू शकतो.

हरफिन्डाल निर्देशांक सूत्राची मांडणी पुढीलप्रमाणे करता येईल :

वरील सूत्रात Xi = विशिष्ट्य उद्योगसंस्थेचा बाजारातील वापर

(i = 1,2,…n)

विशिष्ट उद्योगाचा बाजारातील वापर मोजण्यासाठी वापरलेल्या चलाचे  (उदा., उत्पादन) मूल्य

n = उद्योगसंस्थांची एकूण संख्या

हरफिन्डाल निर्देशांकाचे किमान मूल्य = 1/n एवढे असते, तर कमाल मूल्य १ एवढे असते.

हरफिन्डाल निर्देशांकाचे मूल्य 1/n इतके असल्यास बाजारातील सर्व उद्योगसंस्था सारख्याच आकाराच्या आहेत. म्हणजेच कोणत्याही उद्योगसंस्थेकडे मक्तेदारी सत्ता केंद्रित झालेली नाही, असा निष्कर्ष प्राप्त होतो.

हरफिन्डाल निर्देशांकाचे मूल्य १ इतके असल्यास विशिष्ट चलाच्या (उदा. उत्पादन) बाबतीत मक्तेदारी सत्ता एकाच उद्योगसंस्थेत केंद्रित झाली आहे, असा निष्कर्ष प्राप्त होतो.

औद्योगिक संकेंद्रण माहिती करण्यासाठी संकेंद्रण गुणोत्तराचाही वापर केला जातो; मात्र संकेंद्रण गुणोत्तरात फक्त आघाडीच्या मोजक्या उद्योगसंस्था विचारात घेतल्या जातात. त्या तुलनेने हरफिन्डाल निर्देशांक अधिक समावेषक आहे; कारण हरफिन्डाल निर्देशांकात बाजारातील सर्व उद्योगसंस्थांच्या वापराचा समावेश केला जातो.

हरफिन्डाल निर्देशांक काढताना उद्भवणारी अडचण म्हणजे हा निर्देशांक काढण्यासाठी प्रत्येक उद्योगसंस्थेचा (विशिष्ट चलांच्या बाबतीतला – उदा., रोजगार, उत्पादन, भांडवल इत्यादी) वापर माहिती करावा लागतो. हा आकडेवारीचा तपशीलच सर्वांत महत्त्वाचा ठरतो. आकडेवारीचे मोठे आव्हान हरफिन्डाल निर्देशांकाच्या बाबतीत उद्भवत असल्यामुळे हरफिन्डाल निर्देशांकाचा औद्योगिक संकेद्रणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासातला वापर १९८० च्या दशकापासून प्रचलित झाला असला, तरी बाजार सत्तेच्या अभ्यासातले संकेंद्रण गुणोत्तराचे महत्त्व कमी झाले नाही.

समीक्षक : ज. फा. पाटील