रेल्वे स्थानके

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई.

           जॉर्ज स्टीफन्सन यांनी १८१४ मध्ये इंग्लंड येथे लोखंडी रुळावर धावणारे वाफेचे इंजिन बनविले आणि रेल्वेच्या नव्या वाहतूक युगाला सुरुवात झाली. एकोणीसाव्या शतकात रेल्वे हा जमिनीवरील वाहतुकीचा सर्वात वेगवान आणि प्रभावी पर्याय जगातील सर्व देशांमध्ये पोचला आणि त्या अनुषंगाने रेल्वेशी निगडीत वास्तुकला विकसित होत गेली. सुरुवातीची स्थानके केवळ फलाट आणि जुजबी उपयोगांसाठी असणारी इमारत एव्हढ्यापुरती मर्यादित होती. मात्र जसा जसा रेल्वेचा विस्तार झाला, प्रवासी संख्या वाढली तशी तशी रेल्वे स्थानके मोठी व भव्य झाली. रेल्वेची वास्तुकला आणि वास्तुविज्ञान क्षेत्रात त्यांचे स्वत:चे वैशिष्ट्य निर्माण झाले. एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील अनेक रेल्वे स्थानकांनी प्रवास आकर्षक केला. शिवाय अनेक शहरांच्या वास्तुवैभवात त्यांनी मोठी भर घालून शहरांनाही एक सौंदर्यपूर्ण ओळख मिळवून दिली. मुंबईचे मध्यवर्ती रेल्वेचे छत्रपती शिवाजी स्थानक  आणि कार्यालयाची इमारत हे अशा वास्तुकलेचा भारतामधील सर्वोत्तम नमुना आहे. हे भव्य आणि देखणे स्थानक व  कार्यालयीन इमारत यूरोपियन गॉथिक शैलीत बांधलेली असून त्याला युनेस्कोतर्फे जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे चेन्नईचे रेल्वे स्थानक त्याच्या लाल रंगामुळे आणि वास्तू रचनेतील वैशिष्ट्यामुळे डोळ्यात भरणारे आहे.

चेन्नई रेल्वेस्थानक
लंडनचे व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशन: प्रवासी दालन.

           एकोणीसाव्या शतकापासून आजतागायत रेल्वेस्थानकांच्या वास्तुंनी देशोदेशींच्या लहान-मोठ्या शहरांना नटविले, वाढवले आणि नावारूपाला आणले. लंडनचे व्हिक्टोरिया स्थानक किंवा न्यूयॉर्कचे ग्रँड सेन्ट्रल स्थानक दगडात बांधलेले असून ते जागतिक वास्तुकलेचे उत्तम नमुने मानले जातात. काळाच्या ओघात रेल्वेस्थानकांच्या वास्तुंचे आकार, स्वरूप, शैली, बांधकाम साहित्य यात खूप विविधता आहे आणि त्यांचे महत्त्व शहरांच्या आकारानुसार बदलत गेले आहे. रेल्वेचे फलाट, प्रवासी सुविधा, प्रवाशांसाठी प्रशस्त आणि सुशोभित, हवेशीर आणि भरपूर उजेड असलेली उंच, आरामदायी प्रवासी दालने, आरामगृहे, स्वच्छतागृहे, खानपान सेवाघरे, पुस्तके आणि इतर सामानांची दुकाने, रेल्वेच्या कर्मचारी वर्गासाठी कार्यालये अशा नानाविध सोयी असलेल्या प्रवासी रेल्वे स्थानकांच्या वास्तूरचना, शैली यात सतत बदल होत होत त्यात खूप विविधता आली आहे. काही ठिकाणी त्यांना चित्रकला, शिल्पकला यांच्याद्वारे कलादालनांचे स्वरूपही दिले गेले आहे. स्पेनच्या माद्रिद ह्या राजधानीच्या शहरातील भव्य रेल्वेस्थानकात तर मोठे हरित उद्यान आहे. दोन शतकांच्या काळात रेल्वेस्थानकाच्या वास्तू शहरांची संस्कृतिक ओळख करून देणारी मानचिन्हे बनली आहेत.

स्पेनमधील माद्रिद येथील रेल्वे स्थानकातील बगीचा
बर्लिन रेल्वेस्थानक

           जर्मनीमधील एकेकाळी दुभंगलेले बर्लिन महानगर १९९० नंतर एक झाले तेव्हा तेथील जुन्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाची पुनर्रचना करण्यात आली. या स्थानकाने बर्लिन शहराला एकसंध करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. बर्लिनचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक नव्याने बांधताना पारदर्शक काचेचा विपुल वापर केला असून ते बहुमजली आणि भव्य आहे. तेथून संपूर्ण युरोपमध्ये आणि जर्मनीच्या सर्व भागात रेल्वेगाड्या येत-जात असतात. अशा फलाटांच्या वरती अनेक मजले आहेत. तेथील फलाटांवरून शहरातील मेट्रो चारी दिशांनी धावते. हे सर्व स्टेशनच्या एकाच भव्य इमारतीमध्ये सामावलेले आहे. आधुनिक वास्तुशैलीचा आणि वास्तुविज्ञानाचा नाविन्यपूर्ण आविष्कारही तेथे बघायला मिळतो. अनेक शहरात तर वाहतुकीच्या विविध साधनांसाठी, उदाहरणार्थ रेल्वे, मेट्रो, बसेस आणि विमानतळ यांच्यासाठी एकात्मिक स्थानके विसाव्या शतकात निर्माण झाली आहेत.

संदर्भ :

वेबसाईट –

 

समीक्षक : श्रीपाद भालेराव.