कोरिया, चार्ल्स : (१ सप्टेंबर १९३० – १६ जून २०१५). भारतीय वास्तू विशारद, शहरी नियोजक (Urban planner) आणि कार्यकर्ते (Activist). स्वातंत्र्योत्तर भारतात आधुनिक वास्तुरचनेच्या (Modern Architecture) निर्मितीसाठी कोरिया यांना श्रेय दिले जाते. शहरी गरीबांच्या गरजांप्रती ते संवेदनशील होते व त्यांनी यासाठी बरेच काम देखील केले. त्यांचा कामात त्यांनी कायम पारंपरिक पद्धती आणि साहित्याचा कौशल्यपूर्ण वापर केला. २००६ साली भारताने त्यांना पद्मविभूषणाने गौरविले.

कोरिया यांचा जन्म सिकंदराबाद येथे झाला. ते गोव्यातील वंशज व रोमन कॅथलिक होते. उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण करून ते मिशिगन विद्यापीठ (१९४९-५३) व त्यानंतर मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केंब्रिज मधून त्यांनी वास्तू विशारदचे शिक्षण पूर्ण केले. १९५८ साली त्यांनी मुंबईमध्ये स्वत:चा खाजगी सराव (प्रोफेशनल प्रॅक्टीस;professional practice) सुरू केला. अहमदाबादमधील साबरमती आश्रमात निर्मित, महात्मा गांधी स्मृती संग्रहालय (१९५८-६३) हा त्यांचा पहिला महत्त्वाचा प्रकल्प. १९७०-७५पासून ते नवी मुंबई (न्यू बॉम्बे; New Bombay) साठी मुख्य वास्तू विशारद (चीफ आर्किटेक्ट; Chief Architect) होते.  नवी मुंबई २ दशलक्ष लोकांसाठीचे शहरी विकास केंद्र नियोजित केले गेले होते. १९८५साली, पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना शहरीकरणासाठी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.

भारत भवन, भोपाळ (१९८१)

तिसऱ्या जगातील शहरी समस्या आणि कमी किमतीत गृहनिर्माणासाठी कोरियांनी ४० वर्षे, लक्षात घेण्याजोगा अग्रगण्य काम केले. त्यांच्या कामासाठी भारतानी त्यांना १९७२ साली पद्मश्री व २००६ साली पद्मविभूषणाने गौरविले. याखेरीज त्यांना १९८४चे रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सचे सुवर्ण पदक, १९८७ साली इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे सुवर्ण पदक. १९९४साली जपानकडून आर्किटेक्चरसाठी प्रिमियम इम्पिरियल पुरस्कार,  १९९८ साली मध्य प्रदेश विधानसभेसाठी, ७वा आगाखान पुरस्कार व २००५ साली विज्ञान आणि कलेसाठी ऑस्ट्रियन गौरव पुरस्कार मिळाले आहेत.

राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय,  दिल्ली (१९५८), गांधी स्मारक संग्रहालय, अहमदाबाद (१९६३), भारत भवन, भोपाळ (१९८१), कला अकादमी, पणजी (१९८३), जवाहर कला केंद्र, जयपूर (१९९२), IUCAA, पुणे (१९९३), चंपालामुद फाऊंडेशन सेंटर, लिस्बन (२०१०), इस्माईल सेंटर, टोरोंटो (२०१४) ही कोरियांच्या अनेक उत्कृष्ट नमुन्यांपैकी काही शाश्वत कामे.

मानवी इतिहासात आकाशाला एक गहन व पवित्र अर्थ प्राप्त झाला आहे. कोरिया म्हणतात “प्रत्येक क्षणी, सभोवतालच्या प्रकाशाच्या गुणवत्तेतील व हवेतील सूक्ष्म बदल, आपल्यामध्ये भावना उत्पन्न करतात, आपल्या अस्तित्वाचा संतुलनासाठी गरजेच्या असणाऱ्या अशा भावना. म्हणून आशियामध्ये,  ‘एका वृक्षाखाली बसलेले गुरू’ हेच शिक्षणाचे प्रतिक आहे. खरे ज्ञान, एखाद्या खोलीच्या बंदिस्त चौकटीत घेता येत नाही, त्यासाठी बाहेर असणे आवश्यक आहे, खुल्या आकाशाच्या खाली!” कोरियांच्या कामात आकाशाचे हे महत्त्व स्पष्टपणे दिसते. ते प्रत्येकवेळी आकाश ‘फ्रेम’ करतात ज्यामुळे आकाश वेगळे आणि निर्विवाद सुंदर असे आढळते.

कोरियांच्या कमी उत्पन्न गृह निर्माणांच्या प्रकल्पांमध्ये आवार (courtyard) आणि गच्ची (terrace), यांच्या विचारपूर्वक, उद्देशाने केल्या गेलेल्या रचना अढळतात. ‘आवार/गच्ची अशा आकाश उघड (open to sky) जागेंची गृहनिर्माणामध्ये महत्त्वाची भूमिका असते – जगण्यायोग्य निवासस्थान आणि बंदिस्त, मर्यादित जागेतील जगणे (विशेषतः सर्वांत कमी उत्पन्नगटांची शहरी घरे), – दरम्यान निर्णायक असा फरक, या जागा करू शकतात” असे कोरिया म्हणतात.

प्रचलित संसाधनांवर विशेष भर, रचनेत जागेचा क्रम ठरविताना ऊर्जा आणि हवामान हे प्रमुख निर्धारक घटक ठेवणे, व काळजीपूर्वक विचार केले गेलेले आर्किटेक्चरल तपशील (architectural detailing) यावर कोरियांचे प्रभुत्व होते. कोरिया सांगतात “भारतामध्ये आपण संसाधने गमावू शकत नाही, आपल्याला ते परवडणार नाही, त्यामुळे इमारतीलाच आपल्या ‘फॉर्म’ च्या माध्यमातून नियंत्रण तयार करावे लागते. या प्रकारे प्रतिसाद देताना, नुसते सूर्यकोन, सावली तयार होण्यासाठी लागणारी साधने इ. यांचा विचार करून भागत नाही; त्यात विभाग (section), योजना (plan), आकार (shape) याचा विचार व्हायला हवा – थोडक्यात इमारतीच्या आत्म्याचाच विचार!”

प्रकाश आणि सावलीचा लपंडाव, कोरिया आपल्या वस्तुमानरचनेच्या तज्ज्ञशैलीतून वापरकर्त्यासमोर अलगदपणे उलगडतात; अनुभवल्याखेरिज अशा जागेची काव्यात्मक गुणवत्ता लक्षात येत नाही! आर्किटेक्चर आणि इतर कला यांच्यातील संबंध खूप महत्त्वाचा आहे. रुपकात्मकता व तत्त्वज्ञान यांचा देखिल समावेश रचनेत असेल तर वापरकर्त्यास समृद्ध अनुभव मिळू शकतो, असा कोरियांचा विश्वास होता.

वयाच्या ८४ व्या वर्षी, १६ जून २०१५ रोजी, कोरिया यांचे मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : श्रीपाद भालेराव