हूकर, जोसेफ डाल्टन : (३० जून १८१७ – १० डिसेंबर १९११).
जोसेफ डाल्टन हूकर यांचा जन्म इंग्लंडच्या सफोक (Suffolk) परगण्यातील हेल्सवर्थ या शहरात झाला. त्यांचे वडील विल्यम जॅक्सन हूकर हे वनस्पतीशास्त्राचे अध्यापक होते. वयाच्या सातव्या वर्षांपासूनच जोसेफ यांनी वडलांची ग्लासगो विद्यापीठातील व्याख्याने ऐकली. यामुळे लहानपणीच त्यांना वनस्पती वर्गीकरण आणि कॅप्टन जेम्स कूकसारख्या साहसी शोधमोहिमा या दोन विषयांमध्ये आवड निर्माण झाली.
जोसेफ हूकर यांचे शालेय शिक्षण ग्लासगो येथे झाले. त्यानंतर त्यांनी ग्लासगो विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांनी १८३९ साली एम. डी. ही पदवी मिळवली. पदवी मिळाल्यानंतर त्यांना नेव्हल मेडिकल सर्व्हिसेसमध्ये प्रवेश मिळाला. या ठिकाणी त्यांनी एचएमएस एरेबस या अंटार्क्टिक (दक्षिण ध्रुवप्रदेश) शोधमोहिमेत सहशल्यविशारद म्हणून काम केले. या प्रवासात हूकर यांनी अनेक वनस्पती गोळा केल्या तसेच त्यांची चित्रे काढून नोंदी घेतल्या. या मोहिमेहून परत आल्यावर त्यांची जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेत वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली. या संस्थेद्वारे हूकर भारत आणि हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वनस्पतींच्या शोध मोहिमेसाठी निघाले. हिमालयातील वनस्पतींचा शोध घेणारे हूकर हे पहिले विदेशी वनस्पतीतज्ज्ञ होते. हूकर यांनी कोलकाता, दार्जिलिंग, सिक्कीम, बंगाल, नेपाळ, तिबेट अशा सर्व भागातील हजारो वनस्पतींचे नमुने गोळा केले.
जोसेफ हूकर यांचे वडील सर विल्यम जॅक्सन हूकर हे रॉयल बोटॅनिकल गार्डन्स, क्यू या संस्थेचे संचालक होते. येथेच जोसेफही वनस्पती संग्राहक म्हणून काम पाहू लागले. या काळात त्यांचे अंटार्क्टिकाच्या मोहिमेतील वनस्पतींच्या अभ्यासाचे फ्लोरा ऑफ अंटार्क्टिका हे दोन खंड प्रसिद्ध झाले.
जोसेफ हूकर यांनी पॅलेस्टाईन, मोरोक्को, पश्चिम संयुक्त संस्थाने (कॅलिफोर्निया) या ठिकाणी जाऊन वनस्पतींचे नमूने गोळा केले.
अंटार्क्टिका मोहिमेत जोसेफ हूकर यांना चार्ल्स लीलने (Charles Lyell), चार्ल्स डार्विन यांच्या व्हॉयेज ऑफ बिगल या पुस्तकाची मुद्रित प्रुफे वाचायला दिली होती. त्यातील वर्णने वाचून हूकर डार्विनच्या निसर्ग अभ्यासाने प्रभावित झाले. या कामाच्या निमित्ताने त्यांचा पत्रव्यहार सुरु झाला. त्यानंतर दक्षिण अमेरिका आणि गॅलापॅगॉस बेटांवरुन जमवलेल्या वनस्पतींचे वर्गीकरण करण्याच्या निमित्ताने डार्विन आणि हूकर यांची मैत्री झाली आणि ती आयुष्यभर टिकली. डार्विन यांच्या ओरिजिन ऑफ स्पेशिज या ग्रंथाचे लेखन चालू असतानाही दोघांमध्ये चर्चा होत होत्या. हूकर यांच्या वनस्पतींचे सूक्ष्म निरिक्षण आणि वर्गीकरणाचा अभ्यास याचे डार्विन यांनी कौतुक केले होते. डार्विन यांच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धान्ताला जाहिरपणे पाठिंबा देणारे हूकर हे पहिले शास्त्रज्ञ होते. नैसर्गिक निवडीच्या सिद्धान्तावर बरेच जाहीर वादविवाद आणि दोषारोप झाले. परंतु फक्त हूकर आणि थॉमस हेन्री हक्सले या दोघांनीच या दोषारोपांचे खंडन केले होते.
विल्यम जॅक्सन हूकर यांच्यानंतर जोसेफ हूकर रॉयल बोटॅनिकल गार्डन्स, क्यूचे संचालक झाले. जवळजवळ चव्वेचाळीस वर्षे संचालकपदावर असलेल्या पिता-पुत्रांनी रॉयल बोटॅनिकल गार्डन्समध्ये जगभरातले वनस्पतींचे हजारो नमूने गोळा करून जतन करण्याचे काम केले. क्यूच्या वनस्पती संग्रहाची कीर्ती सर्वदूर पसरली. त्यामुळे ब्रिटीश म्युझियमचा वनस्पती विभाग व क्यू या दोन्ही संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. काही काळ त्यासंबंधीच्या दोषारोपांचा पत्रव्यवहारही झाला. या पेचप्रसंगाच्या काळातही हूकर यांची रॉयल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. यावरुन सहसंशोधकांनी त्यांच्याप्रती दाखविलेला आदर आणि त्यांच्या कामाचे महत्त्व सिद्ध झाले.
जोसेफ हूकर यांना पुढील मानसन्मान मिळाले: ऑर्डर ऑफ द बाथ, ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया; प्रेसिडेन्ट ऑफ रॉयल सोसायटी; ग्रँड कमांडर ऑफ दि ऑर्डर ऑफ दि स्टार ऑफ इंडिया; ऑर्डर ऑफ मेरिट इ. याशिवाय, तीन वनस्पतींना हूकेरी आणि हूकेरिआना अशी शास्त्रीय नावे देऊन जोसेफ हूकर यांचा सन्मान केला गेला.
डार्विनचा ओरिजिन ऑफ स्पेशिज हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर हूकर यांनी केलेल्या वनस्पतींची सचित्र अभ्यासपूर्ण वर्णने आणि वर्गीकरणाच्या नोंदींना विशेष महत्त्व प्राप्त झाले. विज्ञान विचारांच्या अनिश्चित आणि संक्रमण काळाच्या पार्श्वभूमीवर जोसेफ हूकर यांचे काम अधिक प्रभावशाली आणि महत्त्वाचे ठरले.
२०१७ मध्ये जोसेफ हूकर यांची द्विजन्मशताब्दी साजरी करण्यात आली. भारतात आणि इंग्लंडमध्ये त्यानिमित्ताने व्याख्याने, प्रदर्शने आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
जोसेफ हूकर यांची ग्रंथसंपदा :
- द बॉटनी ऑफ द अंटार्क्टिक व्होयाज ऑफ एच.एम. डिस्कव्हरी शिप्स एरेबस अॅन्ड टेरर इन 1839-1843 (१८४४-६०)
- हॅन्ड बुक ऑफ न्यूझीलंड फ्लोरा (१८६४)
- फ्लोरा अँटार्टिका (१८४४ -४७, २ खंड). या ग्रंथामध्ये अँटार्टिका बेटांची वनस्पती संपदा आणि त्याचे भौगोलिक महत्त्व हूकर यांनी लिहीले आहे.
- द फ्लोरा ऑफ ब्रिटीश इंडिया (१८५५) थॉमस थॉम्ससन सहलेखक.
- ऱ्होडोडेन्ट्रॉन्स ऑफ सिक्कीम -हिमालय (१८४९ – ५१)
- फ्लोरा ऑफ ब्रिटीश इंडिया (७ खंड) (१८७२ – १८९७)
- जर्नल ऑफ अ टूर इन मोरोक्को अॅन्ड द ग्रेट अॅटलास (१८७८)
- जेनेका प्लान्टॅरम (१८६०–८३). जॉर्ज बेन्थम सहलेखक. यामध्ये २०२ वनस्पती कुळातील ७५६९ प्रजाती आणि ९७,२०५ जातीच्या झाडांचे वर्गीकरण केले आहे. प्रत्येक झाड प्रत्यक्ष पाहून हे काम केले असल्याने त्यांचे हे वर्गीकरण अतिशय विश्वासार्ह आणि सर्वमान्य झाले. जगातील अनेक महत्त्वाच्या शुष्कवानस संग्रहालयांमध्ये वनस्पतींचे नमुने या पद्धतीने मांडलेले आहेत.
संदर्भ :
- Royal Botanical Gardens, Kew
- https//www.britannica.com/biography_Dalton_Hooker
- Bentham & Hooker System of Classification.
समीक्षक : मोहन मद्वाण्णा