चादर
मुगल शैलीच्या बागांमध्ये पाण्याला खूप महत्व असायचे. चारबाग या संकल्पनेवर आधारित या बागांमध्ये पाण्याच्या वापरामध्ये वैविध्य दिसून येते. जसे कारंजी, प्रतिबिंब जलाशय [reflecting pool] इत्यादी. चादर किंवा चद्दर हा असाच एक वैशिष्ट्यपूर्ण पाण्याचा वापर केलेला दृश्यप्रकार.

नावाप्रमाणे चादरमध्ये दगडाची लादी तिरपी ठेवून त्यावरून पाणी वाहू दिले जायचे. अर्थात यासाठी पाणी दोन वेगवेगळ्या उंचीवर स्थित जलाशयांमध्ये असायचे व वरच्यातून खालच्या जलाशयात या चादरीवरून पाणी गुरुत्वाकर्षणाने वाहायचे. चादर संगमरवर वा वाळूकाश्म [sandstone] अश्या दगडाची असायची. त्यावर एखाद्या चादरीप्रमाणे नक्षीकामदेखील कोरलेले असायचे.

या कोरलेल्या नक्षीमुळे पाणी खळखळत वाहाते व या हलत्या चादरीचे देखणे दृश्य पहावयास मिळते. त्याचबरोबर पाण्याचा खळखळणारा आवाज ही सुखद वाटतो. भारतात काश्मीरमधील शालीमार व निशात या बागांमध्ये अश्या चादरी पहावयास मिळतात.
समीक्षक : श्रीपाद भालेराव
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.