पार्क दे ला व्हिले, पॅरिस, फ्रान्स : पार्क दे ला व्हिले हे पॅरिस, फ्रान्स येथील तिसरे सर्वात मोठे उद्यान असून त्याचे क्षेत्रफळ ५५.५ हेक्टर आहे. १९८७ मध्ये पूर्ण झाले तेव्हापासून पॅरिसच्या रहिवाशांना आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लोकप्रिय आकर्षण ठरले आहे. शहराच्या उत्तरपूर्व बाजूस स्थित हे उद्यान एक सांस्कृतिक अभिव्यक्तीचे समकालीन केंद्र म्हणून प्रचलित आहे. या ठिकाणी स्थानिक कलाकार आणि संगीतकार आपली कला सादरीकरण करतात. या उद्यानात कलाकारांच्या अधिवेशनांसहित कलाकारांद्वारे उत्सव साजरे करणे, खुल्या आकाशाखाली वार्षिक चित्रपट महोत्सव सादर करणे असे उपक्रम राबविले जातात. अंदाजे १ कोटी लोक प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात. हे उद्यान पॅरिसमधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक स्थळांपैकी एक असून त्यामध्ये विज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील, यूरोपचे सर्वात मोठे विज्ञान संग्रहालय (Cité des Sciences et de l’Industrie), मैफिलींसाठी तीन प्रमुख स्थळे आणि प्रतिष्ठित संगीत विद्यालय कॉन्सरवतोयरे डी पॅरीसचा (Conservatoire de Paris) समावेश आहे.
या उद्यानाला कॅनाल डे लायुकक दोन भागात विभाजित करतो, ज्यातील बोटी पर्यटकांना पार्कच्या आसपासच्या जागांची सहल आणि पॅरिसमधील अन्य ठिकाणी फिरवतात.
इतिहास : स्विस मूळचे एक फ्रेंच वास्तुविशारद बर्नार्ड शुमी यांनी कॉलिन फॉरनिए यांच्या सहकार्याने १९८४ ते १९८७ या काळात उद्यानाची रचना केली होती. हा प्रकल्प पॅरिसच्या कत्तलखाने आणि राष्ट्रीय घाऊक मांसाचे बाजारस्थळ असलेल्या जागेवर बांधला जाणार होता. नेपोलियन (तिसरा) याच्या सूचनांनुसार १८६७ मध्ये तयार करण्यात आलेल्या कत्तलखान्याला बंद करण्यात आले. १९७४ साली शहरी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत त्याची पुनर्स्थापना करण्यात आली. या उद्यानाच्या आराखड्यासाठी १९८२-८३ मध्ये आयोजित केलेली एक प्रमुख आराखडा स्पर्धा शुमी यांनी जिंकली. यामध्ये त्यांनी विरचनात्मक (डि-कन्स्ट्रक्शनिस्ट) तत्त्वावर आपला आराखडा मांडला होता. त्या आराखड्यासाठी त्यांनी जॅक देरिदा या आधुनिक तत्त्ववेत्त्यांची मदत घेतली होती.
उद्यानाची निर्मिती झाल्यापासून अनेक विख्यात वास्तुशिल्पकारांनी त्यातील वास्तुंची रचना केली आहे. ज्यात वस्तुसंग्रहालये, संगीत दालने, आणि सिनेमागृहे यांचा समावेश आहे. यात शुमीसोबत क्रिस्तियन दे पोर्तझॅम्पक, अॅद्रियन फेन्सिलबर, फिलिपे शाइक्स, ज्याँ-पॉल मोरेल, गेरार्ड शामयू अशी नावे समाविष्ट आहेत.
उद्यान : पार्क दे ला व्हिलेमध्ये पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या १० कल्पनाधारित बागांचा संग्रह आहे. प्रत्येक बागेत स्थापत्यशास्त्रातील विरचनावाद वेग-वेगळ्या पद्धतीने हाताळला व सादर केला जातो. काही बागांची रचना लघुशैली तत्त्वांवर आधारित आहेत, तर उर्वरित गोष्टी मुलांना विचारात घेऊन बनविलेल्या आहेत.
ले ‘जार्डिन डु ड्रैगन’ म्हणजेच ड्रॅगनची बाग. येथे ‘ड्रॅगनचे घर’ नावाचे एक मोठे पोलादी शिल्प बनवले आहे, ज्यावर मुलांना खेळण्यासाठी 80 फूटची घसरगुंडी आहे. अॅलेक्झांड्रे केमॅटॉफ यांनी ‘जर्डिन डी बांबू’ म्हणजे बांबूच्या बागेची रचना केली होती. केमॅटॉफ ग्रँड प्रिक्स डे ला शारिझमेम (Grand Prix de l’urbanisme, 2000) चे विजेते होय. ‘जेर्डिन डे ला ट्रेली’ गिलेस वेक्सलार्ड आणि लॉरेंस व्हाशेरॉ यांनी डिझाईन केली. यात वेलींसारख्या वनस्पतींना आधार म्हणून वापरण्यात येणारी जाळीदार ताटी बाजूने जात आहेत आणि ९० लहान कारंजे बनवले आहेत. याच आवारात ठिकठिकाणी ज्याँ-मॅक्स अल्बर्ट यांच्या शिल्पकृती प्रस्थापित केल्या आहेत. बागेच्या वेगवेगळ्या कार्यावर आधारित काही विभाग आहेत. जसे काही उद्याने सक्रिय सहभागासाठी, काही जिज्ञासा जागृत करण्यासाठी तर काही केवळ विश्रांतीसाठी उपलब्ध आहेत.
फॉलीज : उद्यानाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘फॉलीज’ होय. या वास्तुशास्त्रातील विरचनावादाचे उत्तम प्रतिनिधित्व करतात. वास्तुशास्त्रामध्ये, फॉली म्हणजे मुख्यत्त्वे बांधलेली अशी इमारत असते ज्यात कुठलीही उपयुक्तता निश्चित केलेली नसते. मात्र या फॉलीज वास्तुकलेच्या परंपरागत मर्यादा पार करून इमारतीस अमूर्त अशा शिल्पकृती म्हणून प्रस्थापित करण्याची क्षमता दर्शवितात. पस्तीस फॉलीजची मांडणी एका चौकटीवर केली असून पार्कला त्या एक खास रचना प्रदान करतात. वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक फॉली एक संदर्भ म्हणून वापरात येते, ज्याचा वापर पर्यटकांना दिशा-निर्देशक म्हणून होतो. या फॉलीज उद्यानांच्या आयोजनातील सूचक आहेत. त्यापैकी काहींचा उपयोग उपहारगृहे, माहिती केंद्रे आणि पार्कच्या गरजा संबंधित इतर कामांसाठी केला जातो.
आकृतीबंधाचे तत्त्वज्ञान (वास्तुविज्ञानातील विरचनावाद आणि उद्यान) : बर्नार्ड शुमीद्वारे निर्मित हे उद्यान उत्तर आधुनिक वास्तुकलेच्या विरचनावाद या तत्त्वावर आधारित आहे. या उद्यानाची रचना अंक, रेषा आणि पृष्ठभागांच्या मालिकेमध्ये आयोजित केली आहे. पारंपरिक रूपाने अस्तित्त्वात असणाऱ्या उद्यानांच्या रचनात्मक शैली विरचित करण्यासाठी स्थानिक संबंध आणि सूत्रीकरण हे प्रकार शुमीच्या आकृतीबंधात वापरल्या आहेत. शुमींचा आराखडा देरिदाच्या तत्त्वज्ञानाला अंशतः दिलेला प्रतिसाद होता. परंपरागत उद्यानांची शैली स्वमग्नता आणि आराम करणे यावर आधारित असे. ही शैली स्वीकारण्याऐवजी शुमींनी उद्यानाचा उद्द्येश विविध कृती कार्यक्रम आणि परस्परसंवादासाठी जागा उपलब्ध करून देणे हा मार्ग निवडला. उद्यानाची विशाल जागा फिरणाऱ्या लोकांना शोधमोहीम आणि शोध यासाठीच्या संधी आणि स्वातंत्र्य उपलब्ध करून देतात.
आजतागायत उद्यानाच्या मूळ संकल्पनेपासून, अभिनव रचनेवर अनेक टीका झालेल्या आहेत. काहींच्या मते उद्यानाच्या योजनेत मानवी प्रमाणबद्धतेचा विचार नाही, तर काहींना मोठ्या मोकळ्या जागांची रचना चिंताजनक वाटते, कारण ती उद्यानाला भेट देणाऱ्या शहरी नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. शुमी यांनी पारंपरिक संदर्भ नाकारून निर्वातात अस्तित्वात असलेली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न पार्क दे ला व्हिलेच्या माध्यमातून केला आहे. चिन्ह आणि रुढीबद्ध चित्रण यांचे प्रतिनिधित्व नाकारण्यासाठी वास्तुशास्त्रांतील निरस्थान या संकल्पनेच्या अस्तित्वासाठी हे उद्यान प्रयत्न करते. शुमीद्वारे कल्पित ही जागा नीरस्थानाचे सर्वात योग्य आणि अस्सल उदाहरण आहे. जे वस्तु आणि विषय यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करते.
ऐतिहासिक वास्तूंच्या भूतकालीन संदर्भाशिवाय लोकांना भूरेखन, नकाशा, भूदृश्यकला आणि विविध शिल्पाकृती पाहता येतात. वास्तुशास्त्रीय विरचनेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे सदर रचना उद्यानाच्या नैसर्गिक गुणांच्याच आधारे अस्तित्वात येते. या निर्माण केलेल्या निर्वातामुळे उद्यानाच्या वास्तूचा स्वतंत्ररित्या निरपेक्ष अनुभव घेण्यास, लोकांनी त्या जागेत वेळ घालवण्यास, आणि त्यामध्ये सक्रीय भाग घेतल्याने अधिक प्रामाणिक आणि स्पष्ट स्वरूप प्राप्त होते. उद्यानात प्रवेश करताच पर्यटक अशा जगात शिरतो जेथे वास्तूंचे रुढीबद्ध पारंपरिक संबंध आढळत नाहीत.
पार्क दे ला विले नयनरम्य वा आकर्षक देखावा प्रस्तुत करीत नाही; हे न्यूयॉर्क शहराच्या सेंट्रल पार्कसारख्या पारंपरिक पार्क डिझाइनचे उदाहरण नाही. हे विविध सांस्कृतिक संवादांसाठी केवळ एक माध्यम म्हणून जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते.
समीक्षक : श्रीपाद भालेराव
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.