जगभरात इतर वसाहतींच्या राज्यात ज्याप्रमाणे पाश्चात्य वास्तुकलेचा तसंच प्रादेशिक आणि देशीय वास्तुकलेचा परिणाम झाला तसाच तो भारतीय बंगल्याच्या वास्तुकलेवरही झाला. १९२० ते १९३० च्या सुमारास शहराच्या बाह्यभागाच्या विस्तारास सुरुवात झाली. गृहनिर्माण सोसायट्या, प्लॉटचे आराखडे करून केलेले जमिनींचे विकसन आणि आधुनिक जगातल्या यांत्रिक वाहतुकीसाठी केलेली शहर रचना याचबरोबर वीज आणि रेडिओ यांची तोंडओळख या काळात घडली. सिनेमे आणि नियतकालिके यामधून आधुनिक घरे, त्यांची अंतर्गत रचना आणि सजावट या गोष्टींशी जनसामान्यांना परिचय होत होता. साध्या रंगीत पुस्तिकांमधून सिमेंट कॉंक्रीटमध्ये बांधलेल्या बंगल्यांचे आराखडे आणि त्रिमितीय देखावे यांचे दर्शन घडत असल्यामुळे सिमेंट हे लोकप्रिय बांधकाम साहित्य होऊ लागले होते. प्रदर्शने आणि व्याख्यानमाला यातून पाश्चात्य धाटणीची, आधुनिक जीवनशैलीशी साजेशी अंतर्गत सजावट भारताच्या शहरी भागात लोकप्रिय होऊ लागली आणि बंगले बांधणारा एक मोठा ग्राहकवर्ग त्यातून निर्माण झाला. १९३० च्या दशकात भारतीय स्वातंत्र्य चळवळ मोठ्या जोमात होती आणि याचाच परिणाम म्हणून बंगल्यांच्या बाह्य भागात परंपरागत प्रतिकचिन्हांचं पुनरुत्थापन होऊ लागलं. या काळात बंगल्यांमध्ये मानवी प्रमाण, उतरत्या छपरांचे भिंतीबाहेर आलेले भाग, कमानी, अश्वमुखी (corbelled) बांधकाम, पूर्वनिर्मित काँक्रीटच्या नक्षीदार जाळ्या, हिंदू आणि मुस्लिम वास्तुकलाशास्त्रातली काही प्रतिकचिन्हे यामुळे बंगल्यांची विशेष वेगळी प्रतिमा निर्माण झाली. आधीच्या काळात सममित आणि नंतरच्या काळात असममित वास्तुरचना पाहावयास मिळतात. या सगळ्या बदलाच्या परिणामस्वरूप भारतीय आर्ट डेको शैली निर्माण झाली. अजूनही नोकरवर्गाच्या खोल्या बंगल्याच्या मागच्या बाजूसच होत्या, पण आता स्वयंपाकघर घराचा मुख्य भाग बनलं. हा बदल मुख्यत्वे करून, ज्या वर्गाकडे नोकरचाकर कमी होते अशा मध्यमवर्गीयांच्या घरात दिसून आला. आता प्लॉटच्या जागेच्या आकारमानातही मोठा बदल दिसू लागला. विसाव्या शतकाच्या प्रारंभाला जिथे राजेशाही आणि श्रीमंतवर्गीयांसाठी काही एकर जागेमध्ये बंगले बांधले जात होते, त्याजागी आता मध्यमवर्गीयांचे ४५०० ते १३५०० चौरस फुट जागेतले बंगले दिसू लागले. यूरोपीय आणि अमेरिकन प्रतिमांच्या प्रभावामुळे व्यापारी इमारतीत आर्ट डेको शैली प्रतिबिंबित होऊ लागली होती, ती आता बंगल्याच्या रचनेतही डोकावू लागली. प्रभावी आडव्या आणि उभ्या पट्ट्याच्या रचना, वक्र रेषांचा धाडसी वापर, सौम्य रंगछटा आणि असममित रचना यामुळे एक अनोखीच शैली भारतीय बंगल्यामध्ये अवतरली. या काळातल्या बंगल्यामध्ये गोलाकार व्हरांडे आणि त्यावर गोलाकार सज्जा अशी बहुतांश वेळा रचना केलेली असे. गोलाकार त्रिमितीचा जिन्यासाठीही वापर केलेला असे. जहाजाच्या प्रतिमेने प्रभावित असल्यागत या घरांच्या कठड्यांच्या रचनेमध्ये वरच्या भागात गोलाकार पाईपचा वापर केल्यामुळे ते नाजूक आणि तरंगते वाटत असत. सपाट गच्च्या, चमत्कृतीपूर्ण नक्षीकाम, उठावदार प्रतिके, लोखंडाच्या नक्षीदार जाळ्या आणि बांधकामातच केलेली अंतर्गत सजावट ही या शैलीची प्रमुख वैशिष्ट्ये होत.
घरांच्या त्रिमित रचनेची, तसेच त्यातल्या खिडक्या आणि दारांच्या रचनेची एक वेगळीच परिभाषा निर्माण झाली. टेरॅझो (terrazzo), काचेच्या विटा, कोरीवकाम केलेली काच (etched glass), दिवे यांचाही बदलत्या आराखड्यासोबत समावेश झाला. एकीकडे ओतीव लोखंडाचा वापर कमी झाला तर दुसरीकडे प्लायवुडचा वापर प्रचलित झाला. पुढे काही बंगल्यांची रचना ही आंतरराष्ट्रीय शैलीमध्ये झाली. आता १९४७ साली भारतीय स्वातंत्र्याची चाहूल लागताच बंगल्यांची वास्तुशैली नव्या तत्त्वांचा अंगीकार करू लागली.
बंगल्यांच्या रचनेतील प्रादेशिक बदल : बंगला ही सर्व प्रादेशिक सीमा ओलांडणारी आणि कोणत्याही इतर वास्तुप्रकाराला मिळालेल्या लोकप्रियतेपेक्षा जास्त लोकप्रियता मिळालेली वास्तुरचना आहे. त्याची अनुकूलनक्षमता (Adaptability ) आणि वैविध्यपूर्णता (versatility) हे त्याच्या यशाचं गमक म्हणता येईल. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच एतद्देशीय कामगार, तंत्रज्ञान आणि साधनसामुग्री यांचा वापर यामुळे बंगाल्यांचं बांधकाम स्वस्त आणि रचनेच्या दृष्टीने लवचिक होतं. बंगल्याचं मूळस्वरूप जरी थोड्या फार फरकाने तसंच राहिले तरी राजकीय, सामाजिक-सांस्कृतिक आणि विशेषत्वे हवामान बदलानुसार त्याच्या स्वरूपात थोडे फार बदल होत गेले. अगदी मोठ्या शहरापासून ते छोट्या गावापर्यंत त्या त्या परिस्थितीत अनुकूल असे बंगले बांधले गेले. राजकीय, सामाजिक-सांस्कृतिक बदलानुसार या बंगल्यांचा प्लॉटचा आकार, घराचा आकार, भव्यता आणि रचनेतली क्लिष्टता अनुरूप अशी केली गेली. केरळमध्ये बंगल्याना तीव्र उताराची आणि दोन पातळ्यांमधे छपरे असत, तर हिमाचल प्रदेशात थंड हवामानास अनुकूल घरे असत आणि अंदमान बेटांवर उष्णकटिबंधीय हवामानास अनुकूल अशी जवळजवळ पूर्णपणे लाकडात बांधकाम केलेली आणि जमिनीपासून उंचावर बांधलेली असत. गुजरातसारख्या उष्ण आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशातले बंगले हे विटा आणि चुन्याच्या भिंती, गच्च्यांची मालिका, दारे आणि खिडक्यांचे नियंत्रित आकार आणि सज्जे, व्हरांडे यासारख्या अर्ध-अच्छादित मोकळ्या जागा अशी वैशिष्ट्यपूर्ण असत. बंगळूरमधील बंगले हे आजही त्यातल्या जाळीकामातील तपशिलांची आणि माकड-छतांसाठी (monkey top roofs ) प्रसिद्ध आहेत. व्ही. आय. अय्यर आणि व्ही. सी. मेहता यासारख्या लेखकांनी प्रादेशिक भांषांमधून लिहिलेल्या पुस्तकांमधून बंगल्यांच्या संकल्पनांचा प्रसार झाला. लोकवास्तुकला आणि पाशात्य शैली यांच्या संगमातून भारतीय ब्रिटिशकालीन बंगल्याना संमिश्र रूप प्राप्त झालं. फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी देखील बंगला या घराच्या प्रकाराचा अंगीकार केला. पाँडिचेरी, दिव, दमण आणि गोवा येथले बंगलेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
आधुनिक बंगले : एकोणिसशे पन्नास ते सत्तर या दशकांत बंगल्यांच्या शैलीची आणखी एक लाट आली. तंत्रज्ञान आणि आर्थिक बदलांमुळे बंगल्यांच्या वास्तुशैलीतही पाश्चात्य देशांप्रमाणे आधुनिक शैलीचा अविष्कार दिसू लागला. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि भरडशैलीमध्ये बांधलेले बंगले दिसू लागले. आता बंगल्यातल्या सुशोभीकरणाचा आणि नक्षीकामाचा भाग वगळला जाऊन त्याजागी बांधकाम साहित्य त्याच्या नैसर्गिक रूपात प्रदर्शित करण्यावर भर दिसू लागला. पूर्वीच्या काळात दिसणारी उतरती छपरे आता सपाट झाली, द्वारमंडप, व्हरांडे आणि सज्जे हे घटक जरी तसेच राहिले तरी वास्तुशैलीची एक वेगळीच परिभाषा या काळात उदयास आली. १९८० च्या दशकात शहरी भागातल्या जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आणि बंगले बांधण्याचा प्रघात कमी झाला. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त घरे बनविण्याच्या दृष्टीने घरांचे इतर प्रकार उदयास आले. आता बंगल्यांऐवजी जिन्याने चढता येऊ शकतील अश्या सदनिका (Walk up Apartments), एका रांगेतली घरं (Row Houses) आणि उंच इमारती (High-Rise Buildings) बांधल्या जाऊ लागल्या. तरी आजदेखील बंगले हा सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा वास्तुप्रकार आहे. परंतु, शहरातल्या जमिनीच्या वाढत्या किमती आणि बांधकामाचा अवाढव्य खर्च यामुळे बंगले ही केवळ श्रीमंतवर्गीयांनाच परवडू शकेल अशी गोष्ट झाली आहे. गर्भश्रीमंतवर्गीय लोक ज्यांना शहरात जमीन घेणे परवडू शकते ते त्यांच्या रुचीनुसार आधुनिक शैलीतले किंवा यूरोपियन शैलीतले भव्य बंगले बांधतात. बांधकाम व्यावसायिक देखील गृहप्रकल्प विकसित करताना टुमदार बंगली (cottage), उद्यानातील टुमदार घर (villa), हवेली (mansion) आणि आधुनिक बंगल्याच्या स्वरूपात घरे उपलब्ध करून देत असतात. शहराबाहेरच्या भागात किंवा खेडेगावातही टुमदार बंगले बांधले जातात. कधी खेड्यातल्या सधन कुटुंबांसाठी किंवा शहरातल्या लोकांचे पर्यायी घर म्हणून हे बंगले वापरले जातात. निसर्गाच्या सान्निध्यातल्या घरांचं स्वरूप या बंगल्याना असतं आणि एका अर्थी बंगल्यांच्या विकासातल्या टप्प्यांचा वर्तुळ पूर्ण झाल्याचाच हा प्रकार आहे.
संदर्भ :
- Desai, Madhavi, ‘Adaption and Growth of The Bungalow in India’, presented in International Workshop on the Architectural Heritage of Asia and Oceania at the Rizvi College of Architecture, Bombay.
- Desai, Madhavi, Architecture + Design 13, No. 2 (March-April, 1996).
- Sengupta, Tania, ‘Living in the periphery: Provinciality and Domestic Space in Colonial Bengal’, the journal of Architecture, Vol. 18, No. 6, Routledge, Taylor and Francis, 2013.
- inflibnet.ac.in/bitstream/10603/28542/12/12_chapter%204.pdf
समीक्षक : श्रीपाद भालेराव