गेहरी, फ्रँक ओ. : ( २८ फेब्रुवारी १९२९ ) फ्रँक ओवेन गेहरी हे एक जगप्रसिद्ध कॅनेडियन-अमेरिकन, पोस्ट मोडर्न शैलीत काम करणारे, आर्किटेक्ट आहेत. १९८९ साली गेहरींना, त्यांच्या अद्भुत कामासाठी, प्रित्झकर पुरस्काराने गौरविले गेले.
गेहरी आजवर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवीले गेले आहेत. प्रिझ्कर आर्किटेक्चर पुरस्कार १९८९, प्रेमियम ईंपिरियाले १९९२, अमेरिकन अॅकॅडमी ऑफ अचिव्हमेंटचा, गोल्डन प्लेट पुरस्कार १९९५, राष्ट्रीय कला पदक (१९९८), गोल्ड मेडल पुरस्कार, रॉयल आर्किटेक्चरल इन्स्टिट्यूट ऑफ कॅनडा (१९९८), एआयए गोल्ड मेडल (१९९९), कूपर – हेविट नॅशनल डिझाईन अवॉर्ड लाइफटाइम अचिव्हमेंट (२०००), कंपॅनियन ऑफ दि ऑर्डर ऑफ कॅनडा (२००२), ऑर्डर ऑफ चार्लेमेन (२००९), पंचवीस वर्षाचा पुरस्कार, अमेरिकन इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट (२०१२), कमांडर ऑफ ऑनर नॅशनल लीजन, फ्रान्स (२०१४), जे. पॉल गेटी मेडल (२०१५), हार्वर्ड आर्ट्स मेडल (२०१६) हे त्यांपैकी काही.
तऱ्हेवाईक, आश्चर्यकारक, अमर्याद, विचित्र, अतिव्ययी, महान, विस्मयकारक, ख्यातनाम अशा विशेषणांनी फ्रँक ओ. गेहरींच्या कामाचे वर्णन केले जाते. सामान्य प्रथा, नियम बाजूला ठेऊनच गेहरी डिजाईन करतात .
डेव्हिड केबिन – आयडविल्ड कॅलिफोर्निया (१९५७), डान्सिंग हाऊस, प्राग (१९९६) गुग्नेहेम संग्रहालय, बिल्बाओ (१९९७), पॉप कल्चरचे संग्रहालय, सिएटल (२०००), गेहेरी टॉवर, हॅनोवर, जर्मनी (२००१), वॉल्ट डिस्ने कॉन्सर्ट हॉल, लॉस एंजेलिस (२००३), जे प्रित्झर पव्हिलियन मिलेनियम पार्क, शिकागो (२००४) हे त्यांचे काही प्रसिद्ध प्रकल्प.
गेहरींचा जन्म २८ फेब्रुवारी १९२९ रोजी टोरोंटो, ओन्टारियो कॅनडा येथे झाला. त्यांचे वडील मूळचे रशियन ज्यू असून, आई पॉलिश ज्यू होती. गेहरी लहान असल्या पासूनच सर्जनशील होते. त्यांचा वडीलांची फर्निचरची फॅक्टरी होती. त्यांची आजी त्यांना प्रोत्साहन देत व तिच्या बरोबर ते, लाकडाच्या तुकड्यांमधून छोटी घरे व शहरे बनवित. गेहरींची आई त्यांना कला दालने बघायला, शास्त्रीय संगीतचा कार्यक्रमांना नेई ज्यामुळे लहानपणीच त्यांची कलेशी ओळख झाली. १९४७ मध्ये गेहरी चे कुटुंब कॅनडा हून कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झाले.
डिलिव्हरी ट्रक चालविण्याची नोकरी करुन गेहरींने लॉस एंजेलिस सिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. रेडिओ उद्घोषक व रासायनिक अभियांत्रिकी या क्षेत्रात गेहरींनी प्रयत्न केला पण त्यांना त्यात रुची वाटेना. कला क्षेत्रात रस असल्यामुळे त्यांनी आर्किटेक्चर चे शिक्षण घ्यायचे ठरवले व साऊथ कॅलिफोर्निया (यूएससी) स्कूल ऑफ आर्किटेक्चर मधून पदवीधर झाले. १९५४ मध्ये यूएससी मधून पदवी घेतल्यानंतर गेहरींनी अमेरिकन सैन्यात, विशेष सेवा विभागात एक वर्ष सेवा केली. सेवेत असताना त्यांच्यावर सैनिकांसाठी फर्निचर बनवण्याची कामगिरी सोपविली गेली व त्यामुळे गेहरींनी फर्निचर डिझाइनचा प्रयोग सुरू केला. गेहरींचे डिझाईन्स इतके उत्कृष्ट असत की ते सैनिकां ऐवजी अधिकारीच वापरत. सैन्यानंतर गेहरी लॉस एंजेलिसला परतले व एका प्रतिष्ठित आर्किटेक्चरल फर्ममध्ये नेकरी करु लागले. १९६१ मध्ये ते नोकरी साठी पॅरिसला गेले व १९६२ मध्ये त्यांनी, लॉस एंजेलिसला,स्वत: ची डिझाइन फर्म सुरू केली.
१९७०-८० च्या दशकात, पुठ्याचे फर्निचर आणि इमारती बांधण्यासाठी साखळी-दुवा कुंपण, यासारख्या दैनंदिन साहित्याचा वापर करुन गेहरींने नियमित विचारांना आव्हान केले होते. संग्राहक, त्यांनी डिजाइन केलेले विलक्षण दिवे आणि खुर्च्या आपल्या संग्रही जोडण्यासाठी प्रयत्न करी.
गेहेरी एक उत्कृष्ट चित्रकार आणि शिल्पकार आहे. “माझ्या रेखांकनात स्वातंत्र्य आहे जे मला आर्किटेक्चरमध्ये व्यक्त करायला आवडते. आर्किटेक्चर नक्कीच एक कला आहे आणि जे आर्किटेक्चरच्या कलेचा सराव करतात ते नक्कीच आर्किटेक्ट आहेत.” असे गेहेरी म्हणतात
गेहेरींचा डिझाइन प्रक्रियेत माशाचे स्वरूप आणि विश्लेषण महत्त्वपूर्ण आहेत. “इतर आर्किटेक्ट जेव्हा ग्रीक मंदिरांसारख्या इमारती तयार करीत तेव्हा मला खूप राग येई. मला वाटत की ते वर्तमान नकारतायत. हे पुढच्या पीढीसाठी योग्य नाही. मागे वळून पाहणया शिवाय पर्याय नाही, भविष्याबद्दल आशावादी असण्याचे कोणतेही कारण नाही असा संकेत आपण त्यांना देतोय. तेव्हापासून मी मासे रेखांकन करण्यास सुरूवात केली. मी पूर्वी मूव्हमनेटचा शोधात होतो आणि मला ते माशामध्ये सापडले. आर्किटेक्चर मध्ये गती कशी आणावी ही समज माशाचा स्वरूपातून दृढ झाली. प्रवाही, निरंतर वाहणारा, माशाचा आकार आहे, योजलेला नाही.”
गेहेरी म्हणतात की आर्किटेक्चर कोणत्याही एका दिशेने खेचले जाऊ नये. आपण लोकशाही मध्ये आहोत, त्यामुळे जेवढे लोक तेवढ्या रंजक कल्पना.
संदर्भ :
- Peltason R. , Ong-Yan G. , P. ( 2010) The Pritzker Prize Laureates In Their Own Words London: Thames and Hudson
- guggenheim-bilbao.eus
- architecture.org
समीक्षक : श्रीपाद भालेराव