गिनी गवत : (इं. गिनी ग्रास; लॅ. पॅनिकम मॅक्सिमम; कुल-ग्रॅमिनी). हे मूळचे उष्ण कटिबंधीय आफ्रिकेमधील असून १७९३ मध्ये भारतात आणले गेले आणि आता ते निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींवर व हवामानांत व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) चाऱ्याचे पीक म्हणून लावले जात आहे. उष्ण हवामानात व निचऱ्याच्या सुपीक जमिनीत पीक चांगले वाढते. दलदलीच्या अगर अगदी हलक्या जमिनीत वाढत नाही. खोल मध्यम पोयटा, खोल वाळुसर पोयटा किंवा गाळमिश्रित वाळूमध्ये पाणी दिल्यास चांगले वाढते.
हे गवत सावा, वरी इत्यादींच्या पॅनिकम ह्या वंशातील आहे. त्याला जमिनीत आडवे वाढणारे जाडसर व आखूड खोड (मूलक्षोड) असते व त्यापासून जमिनीवर दाट झुबके येतात; या झुबक्यातील संधिक्षोड (सांधेदार दांडे) सु. तीन मी.पर्यंत उंच व सरळ वाढतात; त्यांवर सु. ३०—७५ x ३·५ सेंमी. अरुंद पाने एकाआड एक येतात. दांड्यांच्या टोकास २०—५० सेंमी. लांब, सरळ किंवा काहीसे वाकडे फुलोरे येतात. आकारमान, केसाळपणा व शारीरिक ढब यांत विविधता आढळते, परंतु कणिशके सारखीच असतात. इतर शारीरिक लक्षणे सावा, वरी व तृणकुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
मशागत : जमीन २० ते २५ सेंमी. खोल नांगरून, कुळवून हेक्टरी ३०—४० टन शेणखत मिसळून तयार करून तिच्यात ६० ते ७५ सेंमी. अंतराने सऱ्या पाडतात.
लागण : गिनी गवताला बी येते, तरीपण त्याची अभिवृद्धी त्याच्या ठोंबांपासूनच चांगली होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला या पिकाच्या बुडख्यांमधून मुळ्यांसकट ठोंब काढून घेऊन ते सऱ्यांतील वरंब्यांच्या बगलांवर एकेक मीटर अंतरावर एकेका जागी दोनदोन लावतात. हेक्ट्री ३० ते ३५ हजार ठोंब लागतात. लागणीनंतर पाऊस नसल्यास लगेच पाणी देतात व पुढे दर ८-१० दिवसांनी देतात. काही ठिकाणी शेताच्या बांधांवर आणि पाण्याच्या चारीच्या बाजूने लावतात; त्यापासून खर्च न करता चारा मिळतो.
आंतर मशागत : पहिल्या वर्षी नांगर सऱ्यांतून चालवून हेक्टरी १५—२० टन शेणखत जमिनीत मिसळतात.
कापणी : लागणीपासून सु. अडीच महिन्यांनंतर पहिली कापणी करतात. कापणी काळजीपूर्वक न केल्यास ठोंब उपटून येऊन पीक विरळ होते आणि उत्पादन घटते. पहिल्या कापणीनंतर दर दीडदोन महिन्यांनी पीक मीटरभर उंच होऊन मधूनमधून फुलांचे तुरे दिसू लागताच कापणी करतात, न कापल्यास चाऱ्याची प्रत कमी होते. डिसेंबर-जानेवारी महिन्यांत पिकाची वाढ फारशी होत नाही. लागवडीच्या पहिल्या वर्षी सहा ते सात व नंतरच्या प्रत्येक वर्षी ७-८ कापण्या मिळतात. चाऱ्याचे उत्पादन पहिल्या दोन-तीन कापण्यांत कमी मिळते, पण पुढे फुटवे वाढत गेल्याने ते वाढते.
उत्पन्न : सरासरीने दरसाल हेक्टरी ६०—७५ टन हिरवा चारा मिळतो. चांगली काळजी घेतल्यास पीक पाच-सहा वर्षे टिकते. तमिळनाडूमध्ये मैलापाणी दिल्याने वार्षिक उत्पादन हेक्टरी २२५ टन इतके मिळाल्याची नोंद आहे.
पुनरुज्जीवन : तीनेक वर्षांनंतर ठोंबांचे जुमडे फुटव्यांमुळे फारच मोठे होतात आणि त्यांचा मधला भाग हवा व प्रकाश यांच्या अभावामुळे मरतो त्यामुळे उत्पन्न घटते. अशा प्रसंगी मे महिन्यात ते सर्व ठोंब जाळून टाकून लगेच सऱ्या फोडून खतपाणी दिल्यास पीक नवीन लागवडीसारखे होते.
कीटक उपद्रव व रोग : पीक पाणभरते असल्यामुळे ते भराभर वाढते म्हणून कीटकांपासून अगर कवकीय रोगांपासून पिकाला उपद्रव होत नाही.
गिनी गवत जास्त पालेदार असल्याने जनावरे आवडीने खातात.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.