रानडे, सुनंदा सुभाष
(११ जानेवारी, १९४२ – )
सुनंदा रानडे यांनी आयुर्वेदाची बी.ए.एम.एस. ही पदवी प्राप्त केली. त्यांचे आयुर्वेदाचे शिक्षण पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी आयुर्वेदामध्ये पी.एचडी. ही पदवी संपादन केली.
कोकणातील पावस या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी कार्य सुरु केले. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा वर्षात त्यांनी जवळजवळ ६००० विषबाधेच्या रुग्णांची चिकित्सा त्यांनी केली.
सुनंदा रानडे ह्या गेली ४० वर्षे आयुर्वेदीक स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सहाय्यक संशोधन अधिकारी म्हणून भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आणि केंद्रीय भारतीय औषधी आणि होमिओपॅथी अनुसंधान परिषद येथे कार्य केले. तसेच शेठ ताराचंद रामनाथ रुग्णालय येथे १० वर्षे सहाय्यक संशोधन अधिकारी म्हणून कार्य केले. शतावरी वनस्पतीचा शूल व्याधीवर होणारा परिणाम यावर त्यांचे शोधकार्य चालू होते. गेले ४० वर्षे इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ आयुर्वेद (आय.ए.ए) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी त्या आहेत.
सुनंदा रानडे कामा करीत असलेल्या इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ आयुर्वेद संस्थेने बर्गलर स्कूल ऑफ मसाज, ग्रज, ऑस्ट्रिया ह्या संस्थेशी सामंजस्य करार केला, व त्या अंतर्गत भारतातल्या आयुर्वेद वैद्यांना ह्या संस्थेमध्ये एक वर्षाच्या आयुर्वेदिक मसाज प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले. सुनंदा रानडे या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रमुख होत्या. अथेन्स, ग्रीस येथील अल्टिमेट हेल्थ सेंटरमध्ये आयुर्वेद संबंधित विषयावर त्यांनी कार्यशाळा आयोजित केल्या. स्विस येथील इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ आयुर्वेद संस्थेशी संलग्नित केंद्रामध्ये त्यांनी दोन परिसंवादांचे आयोजन केले, तसेच तेथील रुग्णांची निदान-चिकित्सा केली. वैद्य सुनंदा रानडे यांनी सेंटर ऑफ आयुर्वेद इंडियन सिस्टिम ऑफ हिलिंग, टोरांटो येथे वुमन हेल्थ अॅण्ड डिसीज यावर परिसंवाद घेतला. आयुर्वेदविषयक कार्यशाळा मानववंशशास्त्र विभाग, मेक्सिको विद्यापीठ येथे त्यांनी आयोजित केली होती. सुनंदा रानडे यांनी मराठी भाषेमधून घरगुती औषधी आणि उपचार व संपूर्ण कायाचिकित्सा ही दोन पुस्तके लिहिली, तर इंग्लिशमधून हेल्थ अॅण्ड डिसीज इन योग अॅण्ड आयुर्वेद, हाऊ टू डिफीट डिप्रेशन, आयुर्वेदिक फिजियॉलॉजी, कन्सेप्ट ऑफ पॅथॉलॉजी इन आयुर्वेद, इंडियन आयुर्वेदिक न्यूट्रिशन व आयुर्वेदिक न्यूट्रिशन अॅण्ड कूकिंग ह्या सहा पुस्तकांचे लेखन केले. विमेन्स हेल्थ डिसीज अॅण्ड बेबी केअर इन आयुर्वेद ह्या पुस्तकाचे लेखन त्यांनी चार खंडात केलेले आहे. गायनॅकॉलॉजीकल कन्सेप्ट इन आयुर्वेद व डाएट अॅण्ड न्यूट्रिशन ही त्यांची दोन ई-पुस्तके आहेत. तसेच आयुर्वेदासंबंधी १००हून अधिक लेख त्यांनी लिहिले आहेत. हे लेख इटालियन, भारतीय, जर्मन मासिके तसेच वृत्तपत्रांतून प्रसिध्द झाले आहेत.
अॅसोसिएशन ऑफ नॅक सकुर टाक कान, स्पेन ह्या संघटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम आयुर्वेदिक शिक्षणतज्ज्ञ हा पुरस्कार सुनंदा रानडे यांना प्रदान केला. तसेच त्यांना उत्कृष्ट अध्यापनासाठी वाग्भट पुरस्कार मिळालेला आहे. आयुर्वेदच्या निरनिराळ्या विषयांवर लेखन केल्याबद्दल त्यांना पुण्याच्या वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन केंद्रातर्फे वैद्य यादवजी त्रिकमजी पुरस्कार प्रदान केला. दुबई, यू.ए.ई. येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तसेच राजकोट येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डान्सिग शिवा योग अॅण्ड आयुर्वेद स्कूल यांनी आयोजित केलेल्या स्पिरिट अॅण्ड नेचर कॉन्फरन्समध्ये वैद्य सुनंदा रानडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
संदर्भ :
- डॉ.सुनंदा व डॉ.सुभाष रानडे विशेषांक, आयुर्वेद पत्रिका, जाने. २०१४
- आयुर्वेद पत्रिका, फेब्रु. २०१७
समीक्षक : फडके, आशिष सुधाकर