भूदृश्यकला, वास्तुविज्ञानातील :

डलास वस्तुसंग्रहालय, भूदृश्यकला निष्णात – डॅन किले.

परिसर व मोकळ्या जागांचे नियोजन व त्यांचा आराखडा बनविणे अशी असली तरी तिची व्याप्ती प्रादेशिक, शहर, इमारत संकुल तसेच संकुलांमधील छोट्यामोठ्या जागांच्या नियोजनापर्यंत असते. हे नियोजन करताना दृक् सौंदर्याबरोबर पर्यावरणाचे भान, सामाजिक गरजा इत्यादी बाबींचा विचार यात होत असतो. शाश्वत व टिकाऊ असा रहिवासी परिसर निर्माण करणे असा उद्देश असतो.

इंदिरा गांधी यांचे स्मारक, ‘शक्तीस्थळ’, भूदृश्यकला निष्णात – रवींद्र भान.

प्रादेशिक स्तरावर एखाद्या प्रदेशाचा नियोजन आराखडा बनविताना त्या प्रदेशाची नैसर्गिक / भौगोलिक  स्थिती, जडणघडण, संवेदनशील घटक, मानवनिर्मित वारसा घटक, स्थानिक लोकजीवन, हवामान इत्यादींचा विचार होणे गरजेचे असते. भूदृश्यकला निष्णाताचे काम हे नगर नियोजनकार याचे बरोबर समन्वयाने झाल्यास विकास होत असताना नैसर्गिक संपत्तीचे यथोचित संवर्धन व जोपासना होऊ शकते. नवीन शहर वसविताना वा शहराचा विकास आराखडा बनविताना देखील भूदृश्य कलानिष्णात शहरस्तरीय नैसर्गिक संपत्तीचा विचार करून मोकळ्या जागांचे आरक्षण करण्यात, विविध जमिनींच्या वापराविषयक निर्णय घेण्यात मोलाचे योगदान करतो. प्रकल्पासाठी जागेच्या निवडीपासून त्या जागेवर इमारतीचे स्थान निश्चित करून मोकळ्या जागांचे नियोजन करण्यापर्यंत भूदृश्यकला विशारदाचे काम विस्तृत असते.

जमिनीचे उतार, भूभागांचे आकार, वनस्पती, पाणी, खडक, वाळू असे नैसर्गिक घटक तसेच मानवनिर्मित घटक जसे भिंती, फरशी, जाळी, मांडव, आच्छादने, असे विविध घटक वापरून उपयुक्त मोकळ्या जागा, उद्याने, क्रीडांगणे, आदिंचे नियोजन केले जाते. मानवाचा हस्तक्षेप न झालेले भूदृश्य याला नैसर्गिक भूदृश्य म्हणतात तर ज्या दृश्याचे निर्माण जाणीवपूर्वक केले गेले आहे त्याला मानवनिर्मित भूदृश्य म्हणतात.

आदिमानवाचा पृथ्वीवरील अस्तित्वापासून सभोवतालातील भौगोलिक घटकांशी संबंध आला आणि या संबंधातून त्याने तो परिसर स्वत:साठी अनुकूल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. जसे काटेरी कुंपण लावून घराचे रक्षण, शेती व उपयुक्त वनस्पती लागवड, इत्यादी. उपयुक्त असे भूदृश्य घडवण्याचे मानवाचे प्रयत्न पुढे वेळोवेळी व विविध ठिकाणी निरनिराळ्या स्वरूपात व्यक्त झाले. रोमन प्रासादांची उद्याने, जपानी चहापानाच्या बागा, मुघल चारबागा, देवराया, नद्यांचे घाट अशा विविध ठिकाणी आपल्याला भूदृश्यकलेच्या प्रवाहाचे ठसे पहावयास मिळतात.

भूदृश्यकला जरी प्राचीन काळापासून अस्तित्वात असली तरी ‘भूदृश्यकला निष्णात’ ही उपाधी सर्वप्रथम फ्रेडरिक ओल्म्सटेड या १९ व्या शतकातील अमेरिकन रचनाकाराने वापरली. त्याआधी उद्यानतज्ज्ञ, बागकाम करणारा अशी ओळख या व्यावसायिकांना होती. १८९६ साली ‘अमेरिकन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्टस’ची स्थापना झाली. १९२७ साली ‘इंटरनशनल फेडरेशन ऑफ लँडस्केप आर्किटेक्टस’ची स्थापना करण्यात आली. ‘इंडिअन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्टस’ या भारतातील भूदृश्यकला निष्णातांची संस्था २००३ मध्ये स्थापन झाली. रवींद्र भान, मोहम्मद शहीर, प्रभाकर भागवत, किशोर प्रधान, सतीश खन्ना, राम शर्मा हे भारतातील काही ज्येष्ठ भूदृश्यकला निष्णात होत.

या विद्याशाखेच्या नावात ‘कला’ असले तरी, भूदृश्यकला निष्णाताला विविध शास्त्र व तंत्रज्ञान यांची ओळख असणे आवश्यक असते. जसे वनस्पतीशास्त्र, माती व भूगर्भशास्त्र, पर्यावरणशास्त्र, बांधकाम तंत्रज्ञान या विद्याशाखेला प्रवेश हा प्रामुख्याने वास्तुविद्यांना दिला जातो, परंतु या विद्याशाखेच्या आंतरविद्याशाखीय स्वरूपामुळे वनस्पतीशास्त्रज्ञ, नगर रचनाकार, भूगोलतज्ज्ञ यांना देखील या विद्याशाखेत प्रवेश दिला जातो. मात्र त्यासाठी त्यांना आरेखन व सौंदर्यशास्त्राची मूलतत्त्वे यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

या विद्याशाखेबाबत जनसामान्यांत गैरसमज आहेत. जसे – भूदृश्यकला निष्णात हा केवळ झाडे-झुडपे लावतो, हरितकरण करतो, त्याचे काम इमारत बांधून झाल्यानंतर सुशोभिकरण करणे इ. असते. परंतु या क्षेत्राचा कार्यविस्तार आणि व्याप्ती बघता हा संकुचित दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे.

संदर्भ :

समीक्षक : श्रीपाद भालेराव