रानडे, सुभाष भालचंद्र
( २७ जून,१९४० – )
वैद्य सुभाष रानडे यांचे आयुर्वेदाचे शिक्षण टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथे झाले, नंतर त्यांनी एम.ए.एस्सी (M.A. Sc.) ही पदवी पुणे विद्यापीठातून संपादन केली. पदवी मिळवल्यावर त्यांनी कोकणातील पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम सुरू केले. पाच वर्षे वैद्यकीय कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी अध्यापन क्षेत्राच्या कारकिर्दीची सुरुवात पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालय येथून केली. तेथे ते विकृतीविज्ञान व कायाचिकित्सा हे दोन विषय शिकवत असत. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञानाच्या आंतरशाखीय विभागात प्राध्यापक होते. पुढे त्यांनी पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ आयुर्वेद या संस्थेमध्ये प्राध्यापक व विभागप्रमुख अशी पदे भूषविली. तसेच पुणे विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता म्हणून ते कार्यरत होते. काही काळ त्यांनी पुण्याच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यपदही भूषवले. रानडे यांची राष्ट्रपतींनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात तीन वर्षांसाठी सल्लागार म्हणून निवड केली. सध्या ते इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ आयुर्वेद या संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत.
आयुर्वेदाचा प्रसार जगभरात करत असताना परदेशातील विद्यार्थ्यांना आणि जिज्ञासूंना आयुर्वेदाचे ज्ञान भारततात घेता यावे म्हणून वैद्य सुभाष रानडे व त्यांच्या पत्नी वैद्य सुनंदा रानडे यांनी १९९६ साली इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ आयुर्वेद (आय.ए.ए.) ह्या शिक्षण संस्थेची स्थापना पुण्यात केली. आयुर्वेदाचा भारतामध्ये आणि भारताबाहेरील देशात प्रसार करणे, आयुर्वेदाचे शास्त्रशुध्द ज्ञान भारतीय तसेच परदेशातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे, आयुर्वेदासंबंधी उत्तम साहित्यनिर्मिती करणे, आयुर्वेदिय औषधांची शास्त्रशुध्द पध्दतीने निर्मिती करणे आणि आयुर्वेद आणि योग विषयासंबंधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करणे असे मुख्य उद्देश्य या संस्थेच्या निर्मितीमागे होते. ही उद्दिष्टॆ साध्य करण्यासाठी वैद्य रानडे यांनी आयुर्वेदाचे प्राथमिक ज्ञान देणारा अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. तर इतर अभ्यासक्रम शिकण्यासाठी पुण्याच्या इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ आयुर्वेद (आय.ए.ए). येथे प्रत्यक्ष येऊन शिकणे गरजेचे आहे. या संस्थेने आजपर्यंत अनेक विदेशी विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे शिक्षण दिले आहे. ते आज त्यांच्या देशात यशस्वीपणे आयुर्वेद पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत.
वैद्य रानडे यांनी आयुर्वेद आणि योग या विषयांवर इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ आयुर्वेद संस्थेतर्फे आजवर दहा पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांपैकी इंडियन आयुर्वेदिक कूकिंग व सिक्रेट ऑफ मर्म अॅण्ड पंचकर्म ही पुस्तके लोकप्रिय झाली. आयुर्वेदाचे अद्ययावत ज्ञान आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आणि शुभचिंतकांना पोहचवण्यासाठी आयुर्वेद फॉर यू नावाचे मासिक ऑनलाईन उपलब्ध आहे. जगभरात एकूण ४४,००० लोकांपर्यंत हे मासिक जाते. रानडे यांनी १५५ पुस्तके लिहिली असून ती जगातल्या १३ भाषांत अनुवादित झाली आहेत.
इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ आयुर्वेदमध्ये कार्यरत असणाऱ्या जवळजवळ ८० अध्यापकांनी परदेशी जाऊन आयुर्वेदाचे अध्यापन केलेले. ही संस्था जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, पोलंड, इस्राईल, हॉलंड, जपान, ब्राझील, चिली, यू.एस.ए ह्या देशांतील केंद्राशी संलग्नित आहे. आय.ए.ए. संस्थेमार्फत सात राष्ट्रीय आणि चार आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत.
सप्टेंबर २०१२ रोजी अॅसोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रोफेशनल्स इन नॉर्थ अमेरिका, यू.एस.ए ह्या संस्थेने आणि युरोपियन आयुर्वेद अॅकॅडमी, सिडनी ह्या संस्थेने सुभाष रानडे यांना आंतरराष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार दिले. आयुर्वेद कॉलेज, आकुर्डी यांनी त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला. इन्स्टिट्यूट ऑफ सकुरा टाक कान, स्पेन यांच्या वर्ल्ड मूव्हमेंट फॉर योग अॅण्ड आयुर्वेद यांनी त्यांना उत्तम आयुर्वेदिक चिकित्सक पुरस्कार प्रदान केला
संदर्भ :
पुस्तके –
- डॉ.सुनंदा व डॉ.सुभाष रानडे विशेषांक, आयुर्वेद पत्रिका, जाने.२०१४
- आयुर्वेद पत्रिका, फेब्रु.२०१७
वेबसाईट –
http://www.ayurved-int.com/about.html
http://ayurvedakarmayoga.com/resume/resume.htm
समीक्षक : फडके, आशिष सुधाकर