बरागान, लूईस : (९ मार्च १९०२ – २२ नोव्हेंबर १९८८). मेक्सिकन प्रसिद्ध वास्तुरचनाकार आणि अभियंता. बरागान यांचे काम दृष्टिरूपी आणि संकल्पनात्मक प्रेरणा देणारे आहे. १९८० साली त्यांना त्यांच्या कामासाठी प्रित्झकर पुरस्काराने गौरविले गेले. २००४ साली लुईस बरागान हाऊस आणि स्टुडिओला (Luis Barragán House and Studio) यूनेस्को जागतिक वारसाचे स्थान मिळाले.

गिलार्डी हाऊस चॅपल्टेपेक (१९७७)

बारगान यांचा जन्म ग्वाडालजारा, मेक्सिको येथे झाला. त्यांचे शिक्षण नागरी अभियांत्रिकीमध्ये झाले, परंतु त्यांनी वास्तुकलेमधील कौशल्ये स्वयंअभ्यासले होते. १९२५ पासुन युरोपमध्ये दोन वर्ष प्रवास करीत असताना तेथील शहरातील उद्यानांचे सौंदर्य पाहून बरागान भारावून गेले.  भूमध्य आणि मुस्लिम संस्कृतीचे तीव्र प्रभाव व आधुनिक औद्योगिक आणि सजावटीच्या कलांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन (इंटरनॅशनल एक्सपोझिशन ऑफ मॉडर्न इंडस्ट्रिअल अँड डेकोरेटिव आर्ट) पाहून ते प्रभावित झाले. याच दरम्यान त्यांना भूदृष्य वास्तुकलेतीलमधील आवड जाणवू लागली. मेक्सिकोच्या पारंपरिक वास्तुकलेची आठवण करून देणाऱ्या तेजस्वी रंगांचा वापर करून व आपल्या प्रभावी कामातून बरागान यांनी आधुनिक वास्तुकलेत क्रांती घडवून आणली.

बरागान हाऊस, मेक्सिको सिटी (१९४८), चॅपल इन त्लालपान, मेक्सिको सिटी (१९६०), लॉस अर्बोलादस सबडिविजन, मेक्सिको सिटी (१९६३), लॉस क्लब सबडिविजन, मेक्सिको सिटी (१९७२), गिलार्डी हाऊस चॅपल्टेपेक (१९७७) या त्यांच्या प्रसिद्ध कामांना आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि वास्तुकलेचे प्राध्यापक, वारंवार भेट देतात.

बरागान हाऊस, मेक्सिको सिटी (१९४८)

बरागान यांचा कार्यात्मकतेला विरोध होता, भावनिक वास्तुकलेला निर्मितीचा त्यांनी कायम प्रयत्न केला. ‘माझी वास्तुकला ही माझी आत्मचरित्रात्मक आहे’ असे बरागान म्हणतात. त्यांचा असा दावा होता की, जी वास्तू प्रसन्नता, निश्चलता, व्यक्त करत नाही ती चूक आहे.  दगड/लाकूड हा कच्चा माल व प्रकाश यांचे कल्पक आणि नाट्यमय संयोजन करून बरागान आपल्या निर्मितीत  मार्मिक आणि भावनापूर्ण वातावरण तयार करू शकत. बरागान यांचा मते, रंग आणि प्रकाश हे निर्मिती मधील खूप महत्त्वाचे, मूलभूत तत्त्वे आहेत, त्यांचा सर्जनशील वापर जागेच्या संकल्पना बदलू शकतात.

‘मी अतिवास्तववादाचा भक्त आहे, मी नेहमीच कल्पनाशक्ती असलेल्या लोकांची बाजू घेतली आहे’ बरागान खूप धार्मिक देखिल होते. ते म्हणत, ‘परमेश्वराच्या आकांक्षेशिवाय, आपली पृथ्वी एक कुरूप व खेदजनक वाया गेलेली अशी जागा झाली असती.’

त्यांच्या कामाबद्दल बरागान म्हणतात, ‘निर्मित जागा आग्रही नसाव्यात, हे माझ्यासाठी  महत्त्वाचे आहे. मी कायम सोपे आकार व काटकोनात काम केले. माझा मनात नेहेमी आडवे व उभे प्रतल (horizontal and vertical planes) व कोनांच्या छेदनाचा (intersecting angles) विचार असे. माझ्या वास्तुकलेतील घनाच्या वारंवार वापराचे हे स्पष्टीकरण. ज्या प्रकारे आर्किटेक्टस वास्तूची रचना करतात त्याच गांभीर्याने बागेची रचना वापरासाठी करावी, ज्या मुळे सौंदर्य भाव विकसित होऊन, ललित कला व इतर आध्यात्मिक मूल्यांकडे समाजाचा कल वाढेल, असा माझा विश्वास आहे.’

बरागान यांचे मेक्सिको सिटी येथे निधन झाले.

संदर्भ :

 समीक्षक : श्रीपाद भालेराव