रिकेट्स, हॉवर्ड टेलर : (९ फेब्रुवारी, १८७१ – ३ मे, १९१०) हॉवर्ड टेलर रिकेट्स हे एक अमेरिकन रोगनिदानतज्ज्ञ (Pathologist) होते. रॉकी माऊन्टन स्पॉटेड फिवर (Rocky Mountain Spotted Fever) या आजाराच्या जंतूंचा अभ्यास आणि त्यावर संशोधन करणारे ते पहिले शास्त्रज्ञ आहेत. या जंतूंच्या कुळाला रिकेटसिएसी  आणि जंतूना रिकेटसिया असे नाव त्यांनीच दिले.

त्यांचा जन्म युनायटेड स्टेट्समधील ओहायोच्या फिंडले (Findlay) या शहरात झाला.  कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, रिकेट्स यांनी नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठामध्ये ब्लास्टोमायकॉसीस या बुरशीजन्य आजारावर संशोधन केले. परंतु नंतर त्यांनी रॉकी माऊंटन स्पॉटेड फिवर या रोगावर मॉन्टॅनाच्या बिटररूट व्हॅली आणि शिकागो विद्यापीठात संशोधन केले. मॉन्टॅनामधील रॉकी माऊंटन या रोगावरील सुरुवातीच्या अभ्यासामुळे तेथील हॅमिल्टन शहरात रॉकी माऊंटन प्रयोगशाळेची निर्मिती झाली.

मॉन्टॅनामध्ये असतानाच, रिकेटस् आणि त्यांच्या सहाय्यकांनी रॉकी माऊंटन स्पॉटेड फिवर या रोगाच्या जंतूंचा फैलाव रॉकी माऊंटन वूडटिक याप्रकारच्या किटकांमधून होतो हे सिद्ध केले. त्याकाळी हे रोगजंतू नेमके कोणत्या प्रकारचे आहेत हे माहीत नव्हते. रिकेट्सनी त्यांना रिकेटसिया असे नाव दिले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकयंत्र आणि इतर तंत्रज्ञान विकसित होईपर्यंत हे जंतू जीवाणू आहेत की विषाणू आहेत की दोन्हींच्या मधले आहेत हे सांगता येत नव्हते, परंतु आता त्यांची पेशीअंतर्गत परजीवी जीवाणू म्हणून ओळख झाली आहे.

रिकेट्स यांनी केवळ याच संशोधनावरच लक्ष केंद्रित केले होते. या रोगजंतूंचा शरीरावर नेमका कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतःवरच प्रयोग केले होते. यासाठी त्यांनी अनेकवेळा स्वतःच्या शरीरातच या रोगजंतूचा इंजेक्शनद्वारे शिरकाव होऊ दिला होता.

१९१० मध्ये मेक्सिको शहरात टायफस या स्पॉटेड फिवर सारख्याच आजाराची मोठी साथ होती. उंदरांच्या शरीरावरील पिसवातून या रोगाचा प्रसार होत होता. रिकेट्सना टायफसच्या जंतूंच्या प्रजातींचा अभ्यास करण्यामध्ये आवड निर्माण झाली. त्यांनी टायफसचे रोगजंतू वेगळे केले. परंतु त्यानंतर काही दिवसातच म्हणजे वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षीच दुर्दैवाने त्यांचे याच आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा टब्ज-रिकेट्स आणि त्यांची मुले होती. त्यांनी रिकेट्स यांच्या स्मरणार्थ, १९१२ मध्ये शिकागो विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी हॉवर्ड टेलर रिकेट्स प्राईझ हा संशोधन पुरस्कार सुरू केला.

संदर्भ :

    समीक्षक : रंजन गर्गे