हानेमान, सॅम्युअल
(१० एप्रिल, १७५५ – २ जुलै, १८४३)
होमिओपॅथी या औषध पद्धतीचा शोध लावणारे म्हणून सॅम्युअल हानेमान यांचे नाव प्रसिध्द आहे. जर्मनीमधील माइसन (Meissen) या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मातीची भांडी रंगविण्याचे काम करीत. वडलांच्या कडक शिस्तीमुळे हानेमानना स्वयंशिक्षणाची सवय लागली.
हानेमान यांनी १७७९ साली लाइपसिक व विएन्ना येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले तसेच एर्लांगेन येथे एम.डी. पदवी प्राप्त केली. वैद्यकीय व्यवसाय करीत असताना आर्थिक गरज म्हणून त्यांनी वैद्यकीय विषयासंबंधीत, विशेषत: रसायनशास्त्रावरची पुस्तके भाषांतरीत करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रोग झाला की, उलटी अथवा जुलाब होण्यासाठी औषधे दिली जात असत, तर काही वेळा जळवा लावून रोग्याचे रक्त काढले जाई. या उपायांनी रोग बाहेर टाकला जातो अशी तेव्हा समजूत होती. हे उपचार हानेमानना पटत नव्हते. १७९० साली त्यांनी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्ती घेतली व आपल्या आवडीच्या शास्त्रीय विषयांवरील पुस्तकांच्या भाषांतरावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
१७९० साली विल्यम कलेन या लेखकाचा औषधांवरचा ‘लेक्चर्स ऑन द मटेरिया मेडिका’ या ग्रंथाचे जर्मनीमध्ये भाषांतर करीत असताना त्यामध्ये त्यांना असे वाक्य आढळले की, सिंकोना या झाडापासून बनविलेले क्विनीन किंवा कोयनेल हे औषध त्यामध्ये असलेल्या कडूपणामुळे हिवताप बरा करते. कडू चवीमुळे हिवताप बरा होतो हे कारण त्यांना पटले नाही. तेव्हा त्यांनी या औषधाचा शरीरकार्यावर काय परिणाम होतो ते बघायचे ठरविले. त्यांनी स्वत: ठराविक मात्रेमध्ये रोज ते औषध घ्यायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना थंडी, ताप व घाम सुटणे असे क्रमाक्रमाने झाले व औषध घ्यायचे बंद केल्यावर ती लक्षणे बंद झाली. त्यावरून त्यांनी असे अनुमान काढले की, निरोगी माणसाला विशिष्ट द्रव्य दिल्यावरची जी लक्षणे उद्भवतात तशीच लक्षणे एखाद्या रोग्यात आढळली तर तो रोगी त्या विशिष्ट औषधांनी बरा होतो. हानेमाननी या पद्धतीला होमिओपॅथी असे नाव दिले. ग्रीक भाषेत होमिओरा म्हणजे समानता व पॅथास म्हणजे रोग. थोडक्यात औषधे व रोगाची लक्षणे यांमधील समानता या तत्त्वावर आधारित म्हणून या औषधपद्धतीला त्यांनी होमिओपॅथी हे नाव दिले गेले.
हानेमान यांनी १७९९ मध्ये होमिओपॅथी पद्धतीचा वापर करून रोगोपचार करायला सुरुवात केली. मात्र इतर व्यावसायिकांचा विरोध तसेच, त्यांनी लिहिलेल्या वैद्यकीय शोधनिबंधाना विरोध अशा कारणांनी हानेमान यांना अनेक वादळांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यापुढील २० वर्षात जवळजवळ प्रत्येक वर्षी त्यांना व्यवसायाचे ठिकाण बदलावे लागले. १८२० साली ऑस्ट्रियाचा राजपुत्र त्यांच्याकडे उपचारासाठी आला. त्यावेळी एका डॉक्टरने त्याला जळवा लावून रक्त काढण्याचा उपाय सुचवला. हानेमान यांनी उपचाराला सुरुवात केल्यावर आधीचे उपाय थांबवावे लागतील असे बजावले होते. परंतु राजपुत्राने दोन्ही उपचार चालू ठेवले. हे लक्षात येताच हानेमान यांनी त्याला औषध देणे बंद केले. त्यानंतर पाच आठवड्यांनी राजपुत्र मरण पावला. याचा दोष मात्र हानेमान यांच्यावर ठेवला गेला. औषधी कायद्याचे उल्लंघन केल्याचे ठरवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. १८१० साली हानेमान यांनी होमिओपॅथीच्या उपाय योजनेसंबंधीचा दि अॅरगॅनॉन ऑफ रॅशनल हिलिंग हा ग्रंथ प्रसिध्द केला. त्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या. सहावी आवृत्ती १८४२ साली लिहिली गेली व हानेमान यांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नीने ती प्रसिद्धीला दिली. उपाययोजना करताना आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या ग्रंथाच्या सुधारित आवृत्यांमध्ये दिसते. १८११ ते १८२१ या काळात लिहिलेल्या होमिओपॅथी औषधीसंबंधीचा मटेरिया मेडिका प्युरा या ग्रंथात ६७ औषधींचे वर्णन दिले आहे. १८२८ साली जुनाट आजारासंबंधीच्या उपाय योजनेबाबत लिहिलेल्या दि क्रॉनिक डिसिजेस या ग्रंथात ४८ औषधींचे वर्णन आहे. हानेमान यांनी जवळजवळ २५०० पानांची ग्रंथसंपदा ३२ वर्षात लिहिली गेली. त्याशिवाय वेगवेगळ्या जर्नल्समध्येही त्यांचे वैद्यकीयसंबंधी लिखाण चालू असे. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार झाले. त्यातूनच पुढे युरोप व अमेरिकेत होमिओपॅथी ही उपचार पध्दती वापरणारे अनेक डॉक्टर निर्माण झाले. १८३१-३२ च्या युरोपमधील कॉलऱ्याच्या साथीत होमिओपॅथीने अनेकांना जीवदान दिले.
१८३४ ते १८४३ या काळामध्ये पॅरीसमध्ये त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला होता. त्याचबरोबर औषधासंबंधी त्यांचे प्रयोग व लिखाण चालूच होते. वृद्धापकाळात त्यांच्या श्वास नलिकेला सूज आली होती व त्यातच त्यांचा अंत झाला.
संदर्भ :
- A Brief Biography of Samuel Hahnemann by Peter Morel, published by Hahnemann Centre of Heilkunst
समीक्षक : डॉ आगरकर राजेंद्र
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.