नील, कॉर्नेलियस बर्नार्डस व्हान : (४ नोव्हेंबर, १८९७ – १० मार्च, १९८५ )

नील, कॉर्नेलियस बर्नार्डस व्हान या डच-अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाचा जन्म अमेरिकेतील हार्लेम येथे झाला. अमेरिकेतच त्यांनी  सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली आणि प्रकाशसंश्लेषणामधील रासायनिक क्रियेबाबतचे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.

क्रिस्टिना व्हान हेमर्ट यांच्याबरोबर ते विवाहबद्ध झाले. डेल्ट विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर, तुलनात्मक जीवरसायनशास्त्राचा अभ्यास करणारे अल्बर्ट जान क्लूवर यांचे ते सहाय्यक झाले. त्यांनी ‘द प्रोपिओनिक ॲसिड  बॅक्टेरिया’ या शीर्षकाचा प्रबंध पीएच.डी. पदवीसाठी लिहिला. त्यानंतर अमेरिका सोडून, स्टॅनफर्ड  विद्यापीठातील हॉपकिन्स मरीन स्टेशनमध्ये त्यांनी आपल्या  संशोधनाचे  काम चालू ठेवले.

त्यांनी पर्पल सल्फर आणि ग्रीन सल्फर बॅक्टेरिया यांचा अभ्यास केला व प्रकाशसंश्लेषणाची क्रिया पूर्णपणे सूर्यप्रकाशावर अवलंबून असलेली क्षपण अभिक्रिया (रिडक्शन रिअॅक्शन) असून यामध्ये वातावरणातील कार्बनडायआक्साईड वायूचे रुपांतर पेशीतील कर्बोदक पदार्थामध्ये होते हे दाखविणारे ते पहिले शास्त्रज्ञ ठरले. त्यांनी मांडलेली रासायनिक क्रिया पुढील प्रमाणे होती.

H2O + CO2         light      [CH2O] + O2

हिरव्या वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणामध्ये कार्बन डायआक्साईडच्या क्षपण क्रियेसाठी लागणारा हायड्रोजन देणारा घटक पाणी हा असून त्याचेच रुपांतर ऑक्सिजनमध्ये होते असे भाकीत त्यांनी मांडले. प्रकाश संश्लेषणाची ही संक्षिप्त रासायनिक क्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण समजण्यासाठीचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. नंतर रॉबर्ट हिल या शास्त्रज्ञाने हे प्रयोगातून सिद्ध करून दाखविले. थोडक्यात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषणामध्ये पाण्याचे विघटन करून ऑक्सिजन उत्सर्जित करतात हे नील यांनी सिद्ध केले. यापूर्वी कार्बन डायऑक्साईडचे विघटन होऊन ऑक्सिजन उत्सर्जित होतो असा समज होता.

सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाची तत्त्वे (बॅक्टेरिअल टॅक्सॉनॉमी) विकसित करण्यामध्ये नील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रॉगर स्तनिर स्टेनियर यांच्या सोबत काम करत असतांना त्यांनी  प्रोकॅरिओटस् (Prokaryotes) या एकपेशीय सूक्ष्मजंतूची व्याख्या केली. यानुसार ज्या पेशीतील केंद्रकाला कसल्याही प्रकारचे आवरण नसते अशा पेशींना प्रोकॅरिओटस असे म्हणतात.

हॉपकिन्स मरीन स्टेशनमध्ये आल्यानंतर लगेचच नील यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयावर एक अभ्यासक्रम सुरू केला. हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आणि लोकप्रिय ठरला. जगभरातील अनेक विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. यातूनच पुढे इस्थर लेडरबर्ग (Esther Lederberg), ॲलन कॅम्पबेल (Allan Campbell) आणि १९५९ सालचे नोबेल पारितोषिक विजेते आर्थर कोर्नबर्ग (Arthur Kornberg)  इत्यादी प्रसिद्ध शास्त्रज्ञ घडले.

अमेरिकेचे विज्ञान क्षेत्रासाठीचे राष्ट्रीय पदक मिळवणारे नील हे पहिले जीवशास्त्रज्ञ ठरले. सूक्ष्मजंतूच्या तुलनात्मक जीवरसायनशास्त्राचा मूलभूत शोध, प्रकाशसंश्लेषणाची क्रिया आणि एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांना जीवशास्त्रातील पदक देऊन सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त सोसायटी फॉर जनरल मायक्रोबायोलॉजीचे मार्जरी स्टीफेन्सन प्राईझ, अमेरिकन सोसायटी ऑफ प्लांट बायोलॉजीस्टचे चार्ल्स केटरिंग अवार्ड, रुमफोर्ड प्राईझ, तर लिव्हेनहूक मेडलने सन्मानित करण्यात आले. पुढे ते रॉयल नेदरलँड्स ॲकेडमी ऑफ आर्टस अँड सायन्सचे प्रवक्ते झाले. कॅलिफोर्नियातील कार्मेल येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Cornelis Bernardus Van Niel ( 1897-1985) Royal Netharlands Academy of Arts and Sciences.
  • Hopkins Marine Station.Hisroty
  • Memorial resolution at Stanford University http:// hms.stanford.edu
  • National Academies Press Biography http://books.nap.edu

समीक्षक : रंजन गर्गे