बुकानन, रॉबर्ट इर्ली : (१८८३- १९७३) बुकानन यांचा जन्म १८८३ साली आयोवा स्टेटमधील सेडार रॅपिड्स (Cedar Rapids) येथे झाला. त्यांना अगदी लहानपणीच वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीच निसर्गाच्या अभ्यासाची आवड निर्माण झाली.
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीला बुकानन यांनी लॅटिनचा अभ्यास केला. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच त्यांनी शिकागोमधील नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमधून पीएच.डी. संपादन केली. आयोवा स्टेट कॉलेजमध्ये जीवाणूशास्त्र विभागाचे पहिले विभागप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा इस्टली फोगेल यांच्यासोबत विवाह झाला. या दोघांनी मिळून बुकानन आणि बुकानन्स् बॅक्टेरिओलॉजी या ग्रंथाचे लिखाण केले. १९१४ ते १९१९ या कालावधीत औद्योगिक विज्ञानाचे अधिष्ठाता, १९१९ ते १९४८ पदवीधर कॉलेजचे अधिष्ठाता तसेच १९३३ ते १९४८ च्या दरम्यान कृषी प्रयोग केंद्राचे संचालक अशा विविध जबाबदारीच्या पदावर ते कार्यरत राहिले. प्रचलित नियमानुसार नोकरीतील निवृत्तीनंतर देखील त्यांना एमेरीटस प्राध्यापक म्हणून त्यांना निवृत्तीनंतर देखील जीवाणूशास्त्र विभागाची जबाबदारी दिली. आयोवा स्टेट कॉलेजच्या संपूर्ण कामगिरीवर त्यांनी तेथूनच लक्ष ठेवले.
बुकानन यांनी १९१८ साली जीवाणूंच्या वाढीतील विविध अवस्था या शीर्षकाचा शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यांचा अभ्यास प्रामुख्याने जीवाणूंच्या नामकरणाशी (Nomemclature) संबधित होता. याच कालावधीत जीवाणूंच्या नामकरणाचा आणि वर्गीकरणाचा अभ्यास या एकाच शीर्षकाचे दहा शोधनिबंध प्रसिद्ध केले. यावेळी ते सोसायटी ऑफ अमेरिकन बॅक्टेरिओलॉजीस्टचे अध्यक्ष आणि विन्स्लो समितीचे सदस्य होते. त्यांनी तयार केलेल्या अहवालामुळे जीवाणूंच्या नामकरण आणि वर्गीकरणाच्या संपूर्ण कल्पनाच बदलल्या. बुकानन यांच्या अनेक प्रकाशानांपैकी १९३५ मध्ये प्रकाशित झालेला सुमारे ६०० पृष्ठांचा बुकानन्स सिस्टीमॅटीक बॅक्टेरिओलॉजी हा ग्रंथ सर्वज्ञात होता. संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा आजही वापर आहे. जीवाणूंच्या विविध जातींचा स्पष्टीकरणासहित नामोल्लेख यामध्ये केला आहे.
वयाच्या ३५ व्या वर्षीच बुकानन अमेरिकेतील जीवाणूतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध पावले. अमेरिकन सरकारने त्यांना भारतासह अनेक मध्यपूर्व देशांना कृषिविषयक मार्गदर्शनासाठी पाठविले. १९३० सालच्या केंब्रिज येथील वनस्पतीशास्त्राच्या परिषेदत ते जीवाणूशास्त्र विभागाचे अध्यक्ष झाले. तसेच पॅरीसमधील पहिल्या जागतिक सूक्ष्मजीवशास्त्र परिषदेत सहभागी होऊन जीवाणूंच्या नामकरण समितीचे संस्थापक सदस्य झाले. दुसऱ्या परिषदेच्या वेळी अमेरिका आणि कॅनडाच्या संयुक्त समितीने नामकरणाची नियमावली तयार केली. या समितीचे अध्यक्ष बुकाननच होते. त्यांनी ११९ पानांची एक पुस्तिका तयार केली. यामध्ये त्यांनी वनस्पतींच्या नामकरणाचे आंतरराष्ट्रीय नियम आणि त्यानुसार जीवाणूसाठी नियम व शब्दसूची समांतरपणे मांडली. तिसऱ्या परिषदेमध्ये सुधारित आवृत्तीच्या निर्मितीचा विचार आला आणि बुकानन यांना पुन्हा न्याय आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले. समितीने सुधारित नियमावली तयार केल्यानंतर आयवा स्टेट कॉलेजच्या मुद्रणालयात त्याचे प्रस्तावित नियमावली म्हणून मुद्रण केले. पुढे चौथ्या परिषदेत यावर सविस्तर चर्चेने आणि एकमताने नियमावली प्रसिद्ध केली. त्यानंतर बुकानननी टीपांसहित नियमावलीची आवृत्ती प्रसिद्ध केली. उपयुक्त नोंदी देणे हे त्यांचे ध्येय होते. प्रत्येक परिषदेच्या वेळी नियामवलीमध्ये त्यांनी दुरुस्त्या सुचविल्या.
बुकानन १९५७ साली सोसायटी फॉर जनरल मायक्रोबायोलोजीचे सन्माननीय सदस्य झाले. बुकानन सूक्ष्मजीवशास्त्राच्या सर्व जागतिक परिषदामध्ये सहभागी होणारे वैज्ञानिक होते. नामकरण समिती आणि न्याय आयोगाचे एक स्वतंत्र प्रकाशन सुरू करण्याच्या ध्येयापोटी आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी युनेस्कोची आणि आयोवा स्टेट कॉलेजची मदत घेऊन ‘द इन्टरनॅशनल बुलेटीन ऑफ बॅक्टेरिओलॉजीकल नोमेनक्लेचर अँड टॅक्सॉनॉमी’ या शीर्षकाच्या जागतिक नियतकालिकाची निर्मिती केली. नंतर याचेच रुपांतर ‘द इन्टरनॅशनल जर्नल ऑफ सिस्टीमॅटीक बॅक्टेरिओलॉजी’ या नियतकालिकामध्ये झाले. बुकानन यांना बर्गीज मॅन्युअल ट्रस्टचे अध्यक्ष करण्यात आले आणि या पदावर ते अखेरपर्यंत राहिले. आयुष्यभर त्यांनी विविध जीवाणूंची नावे गोळा करून ‘इंडेक्स बर्गीयाना’ तयार केला.
उर्वरित आयुष्य त्यांनी बर्गीज मॅन्युअलच्या आठव्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या नियोजनासाठी घालविले. त्यासाठी त्यांनी अभ्यासू आणि प्रगल्भ बुद्धीच्या व्यक्तींचे संपादक मंडळ बनवून आठव्या आवृत्तीची निर्मिती केली.
संदर्भ :
- ‘Memorial to Professor R. E. Buchanan’ – International Code of Nomenclature of Bacteria – NCBI.
- http://www.encyclopedia.com/doc/1G23409800106
समीक्षक : रंजन गर्गे