वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, भारत : ( स्थापना १९४२ )
विज्ञान आणि उद्योगाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करणारी ही भारतातील शिखर संस्था आहे. ही संस्था स्वायत्त्व असून ती सोसायटी कायद्याखाली नोंदवलेली संस्था आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीश वैद्यकिय अधिकारी सॅम्युअल सॅवेल, सर रिचर्ड ग्रेगरी (नेचर या नियतकालिकाचे संपादक), सॅम्युअल हॉएर (ब्रिटीश मुत्सदी) आणि भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन, सर जे. सी. घोष यांनी ब्रिटन देशातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या धर्तीवर या संस्थेचा प्रस्ताव मांडला. याचबरोबर शास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर आणि तत्कालीन दूरदृष्टीचे राजकारणी रामस्वामी मुदलियार यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने सन १९४२ साली भारतासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (काउन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च – सीएसआयआर ) अस्तित्त्वात आली. या संस्थेचे मुख्यालय दिल्लीत स्वतंत्र ठिकाणी आहे.
विज्ञान – तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने नवनवीन तंत्रप्रणालींचा शोध घेणे, विज्ञान-तंत्रज्ञानात सक्षम नेतृत्त्व पुरवणे, विकसित विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत उद्योगजगताला मार्गदर्शन करणे तसेच या विकासाचा प्रसार करत देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील राहणे; या उद्देशांना समोर ठेवत सीएसआयआरचे कार्य चालले आहे. एकविसाव्या शतकाला सामोरे जाताना सीएसआयआरने आपली नाळ जगाशी जोडली आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत आणि पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद कार्य करते.
केवळ काही राज्ये सोडली तर प्रत्येक राज्यात सीएसआयआरच्या धातू-पदार्थापासून इलेक्ट्रोनिक्स, रेडिओ, अवकाश, पर्यावरण, इंधन-ऊर्जा, औषध, अवजड उद्योग, अन्नप्रक्रिया, उपकरण साधने, स्थापत्य-बांधकाम, खनिज, जैविक, जनुकीयशास्त्र, अब्जांश तंत्रज्ञान, उपकरण, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील ३९ राष्ट्रीय प्रयोगशाळा, तीन नवोपक्रम (इनोव्हेटिव्ह ) संकुले, आणि पाच विशेष विभाग आहेत. दिलीतील मुख्यालयाच्या ठिकाणी असलेले माहिती स्त्रोत केंद्र (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉम्युनिकेशन अँड इन्फर्मेशन रिसोर्सेस – निस्केअर) असून साधारण प्रत्येक प्रयोगशाळेशी संलग्न असे प्रसार केंद्र आणि भांडार कोश किंवा संग्रहालय उभारलेले आहे. तसेच चेन्नई येथेही सीएसआयआरचे संकुल असून कराईकुडी, पिलानी, चंडीगड, नागपूर आणि जमशेदपूर येथे राष्ट्रीय प्रयोगशाळांची विभागीय केंद्रे आहेत.
देशाच्या ग्रामीण भागातील विकासासाठी सीएसआयआर लागवड आणि प्रक्रिया उपक्रम, हस्त आणि लघुउद्योग, पर्यावरण आणि स्वच्छता, खाद्यान्न आणि शेतीविषयक, पेयजल तसेच निवास आणि बांधकाम या विषय-क्षेत्रांसाठी तंत्रज्ञान विकसित करीत आहे.
सीएसआयआरच्या संशोधनाचा फायदा सामाजिक योगदानाच्या अनुषंगाने ऊर्जा, कृषी, खाद्यान्न, पेयजल, या क्षेत्रापासून सुरक्षा, अवकाश तंत्रज्ञान, पर्यावरण तसेच विविध उद्योग व्यवसायांना होत आहे. सीएसआयआरकडून नाविन्यपूर्ण संशोधनसंदर्भात दरवर्षी काही हजार संशोधन अहवाल प्रसिद्ध होत असतात तर राष्ट्रीय पातळीवरील सरासरी २०० तर आंतरराष्ट्रीय पातळीवर २५० एकस्वे (पेटंटस) मिळवली जातात.
सीएसआयआरच्या सर्व प्रयोगशाळा-संस्थांमध्ये सुमारे ४६०० वैज्ञानिक कार्यरत आहेत तर त्यांना ८००० पेक्षाही जास्त विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी सहाय्य करीत आहेत. वैज्ञानिक संस्थांबाबत जगप्रसिद्ध एसजेआर या नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४८५१ संस्थांच्या जागतिक क्रमवारीत भारतातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा क्रमांक ८४वा आहे. देशासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने मनुष्यबळ विकासासंदर्भातील सीएसआयआरचे योगदान अधोरेखित करण्याजोगे आहे.
सीएसआयआरशी संबंधित खालील प्रयोगशाळा व अन्य संस्था आहेत.
- अद्ययावत पदार्थ आणि प्रक्रिया संशोधन संस्था, भोपाळ, मध्यप्रदेश (ॲडव्हांस्ड मटेरिअल्स अँड प्रोसेसेस रिसर्च इन्स्टिट्यूट–AMPRI)
- केंद्रीय बांधकाम संशोधन संस्था, रुरकी, उत्तराखंड (सेन्ट्रल बिल्डींग रिसर्चइन्स्टिट्यूट CBRI)
- पेशीय आणि रेण्वीय जैवविज्ञानसंस्था, हैदराबाद, आंध्रप्रदेश (सेंटर फॉर सेल्यूलरअँड मॉलेक्युलर बायालॉजी-CCMB)
- केंद्रीय औषध संशोधन संस्था, लखनौ, उत्तरप्रदेश (सेन्ट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट – CDRI)
- केंद्रीय विद्युत-रासायानिक संशोधन संस्था, कराईकुडी, तामिळनाडु ( सेन्ट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट – CECRI)
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी संशोधन संस्था, पिलानी, राजस्थान (सेन्ट्रल इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरीग रिसर्चइन्स्टिट्यूट–CEERI)
- केंद्रीय अन्न आणि तंत्रज्ञानविषयक संशोधन संस्था, म्हैसूर, कर्नाटक ( सेन्ट्रल फूड अँड टेक्नॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्यूट–CFTRI )
- केंद्रीय काच आणि मृत्तिका संशोधन संस्था, कोलकाता, पश्चिम बंगाल (सेन्ट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इन्स्टिट्यूट – CGCRI)
- केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संस्था, लखनौ, उत्तरप्रदेश (सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमेटिक प्लांटस – CIMAP)
- केंद्रीय खाणकाम आणि इंधन संशोधन संस्था, धनबाद, झारखंड ( सेन्ट्रल इन्स्टिट्यूट फॉर मायनिंग अँड फ्युएल रिसर्च – CIMFR)
- केंद्रीय चर्म संशोधन संस्था, चेन्नई, तामिळनाडू (सेन्ट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट – CLRI)
- केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्था, दुर्गापूर, पश्चिम बंगाल (सेन्ट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट– CMERI)
- केंद्रीय रस्ते संशोधन संस्था, दिल्ली (सेन्ट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट– CRRI)
- केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संशोधन संस्था, चंदीगड (सेन्ट्रल सायंटीफिक इन्स्ट्रुमेन्ट्स ऑर्गनायझेशन – CSIO)
- केंद्रीय मीठ आणि सामुद्रिक रसायन संशोधन संस्था, भावनगर, गुजरात (सेन्ट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट– CSMCRI)
- जनुकीय विज्ञान आणि संकलित जीवविज्ञान संस्था, दिल्ली (इन्स्टिट्यूट फॉर जिनॉमिक्स अँड इंटीग्रेटीव्ह बायालॉजी – IGIB)
- हिमालयीन जैवस्त्रोत तंत्रज्ञान संस्था, पालमपूर, हिमाचलप्रदेश (इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्सेस टेक्नॉलॉजी – IHBT)
- भारतीय रासायनिक जैवविज्ञान संस्था, कोलकाता, पश्चिम बंगाल (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायालॉजी – IICB)
- भारतीय रासायनिक तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद, आंध्रप्रदेश (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी – IICT)
- भारतीय संकलित औषध संस्था, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटीव्ह मेडिसिन – IIIM)
- भारतीय पेट्रोलियम संस्था, डेहराडून, उत्तराखंड (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम – IIP)
- भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था, लखनौ, उत्तरप्रदेश (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सीकॉलॉजीकल रिसर्च – IITR)
- खनिज आणि पदार्थ तंत्रज्ञान संस्था, भुवनेश्वर, ओडिशा (इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरिअल्स टेक्नॉलॉजी – IMMT)
- सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्था, चंदीगड (इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबिअलटेक्नॉलॉजी – IMTECH)
- राष्ट्रीय अवकाशविज्ञान प्रयोगशाळा, बंगलुरू, कर्नाटक (नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरी – NAL)
- राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था, लखनौ, उत्तरप्रदेश (नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट– NBRI)
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे, महाराष्ट्र (नॅशनल केमिकललॅबोरेटरी– NCL)
- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर, महाराष्ट्र (नॅशनल एन्व्हिरॉन्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट – NEERI)
- उत्तर-पूर्व विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, जोरहाट, आसाम (नॉर्थ-इस्ट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी – NEIST)
- राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्था, हैदराबाद, आंध्रप्रदेश (नॅशनल जिऑग्राफिकल रिसर्च इन्स्टिट्यूट – NGRI)
- राष्ट्रीय आंतरशाखीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, तिरुवनंतपूरम, केरळ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरडिसिप्लीनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी – NIIST)
- राष्ट्रीय सामुद्रिकविज्ञान संस्था, गोवा (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी – NIO)
- राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण आणि माहिती स्त्रोत संस्था, दिल्ली (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड इन्फर्मेशन रिसोर्सेस – NISCAIR)
- राष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास अभ्यास संस्था, दिल्ली (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट स्टडीज – NISTADS)
- राष्ट्रीय धातुशास्त्र प्रयोगशाळा, जमशेदपूर, झारखंड ( नॅशनल मेटॅलर्जीकल लॅबोरेटरी– NML)
- राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा, दिल्ली (नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी– NPL)
- स्ट्रक्चरल अभियांत्रिकी संशोधन केंद्र, चेन्नई, तामिळनाडू (स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर – SERC)
- सीएसआयआरचे गणिती आणि संगणकी प्रारूपण केंद्र, बंगलुरु, कर्नाटक (सीएसआयआर सेंटर फॉर मॅथेमॅटिकल अँड कॉम्प्युटर सिम्युलेशन – CMMACS)
- चतुर्थ मिती संस्था, बंगलुरु, कर्नाटक (फोर्थ पॅराडीम इन्स्टिट्यूट– FPI)
सीएसआयआरच्या प्रयोगशाळा-संशोधन केंद्रांमध्ये कुशल आणि उच्चशिक्षित मनुष्यबळ मिळवण्यासाठी चेन्नई येथील संकुलाच्या आवारात स्वतंत्र अशी वैज्ञानिक व नव संशोधन अकादमी स्थापण्यात आली आहे. या अकादमीत ३००० विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली आहे.
सीएसआयआर मुख्यालयाचा पत्ता – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, अनुसंधान भवन, २, रफी मार्ग, दिल्ली ११० ००१ दूरध्वनी – ०११- २३७३ ७८८९.
संकेतस्थळ – www.csir.res.in
संदर्भ :
समीक्षक: अ.पां. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.