कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, मुळा अशा मोहरीवर्गीय वनस्पतीत ग्लुकोसिनोलेटे हे नायट्रोजन आणि सल्फरयुक्त रसायन आढळून येते. मोहरीच्या तेलाला येणारा विशिष्ट दर्प हा ग्लुकोसिनोलेटांच्या संयुगामुळेच प्राप्त होतो. सल्फर ऑक्झाइडे आणि सल्फर – β – D – ग्लुकोपायरेनोज साखळी ही ग्लुकोसिनोलेटांचा मुख्य गाभा असून त्याला जोडल्या जाणाऱ्या विविध प्रथिनकांच्या उपसाखळ्या या ग्लुकोसिनोलेटांमधील वैविध्याला कारणीभूत असतात. या उपसाखळ्यांच्या आधारे ग्लुकोसिनोलेटांचे वर्गीकरण मुख्यत्वेकरून : (अ) मिथिओनिनजन्य ग्लुकोसिनोलेटे; (आ) ट्रिप्टोफेनजन्य इंडोल ग्लुकोसिनोलेटे आणि (इ) फेनिल ॲलॅनीन किंवा ट्रायोसिनजन्य ग्लुकोसिनोलेटे  या तीन गटांत केले जाते.

ग्लुकोसिनोलेटे हे मुळात विषारी नसतात, त्यांच्यातील विषारीपणा आयसो-थायोसायनेट या घटकामुळे येतो. ग्लुकोसिनोलेटांमधून आयसो-थायोसायनेट अलग होतानाची रासायनिक अभिक्रिया मायरोसिनेज या थायोग्लुकोसायडेज गटातील उत्प्रेरकामुळे घडते. हे मायरोसिनेज उत्प्रेरक आणि ग्लुकोसिनोलेटे एकाच वनस्पतीत पण वेगवेगळ्या पेशीत साठविले असतात. त्यामुळे त्यांच्यात प्रक्रिया होऊन स्वत:लाच मारक ठरेल असे विषारी आयसो-थायोसायनेट तयारच होत नाही. रसवाही पेशींच्या जवळपास असलेल्या सल्फरसमृद्ध पेशीत ग्लुकोसिनोलेटे तर रक्षक पेशीत मायरोसिनेजची साठवण केलेली असते. कीटकासारख्या भक्षकाने ही पाने चावण्यास सुरुवात केली की, हे कप्पे फोडले जातात आणि दोन्ही रसायने एकत्र येऊन आयसो-थायोसायनेट हा स्फोटक पदार्थ तयार होतो. आयसो-थायोसायनेट म्हणजेच मोहरीचे तेल असल्यामुळे मोहरीच्या तेलाचा बॉम्ब या नावाने ही प्रक्रिया प्रसिद्ध आहे. आयसो-थायोसायनेटच्या सेवनामुळे कीटकाच्या अळीची वाढ आणि विकास प्रक्रिया मंदावते आणि हळूहळू अशक्तपणा वाढून त्यांचे मरण ओढवते. याशिवाय आयसो-थायोसायनेटाची प्रथिनातील ॲमिनो अम्ल घटकांशी प्रक्रिया होऊन सल्फर-सल्फर गटातील बंध मोडले जाऊन ऑक्सिडीकर उद्रेक होतो आणि त्यामुळे वनस्पति-भक्षकांचा नायनाट होतो.

                                                                                                                                                                                                                           समीक्षक : डॉ. बाळ फोंडके