प्रकाश प्रेमी : (१६ ऑगस्ट १९४३). भारतीय साहित्यातील नामवंत डोग्री साहित्यिक. डोग्री कवी समीक्षक, कथाकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म जम्मू या केंद्रशासित प्रदेशातील उधमपूर जिल्ह्यातील कसुरी येथे झाला. घरी धार्मिक आणि शैक्षणिक वातावरण असल्याने बालपणीच त्यांच्यावर साहित्यिक संस्कार झाले. शालेय जीवनात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना अनेक संस्कृत श्लोक मुखदोग्त होते. त्यांनी माध्यमिक शिक्षण जवळच्या रामनगर या गावी घेतले.
पदवी आणि पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेतल्यानंतर त्यांनी लिपटन इंडिया या खाजगी कंपनीत नोकरी पतकरली. नंतरच्या काळात १९६७ मध्ये ते वसंतगड येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षक पदावर कार्यरत झाले. तेथेच त्यांचा आयुष्यक्रम व्यतीत झाला. परिसरातील नैसर्गिक वातावरण आणि त्याच परिसरातील गरिबीने पीडित मानवी जीवन त्याच्या साहित्य आकलनाचा चिंतनाचा विषय ठरला. त्याकाळातील विख्यात बंगाली आणि हिंदी साहित्यिकांच्या साहित्य वाचनाने त्याची साहित्यिक जाणीव अधिक प्रगल्भ झाली. १९६७ साली देशबंधु डोग्रा यांच्याशी त्यांचा परिचय घडून आला. देशबंधू यांनी त्यांना मार्क्सवादी साहित्यतत्त्वांची ओळख करून दिली. जम्मूतील रामनगर कहुआ येथे नोकरीच्या निमित्ताने त्यांना स्थलांतरित व्हावे लागले. दरम्यानच्या काळात त्यांनी मार्क्सवादी विचारतत्त्वांचा आणि मार्क्सवादात योगदान देणार्या जागतिक किर्तीच्या व्यक्तित्वांचा अभ्यास केला. प्रारंभीच्या काळातील संस्कृत साहित्याचा प्रभाव आणि डोग्री लेखक दुनुभाई पंत आणि के. एस. मधुकर यांच्या साहित्यिक प्रभावातून त्यांचे डोग्री भाषेतील लेखन फूलून आले.
प्रकाशप्रेमी यांचे साहित्य : लघुकथा– एक कोठा दास दौर (१९८४), त्रुंबन (१९७९); कादंबरी – बेदन धरती (१९८५); काव्यसंग्रह – ललकार (१९९२), चरित्र – स्वामी नित्यानंद, प्रबंध – शिव निमौही (२०११), महाकवी सूर्यकांत त्रिपाठी निराला (२००२); अनुवाद – देहरी दा दीया (२००६,मेरथी दा दीया-पंजाबी),आकाश अपरिचित धरा पराई (२०१३) ; नाटक – अपनी डफली अपना रंग (२००९) इत्यादी.
भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात घटनादत्त भाषा म्हणून डोग्री भाषेचा समावेश घटनादुरुस्तीने करण्यात आला. डोग्री खरे तर प्रादेशिक भाषा. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि पंजाब या राज्याच्या सीमाभागात ही भाषा बोलली जाते. मात्र राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर या भाषेतील साहित्यालाही एक व्यासपीठ मिळाले. या डोग्री भाषिक संस्थापनेत प्रकाश प्रेमी यांचा सहभाग आहे. पर्यावरण आणि मानवी जीवनातील भौतिक विपन्नता हा प्रकाश प्रेमी यांच्या लेखनाचा प्रधान विषय आहे. डोग्री भाषेच्या संदर्भात त्यांनी केलेल्या अनुवाद कार्यालाही मूल्य आहे. पंजाबी, हिंदी आणि तेलुगू भाषेतील कादंबरी आणि कवितांचा अनुवाद त्यांनी डोग्री भाषेत केला आहे. तसेच डोग्री भाषेतील साहित्याचा अनुवाद इतर भाषांत केला आहे.
त्याच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना विविध पुरस्करांनी गौरविण्यात आले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार (१९८७), साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार (२०१०) या पुरस्काराचा त्यात समावेश आहे. डोग्री भाषेच्या अध्ययनासाठी संशोधनासाठी त्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची संशोधनवृत्ती प्राप्त झाली आहे. अलीकडे प्रभाकर मनवा हे उपनाव घेऊन ते हरी संदेश या नियतकालिकात विनोदी आणि व्यंगपर लेखन करीत आहे. डोग्री भाषेच्या विकासार्थ स्थापित अनेक संस्थांमध्ये ते तज्ञ-सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/prakash_premi.pdf