आयुर्वेद संशोधन केंद्र : (स्थापना – १९८९)
१९७० च्या आसपास औषधीशास्त्राचे (फार्माकॉलॉजी) वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयामध्ये अध्यापनाचे कार्य करीत असलेल्या शरदिनी डहाणूकर यांना आयुर्वेदामधील विविध औषधे व उपचार याबद्दल प्रचंड कुतूहल होते. तत्कालीन सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी ह्यांच्याकडे जाऊन शरदिनी डहाणूकर यांनी आयुर्वेदाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले व त्यापासून स्फूर्ती घेऊन आयुर्वेदिक औषधांमधील व्याधी प्रतिकार शक्ती तपासण्याबाबत विविध प्रकारच्या वैज्ञानिक चाचण्या घेण्यास त्यांनी सुरुवात केली. आधुनिक वैद्यकशास्त्रात (ॲलोपथी) सांगितलेल्या काही रोगांसाठी म्हणावे तेवढे परिणामकारक औषधोपचार उपलबध नाहीत अशा रोगांवर आयुर्वेदातील रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांद्वारे होणारे परिणाम तपासण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
शरदिनी डहाणूकर १९८० च्या दरम्यान सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयामध्ये अध्यापनाचे कार्य करीत असलेले सुप्रसिद्ध उदरशल्यतज्ञ (गॅस्ट्रोएनटेरॉलॉजिकल सर्जन) रवी बापट ह्यांच्या संपर्कात आल्या. बापट ह्यांनाही आयुर्वेदातील अमूल्य औषधांचा खजिना आधुनिक शास्त्रीय कसोट्यांवर तपासून पाहावा असे वाटत होते. त्यामुळे ह्या दोघांनी एकत्र येऊन ह्या इम्युनोमॉड्युलेटर ड्रग्ज व आयुर्वेदोक्त रसायन द्रव्यांवर ठोस पुरावे (क्लिनिकल एव्हिडन्स) गोळा करावेत असे ठरवले. त्याकरिता आयुर्वेदोक्त ज्याला गुडुची (व्यवहारामध्ये गुळवेल) म्हणतात, शास्त्रीय भाषेत टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया या नावाने आणि आयुर्वेदामध्ये अमृता या नावानेही ओळखतात, अशा वनस्पतीवर काम करण्यास सुरुवात केली. १९८९ मध्ये शरदिनी डहाणूकर व रवी बापट ह्यांच्या अथक परिश्रम व पाठपुराव्यामुळे तत्कालीन बृहन्मुंबई महानगरपालिकेने अशा प्रकारे आयुर्वेदावर संशोधन करण्यासाठी आयुर्वेद संशोधन केंद्र, सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय व के.ई.एम. रुग्णालय परिसरात उभारण्यास परवानगी दिली. ह्याचे नामकरण आयुर्वेद संशोधन केंद्र अथवा आयुर्वेद रिसर्च सेन्टर ( ए. आर.सी .) असे केले.
केंद्राच्या स्थापनेच्या वेळी त्याची मूळ उद्दिष्टे अशी ठरविली गेली :
- आयुर्वेदातील विविध औषधी वनस्पती व औषधे तसेच आयुर्वेदोक्त विभिन्न औषधोपचार योजना (पंचकर्म इत्यादी) ह्यांच्याबाबत आयुर्वेदात सांगितलेले फायदे व उपयोग ह्यांचे आधुनिक वैद्यक व आधुनिक वैज्ञानिक चाचण्यांच्या आधारे तपासणे आणि त्यांचे रुग्णावर होणारे परिणाम पडताळून पाहणे.
- आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतांचे प्रतिपादन आधुनिक वैद्यकशास्त्र व आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात तपासणे.
- आयुर्वेदोक्त सूत्रबद्ध माहितीचे यथायोग्य वाचन, मनन व परिशीलन करून त्यापासून आधुनिक वैद्यकाच्या संदर्भ चौकटीमध्ये मान्य होईल अशी संशोधन पद्धती (रिसर्च मेथडॉलॉजी) तयार करणे.
- आयुर्वेदीय वैद्य व आयुर्वेदाचे विद्यार्थी ह्यांना आधुनिक वैद्यकीय संशोधन पद्धतीची (रिसर्च मेथडॉलॉजी) प्रक्रिया शिकवणे.
- जनसामान्यांमध्ये आयुर्वेद व आयुर्वेदीय उपचार पद्धतीबाबत प्रबोधन करणे. आयुर्वेदिक औषधोपचारांची योग्य व अयोग्य वापराने होणाऱ्या फायद्या-तोट्यांबद्दल सजगता निर्माण करणे.
आयुर्वेद संशोधन केंद्रासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्ररित्या आर्थिक तरतूद केली. ह्या केंद्राने आजवर विविध प्रकारच्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले आहे. केंद्राला आंतररुग्णांचे क्लिनिकल रिसर्च करण्यासाठी १० खाटांचा कक्ष देण्यात आला आहे. केंद्रामार्फत आठवड्यातून एक दिवस आयुर्वेदिक बाह्यरूग्ण विभागही चालविला जातो. तेथे आयुर्वेद चिकित्सक रुग्णांना तपासून त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार करतात.
आयुर्वेद संशोधन केंद्रातर्फे विविध वैद्यकीय चाचण्या करण्याकरिता सुसज्ज व अत्याधुनिक प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात यकृत व वृक्क कार्यक्षमता तपासणी (लिव्हर फंक्शन टेस्ट,किडनी फंक्शन टेस्ट), रक्तशर्करामापन तपासणी (ब्लॉक शुगर टेस्ट ) व रक्तगत स्नेह तपासणी (लिपिड प्रोफाइल ), रक्तशास्त्र प्रयोगशाळेत सीबीसी व इतर महत्वाच्या रक्त संदर्भातील तपासण्या, इम्म्युनो एसे लॅबमध्ये एलिझा पद्धतीची सोय, होस्ट डिफेन्स लॅबमध्ये इम्म्युनॉलॉजिकल फंक्शन तपासणी, सेल्युलर फंक्शन लॅबमध्ये प्लेटलेट्स ,पी.एम.एन., मोनोसाइटवरील विशेष परीक्षण, टिश्यु कल्चर लॅबमध्ये आयुर्वेदीय औषधांचे सेल लाईनवरील परिणामांची चाचणी, बायोटेक्नॉलॉजी लॅबमध्ये अतिविशिष्ट अशा बायोकेमिकल तपासण्या, औषधी द्रव्यांचे अँटी ओक्सिडन्ट, डीएनए, हायड्रॉक्सि प्रोलीन लेवल तपासणी इ. तपासण्या केल्या जातात.
आयुर्वेद संशोधन केंद्रासाठी लागणारे प्राण्यांसाठीचे घर (ॲनिमल हाउस), छोट्या प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या वैद्यकीय अथवा वैज्ञानिक चाचण्यांची सोय, उदा., उंदीर (रॅट), पांढरे छोटे उंदीर (माईस), गिनी पिग्ज व ससे ठेवण्याची व त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रजनन करण्याची सोय केली आहे.
आयुर्वेद संशोधन केंद्र ज्या सेवा पुरवते त्यात, ऑक्टराय वर्गीकरणासंदर्भात विशेष सल्ला देणे, संदिग्ध आयुर्वेदिक औषधींचे रासायनिक पृथ:करण करून त्यात स्टिरॉइड्स व हेवी मेटल्स आहेत का हे तपासणे या गोष्टी येतात.
आयुर्वेद संशोधन केंद्र एम.एस.सी. (अप्लाइड बायोलॉजी), एम. डी (फार्माकॉलॉजी), पीएच. डी. (अप्लाइड बायोलॉजी), पीएच. डी (फार्माकॉलॉजी) च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते.
आयुर्वेद संशोधन केंद्र आयुर्वेदातील औषधांचे पुनःपरीक्षण (रीव्हॅलीडेशन) करून त्यांची उपयुक्तता आधुनिक वैद्यक व विज्ञानाच्या साहाय्याने सिद्ध करते. आयुर्वेदातील औषधी व औषधोपचारांची रोगावर प्रमाणित उपचार पद्धती (स्टँडर्ड ट्रिटमेंट गाईडलाईन) व अत्यावश्यक आयुर्वेदीय औषधांची सूची (इसेन्शिअल ड्रॅग लिस्ट) तयार केली जाते. आयुर्वेदीय उपचार (काष्ठ औषधी, प्राणिज द्रव्ये व खनिज औषधी तसेच पंचकर्म उपचार ह्यांचे वेगवेगळे व एकत्रितपणे उपयोग ह्यांवर संशोधन केले जाते. रुग्णांना आयुर्वेद व आयुर्वेदीय उपचार ह्यांबाबत मार्गदर्शन केले जाते आणि आयुर्वेद व आयुर्वेदीय उपचार ह्यांबाबत ॲलोपथीच्या डॉक्टरांना मार्गदर्शन करते.
समीक्षक: राजा आगरकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.