पृथ्वीवरील सु. ४.६ अब्ज वर्षांच्या भूवैज्ञानिक घडामोडींच्या इतिहासाची विभागणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी भूवैज्ञानिक कालमापी (Geological Timescale) तयार केली. त्याप्रमाणे सध्या आपण नवजीव महाकल्पातील (Cenozoic Era) चतुर्थ कल्पामधील (Quaternary Period) आता चालू असलेल्या होलोसीन (Holocene) या कालखंडात आहोत, जो सु. ११७०० वर्षांपूर्वीपासून सुरू झालेला आहे. पूर्वी याला अभिनव (Recent) कल्प म्हणत.
जगभरात भू – विज्ञानामधील प्रभावी संप्रेषणासाठी, तसेच एखाद्या स्थानाबद्दल अचूकतेने माहितीचे आदान – प्रदान करण्यासाठी स्तरिक (Stratigraphic) नामांकनाचा आणि विशेषत: त्यांच्या भूवैज्ञानिक कालखंडाचा उल्लेख असणे ही आवश्यक बाब बनली आहे. भूवैज्ञानिक कालमापी ही पृथ्वीतलावर विविध ठिकाणी आढळणाऱ्या खडकांच्या उत्पत्ती काळाच्या क्रमवारीवर आधारित मानक स्तरिक विभागांनी आणि त्या प्रक्रियेशी निगडित वर्षे एककावर आधारित कालखंडाच्या साहाय्याने बनवलेली आहे. स्तरशास्त्राच्या (Stratigraphy) सर्वसाधारण नियम आणि तत्वांच्या आधारे (Stratigraphy Laws and Principles), जगभरातील जमिनीवरील व समुद्रातील खडक व त्यांच्या स्तरांचा आणि प्रसंगी खंडीय हिमवाह (Ice sheets) खोलीतील हिमस्तरांचा (Ice layers), विविधांगाने सांगोपांग अभ्यास करून ही सर्वमान्य भूवैज्ञानिक कालमापी अचूकतेने तयार करण्याचे आणि शास्त्रीय मापदंडानुसार वेळप्रसंगी सुधारित करण्याचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील “इंटरनॅशनल कमिशन ऑन स्ट्रॅटिग्राफी” (ICS) ही संस्था करत असते.
जागतिक स्तरावर एखाद्या कालखंडाची मानकीय विभागणी करताना, मोठ्या प्रमाणावर घडलेल्या एखाद्या घटनेचे सलग आणि भक्कम पुरावे मिळाल्यानंतर, जगभरातील शास्त्रज्ञांच्या गटामध्ये समग्र चर्चा होऊन, त्याचे वर्गीकरण मान्य केले जाते. अशा तऱ्हेने अभिनव काळातील विभाजनासाठी बर्फ थरांच्या आणि खडकांच्या सुसंगत अभ्यासातून या काळातील जागतिक स्तरावर झालेल्या हवामान बदलांचा (World Climate Change) मागोवा घेऊन “इंटरनॅशनल कमिशन ऑन स्ट्रॅटिग्राफी” संस्थेने जुलै २०१८ मध्ये, ११७०० वर्षांपूर्वीपासून ते आतापर्यंतच्या, होलोसीन काळाचे खालील ३ उपभाग / टप्पे केलेले आहेत.
आतापासून मागे (Before Present) (वर्षे अंदाजे) – १) आरंभीचा काळ (Early Stage) : ११७०० वर्षांपूर्वी पासून ते ८३०० वर्षांपर्यंत- ग्रीनलँडीयन (Greenlandian); २) मध्य काळ (Middle stage) : ८३०० वर्षांपूर्वी पासून ते ४२०० वर्षांपर्यंत – नॉर्थ ग्रीप्पीयन (North Grippian) आणि ३) आताचा / अलीकडील काळ / उत्तर काळ (Late stage / Recent Age) – ४२०० वर्षांपूर्वी पासून आतापर्यंत – मेघालयन (Meghalayan).
हा कालखंड मोठ्या प्रमाणातील नैसर्गिक पूर उत्पात, निक्षेपण स्तर, हवामान बदलांचा आणि मानवी हस्तक्षेपांचा असल्यामुळे, यांचे सलग पुरावे शास्त्रज्ञांना उपलब्ध होत नव्हते. ह्या कालखंड विभागणीसाठी उपयुक्त ठरलेल्या शास्त्रीय पुरावा चाचणीतील पहिले दोन उपभाग खडक नाही; तर त्याऐवजी बर्फ थरांच्या अभ्यासाशी निगडित आहेत, कारण ते ग्रीनलँड खंडीय हिमवाहच्या आत खोलवर सापडलेले आणि अभ्यासलेले हिमस्तर (बर्फाचे थर) आहेत. ग्रीनलँडीयनच्या बाबतीत चतुर्थ कल्पातील हिमयुग संपून, तापमानवाढ (Warmer Climate) सुरू झाल्याचा आंतर हिमानी (Interglacial) कालखंड बदल दर्शवतो आणि नॉर्थग्रीपियनसाठी आंतर हिमानी काळातील कमीजास्त प्रमाणात वितळलेल्या हिमवाह (Glacier) बर्फखंडांचे विविधांगी / अनेकविध निक्षेपित परिणाम. या दोन्ही गोष्टी मुख्य आणि जागतिक पातळीवरील पर्यावरणीय बदलाद्वारे परिभाषित केल्या आहेत.
भारतातील उत्तरपूर्व / ईशान्य भागातील मेघालय राज्यातील चुनखडीच्या प्रदेशातील मौमलूह गुहेमध्ये (Mawmluh Cave) असलेल्या स्टॅलॅगमाईटच्या – (जमिनीकडून छताकडे जाणारा स्तंभ) / ऊर्ध्वमुखी लवण स्तंभाच्या (Column of Stalagmite) घटकातील, स्थिर प्राणवायू सम प्रोटॉन (Stable Oxygen Isotopes) अभ्यासातून, मेघालयन पर्वाचा / टप्प्याचा उगम झाला. मेघालयन टप्पादेखील असामान्य आहे आणि केवळ पहिल्यांदाच कालमापीमध्ये स्टॅलॅगमाईटचा वापर दर्शक खडक (Index Rock) म्हणून झालेला आहे. जागतिक स्तरावरील हवामान बदलाची चाहूल, शास्त्रज्ञांच्या मते, ४२०० वर्षांपूर्वीपासून असून, त्याचे घटक बीज मेघालयातील या खडकांत आढळतात.
शास्त्रज्ञांच्या निरीक्षणाद्वारे, हिमयुगानंतर आलेल्या काहीशा थंड; पण कोरड्या दुष्काळी हवामानामुळे, या काळातील त्यावेळी पसरलेल्या जगातील अनेक मानवी संस्कृतींचा नाश झाला असून, या काळातील दुष्काळाचा सर्वात मोठा परिणाम जागतिक पातळीवरील ग्रीस, इजिप्त, सीरिया, पॅलेस्टाईन, मेसोपोटेमिया, सिंधू नदीचे खोरे आणि यांगत्से नदी खोरे इत्यादी भागांत झाला. हवामान बदलांशी संबंधित, सध्या जगभर चालू असलेल्या विविध स्थलांतराच्या पूर्व प्रक्रियांशी आणि जगातील प्राचीन आणि त्याकाळातील प्रगत मानवी सभ्यतांच्या नाशाशी, ह्या काळाची सुरुवात आणि पुढील बदल जुळत आहेत. यानिमित्ताने भारताला आंतरराष्ट्रीय तालिकेमध्ये प्रथमच पृथ्वीच्या भूवैज्ञानिक घडामोडींचा साक्षीदार असल्याचे महत्त्व प्राप्त झालेले आहे.
समीक्षक : डॉ. श्रीनिवास वडगबाळकर