सचित्र हस्तलिखिते : हस्तलिखित ग्रंथ लेखनाचे प्रमुख कारण ज्ञानार्जन हे असले तरी ज्ञान कलेच्या सहाय्याने ते अधिक समृद्ध करण्याची हौसही तत्कालीन लेखनिकांना होती हे ग्रंथ पाहिल्यावर लक्ष्यात येते. लिखाणातील नीटनेटकेपणा, रेखिव अक्षर याबरोबर कधी चित्र तर कधी नक्षी यातून मध्ययुगीन कलेचा व्यासंग दिसून येतो. काही ठिकाणी केवळ एका रंगात एकेरी रेषेत चित्र चितारलेली असतात तर काही ठिकाणी अनेक (हस्तलिखितांची साधने) रंगांचा वापर करून पूर्ण उठावात चित्र काढलेले असते.

एकरंगी चित्रात काळा, दुरंगी चित्रात काळ्याबरोबर लाल रंग, बहुरंगी चित्रात विविध रंगाबरोबर सोने-चांदी यांचा वापर केलेला आढळतो. ही चित्र वास्तववादी शैलीला धरून काढलेली नसतात.अशा चित्रांमध्ये लयबद्ध रेषेत कलात्मक पद्धतीने चित्रण केलेले दिसते; त्यामुळे अनेकदा व्यक्ती किंवा प्राण्यांची चित्रे प्रमाणबद्ध नसतात. बहुतांश हस्तलिखितग्रंथ हे धार्मिक किंवा पौराणिक साहित्य असल्याने यातील चित्रांचे विषय देखील त्या कथांना अनुसरून असतात. योगादी विषयांवरच्या हस्तलिखितात मानवाकृती तर तांत्रिक विषयांवरच्या हस्तलिखितात आकृत्या असतात. ग्रंथाचे लेखन पूर्ण झाल्यानंतर तो ग्रंथ चित्रकाराकडे देत असावेत असा अंदाज चित्र अर्धवट राहिलेल्या हस्तलिखितावरून करता येतो. अनेकदा शास्त्री-पंडित स्वतःच्या वाचनासाठी स्वतः पोथी लिहित असत. अशा हस्तलिखितांमध्ये एकेरी रेषेतील चित्र अथवा नक्षी आढळते. पण जी हस्तलिखिते विक्रीसाठी तयार केली जात त्यामध्ये उठावदारपणे नानाविध रंगांनी रंगवलेली चित्र असत. ती व्यावसायिकांकडून विकत घेतली जात असावीत.

चित्रांमधील वैविध्य सर्वत्र आढळत असले तरी साधारणतः पुढीलप्रमाणे चित्रांची विभागणी करता येते.

  • देवी-देवता – ग्रंथात अतिशय लयदार व नाजूक रेषांमध्ये देवतांची चित्रे काढलेली असतात. अनेकदा ही चित्रे काळ्या रंगाने काढलेली असून काही ठिकाणी, काही आकारांसाठी लाल रंगाचा वापर केलेला असतो. या देवतांमध्ये प्रामुख्याने गणेश, हनुमान, दुर्गादेवी, नाग आढळतात. प्रथम पत्रावर ही चित्रे असली तर लेखन दुसऱ्या पत्रापासून सुरु केले जाते. आपापल्या वाहनासह देवता, त्यांच्या बाजूला चवरीधारी, पूजा करणारी स्त्री असे या चित्रांचे साधारण स्वरूप असते. या चित्रांचे एका रंगात अथवा अनेक रंगात असे दोन्ही प्रकार आढळतात. कथा-प्रसंगानुरूप देवता आल्या तर चौकोनात चित्र काढून त्याच्या सभोवती लेखन केले जाते, ही चित्रे पूर्ण उठावात बारकाव्यांनिशी सुंदररित्या रेखाटली व रंगवलेली दिसतात.
  • राक्षस – पौराणिक कथांमध्ये देवता राक्षसांचा वध करताना आढळतात. अक्राळविक्राळ चेहरा, दातांचे सुळे, डोक्यावरचे केस उभे अशी साधारण राक्षसांची आकृती आढळते. वैद्यक विषयांवरच्या ग्रंथात विषाणू हे राक्षस रुपात काढलेले दिसतात. ज्वराचे प्रकार सांगताना राक्षसरूपाने ते दाखवले जातात.
  • राजा – पौराणिक कथा-प्रसंगानुरूप काही हस्तलिखितात राजा सिंहासनावर बसलेला डोक्यावर मुकुट आदी सोन्याचे अलंकार धारण केलेला असतो.
  • मानवाकृती – योगादी विषयावरील ग्रंथात विविध आसन प्रकार सांगताना मानवाकृती काढलेल्या असतात. एका रेषेत आणि एका अथवा दोन रंगात ही चित्र असतात.
  • आकृत्या– तंत्र तसेच फलितज्योतिष या विषयावरील काही हस्तलिखितात यंत्रसम आकृत्या असतात. शुल्बसूत्र आणि तत्संबंधी ग्रंथात यज्ञवेदी प्रकार काढलेले असतात. यात एक अथवा दोन रंगाचा वापर आढळतो.
  • विविध नक्षी – ग्रंथात अनेक प्रकारच्या नक्षी बघायला मिळतात. प्रत्येक ग्रंथातील नक्षी ही वेगळी असते; परंतु काही ग्रंथात तर प्रत्येक अध्यायानंतर नक्षीचे वैविध्य दिसून येते. पाने-फुले इत्यादींचे नानाविध आकार सर्जनशीलतेचे नमुने असून रंगकामातील वैविध्य देखील वाखाणण्याजोगे असते. लाल, काळा, क्वचित हिरवा इत्यादी मोजक्याच रंगात चित्र सौंदर्य जपले जाते. काही ठिकाणी केवळ बाह्यरेषांद्वारे (आउटलाईन), तर काही ठिकाणी पूर्ण रंगकाम व बारकावे यांमधून नक्षी तयार केलेली दिसते. अलंकारिक, नैसर्गिक व सृजनशील या तीन प्रकारांमध्ये या नक्षींची विभागणी करता येते.बहुतांश नक्षी हस्तलिखिताच्या चार बाजूंनी (बॉर्डर) काढलेल्या असून काही हस्तलिखितात केवळ मध्ये, खाली वा वर रेखाटल्या आहेत. काही नक्षी दाट असून त्यात अनेक आकार असतात. तर काही विरळ, एका रेषेत असतात. काही नक्षींची रचना कमानीसारखी चार कोपऱ्यात आढळते. अशा नक्षी हस्तलिखितांची शोभा तर वाढवतातच पण त्याबरोबर त्यांच्यामधील वैविध्य, रचना, रंगसंगती, रेखाटन इत्यादी वैशिष्ट्य निश्चितच अभ्यासपूर्ण ठरतात.
  • प्राणी-पक्षी व इतर – देवतांचे वाहन अथवा सुशोभीकरणासाठी प्राणी-पक्षी काढलेले दिसतात. प्राण्यांमध्ये घोडा, बैल, वाघ असून पक्ष्यांमध्ये पोपट, मोर यांसारखे पक्षी चितारलेले दिसतात. हा वेगळेपणा ठळकपणे जाणवतो. प्राणी-पक्षी आदीच्या शरीरशास्त्राचा प्राथमिक विचार यात दिसून येतो, तसेच रेषेच्या कौशल्यपूर्ण वापराची साक्ष पटते.

हस्तलिखितातीलही चित्र आणि आकार पाहिल्यावर ते केवळ सुशोभीकरणापुरते मर्यादित न रहाता हस्तलिखितांचे मर्म देखील यात काही प्रमाणात साठवले गेले आहे असे दिसते. “ग्रंथाची समाप्ती करताना ती वर्खाने सजवणे, ग्रंथाच्या खाली-वर घालण्यासाठी मलबारी सागवानाच्या फळ्या घोटून त्यावर उंची चित्रे चितारणे अशा विविध आकर्षक प्रकारांनी केलेली असते.” असे समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान आणि कला यांचा सुंदर मिलाफ हस्तलिखितग्रंथसंग्रहात आढळतो.

पहा : शोभित हस्तलिखिते

संदर्भ :

  • जोशी महादेवशास्त्री,भारतीय संस्कृती कोश, खंड १०, भारतीय कोश मंडळ, पुणे, तृतीय आवृत्ती, २००२.

समीक्षक : निर्मला कुलकर्णी