गउडवहो : (गौडवध). महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ऐतिहासिक महाकाव्य. इ.स. ७६० मध्ये महाकवी वाक्पतिराज अथवा बप्पइराअ यांनी या काव्याची रचना केली.याला प्रबंधकाव्य म्हणूनही ओळखले जाते.कनौजचा राजा यशोवर्मा याच्या दरबारात वाक्पतिराज कवी होते. राजा यशोवर्माने गौड (मगध) देशाच्या एका राजाचा वध केला. या प्रसंगावर आधारित राजाची प्रशंसा करण्यासाठी या काव्याची रचना करण्यात आली आणि म्हणून याचे नाव गौडवध असे आहे. काव्याची रचना आर्या छंदामध्ये केली आहे. या काव्यात एकूण १२०९ गाथा आहेत. या महाकाव्याच्या भागांना कुलक म्हटले जाते. त्यातील गाथांची संख्या समान नसून सर्वात मोठ्या कुलकात १५० गाथा तर सगळयात लहान भाग ५ गाथांचा आहे. या काव्यातील ७९९ व्या गाथेत कवीने ८ व्या शतकातील भवभूती या प्रसिद्ध संस्कृत कवीची स्तुती करून त्याला समकालीन म्हटले आहे. तसेच ८२९ व्या गाथेत सूर्यग्रहणाचा उल्लेख येतो. प्रसिद्ध जर्मन विद्वान हेर्मान याकोबी यांनी या सूर्यग्रहणाचा काळ इ.स. ७३३ असा निश्चित केला आहे. या सर्व पुराव्यांवरून कवी वाक्पतिराज याचा काळ ८ व्या शतकाचा पूर्वार्ध मानता येऊ शकतो.

या काव्याचे मंगलाचरण ६१ गाथांचे असून त्यात विष्णू, गणपती, गौरी, सरस्वती, लक्ष्मी इत्यादी देवतांची स्तुती केलेली आहे. त्यानंतर कवीने प्राकृत काव्य आणि कवींचे महत्त्व सांगितले आहे. कवीच्या पूर्ववर्ती असणाऱ्या भवभूती, भास, कालिदास, सुबंधू यासारख्या कवींचा यात उल्लेख येतो. कथानकाच्या सुरुवातीला कवीने राजा यशोवर्माची खूप प्रशंसा केली आहे, त्याला विष्णूचा अवतार मानले आहे. ९३ गाथांमध्ये कवीने यशोवर्माच्या दिग्विजयाचे, सामर्थ्याचे आणि सौंदर्याचे अतिशय काव्यात्मकरित्या वर्णन केले आहे. राजा यशोवर्मा याला विष्णूचा अवतार मानले आहे तसेच स्वर्गातील समृद्धीचे वर्णन केले आहे. यशोवर्माने पराजित केलेल्या शत्रूच्या विधवा बायकांच्या विलापाचे वर्णन कारुण्याने भरलेले आहे. वर्षा ऋतु संपल्यावर यशोवर्मा दिग्विजयाला बाहेर पडतो. यानंतर शरद ऋतू, हेमंत ऋतूचे तसेच विन्ध्यवासिनी देवीचे वर्णन येते. यशोवर्माने हल्ला केल्यावर गौड देशाचा राजा घाबरुन पळून जातो; परंतु शेवटी युद्धात तो मारला जातो. गौड राजाचा वध हीच या काव्यातील प्रमुख घटना आहे. या युद्धानंतर यशोवर्मा वंगदेशाला जातो. कवीने यानंतर पारसिक, कोकण, नर्मदा, मरुदेश, कुरुक्षेत्र, अयोध्या इत्यादी ठिकाणांच्या दिग्विजयाचे वर्णन केले आहे. वंग राजाला हरवल्यानंतर तो दक्षिणेला समुद्राकाठी जातो. पारसिक जनपदाच्या राजाला हरवून कोकण जिंकून तो नर्मदेच्या तीरावर येतो. या नंतर मरुदेश, श्रीकंठ, कुरुक्षेत्र, आणि अयोध्या जिंकून उत्तर दिशेला जातो. या वर्णनांमध्ये तलाव, नदी, पर्वत, जंगले इत्यादींचे काव्यात्मकरितीने चित्र रेखाटले आहे. राजा यशोवर्माची ही विजययात्रा महाकवी कालिदासाच्या रघुवंश  या काव्यातील महाराज रघूच्या दिग्विजयाची आठवण करून देते. सर्वप्रथम गौड (मगध) देशाच्या राजाचा वध करून नंतर त्याने वंगराज, कोकण, मरुदेश, महेंद्रपर्वत येथील रहिवासी या सर्वांवर कसा विजय मिळवला याचे वर्णन येते. दिग्विजयाच्या शेवटी राजा यशोवर्मा कनौजला परत गेला. मात्र या काव्यात राजाच्या त्यानंतरच्या जीवनाचे वर्णन नाही तसेच गौडराजाच्या वधाचे पूर्ण वर्णन यात मिळत नाही, यावरून गौडवध या काव्याचे उपलब्ध कथानक संपूर्ण नसावे असे काही विद्वानांचे मत आहे.

नंतरच्या ३७ गाथांचा भाग कवी प्रशस्तीचा आहे. ज्या प्रमाणे सर्वप्रकारचे पाणी समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्रापासून उत्पन्न होते, त्याप्रमाणे सर्व भाषांचा उगम प्राकृत भाषेपासूनच होतो, प्राकृत भाषा ही सर्व भाषांचे मूळ आहे असे प्रतिपादन करून कवीने प्राकृत काव्याची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. काव्याच्या शेवटी कवीने स्वत:ची प्रशस्ती लिहिली आहे.या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात जीवनातील सुखद आणि दुख:द अशा दोन्हीही प्रसंगांचे चित्रण सारख्याच कुशलतेने केलेले दिसून येते. एकीकडे विजययात्रेतील नदी, पर्वत, तळी इत्यादी निसर्गाचे काव्यात्मक वर्णन येते तर दुसरीकडे शत्रू पक्षाच्या विधवांच्या विलापाचे हृदयद्रावक चित्रण येते. ऋतू, जंगले, पर्वत, सरोवर तसेच संध्याकाळच्या दृश्यांची अलंकारिक वर्णने यात आहेत. याचबरोबर निसर्गाच्या अतिशय तरल वर्णनांमुळे हे काव्य एक उत्कृष्ट महाकाव्य म्हणून ओळखले जाते. या काव्यात रूपक,उपमा,उत्प्रेक्षा,दृष्टांत,वक्रोक्ती इत्यादी अलंकारांचा यथायोग्य वापर केलेला दिसून येतो.

हे काव्य ना पौराणिक आहे ना ऐतिहासिक. याचे मूळ कथानक लहान असले तरीही त्याचा विस्तार मात्र मोठा आहे. महाकाव्याची पारंपरिक लक्षणं यात फारशी दिसत नसली तरीही, राजा यशोवर्माची प्रशस्ती लिहिताना कवीने अतिशय भावपूर्ण वर्णन केले आहे. राजघराण्यातील अधिकारी आणि इतर श्रीमंत लोकांशी कवीचा जास्त संबंध आलेला असावा, कारण त्या अनुभवांवर आधारित खूप सविस्तर वर्णने यात येतात. तसेच मनुष्य स्वभावाचे आणि प्रवृत्तीचे यथायोग्य चित्रण या काव्यात दिसून येते. त्यामुळेच गउडवहो हे प्राकृत महाकाव्याचे एक विशेष उदाहरण म्हणून मानले जाते. हरीपाल यांनी या काव्यावर गौडवधसार  नावाची टीका लिहिली आहे. जैसलमेर, राजस्थान येथील जैन भांडारात हरिपालरचित गौडवधसारच्या हस्तलिखिताची संस्कृत भाषेतील आणि देवनागरी लिपीतील प्रत आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेजमधेही गउडवहोचे ११० पृष्ठांचे एक हस्तलिखित आहे. हे हस्तलिखित प्राकृत भाषेत असून समासात संस्कृतमध्ये टिपा लिहिल्या आहेत.

संदर्भ :

  • Utgirkar, Narayan Bapuji (Edi.), The Gaudavaho, A Prakrit Historical Poem by Vakpati, Bombay Sanskrit and Prakrit Series No. XXXIV, Bhandarkar Oriental Research Institute, Pune,1927.
  • जैन,जगदीशचंद्र, प्राकृत साहित्य का इतिहास,चौखंबा विद्याभवन, वाराणसी,१९६१.
  • जैन, प्रेमसुमन, प्राकृत रत्नाकर, राष्ट्रीय प्राकृत अध्यपन एवं संशोधन संस्थान, श्रवणबेळगोळ, २०१२.

समीक्षक : कमलकुमार जैन