ब्रीड, रॉबर्ट स्टेनले : (१७ ऑक्टोबर, १८७७ – १० फेब्रुवारी, १९५६)

 ब्रीड अमेरिकन जीवशास्त्रज्ञ होते. पेनसिल्वानियातील ब्रुक्लीन इथे त्यांचा जन्म झाला. अर्म्हेस्ट महाविद्यालयामधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एम. एस. ही पदवी कोलारॅडो विद्यापीठातून आणि पीएच्.डी. ही पदवी हार्वर्ड विद्यापीठातून संपादन केली. पुढे ते आलेघ्नी कॉलेजमध्ये जीवशास्त्राचे प्राध्यापक झाले. याच ठिकाणी त्यांनी तीन वर्षे विद्याशाखेचे सचिव म्हणून काम केले. कीटकांच्या गर्भावस्थेनंतरच्या वाढीसंदर्भातील संशोधनाबाबत तसेच सार्वजनिक दुध वितरणावरील विज्ञानविषयक नियतकालिकांच्या योगदानाविषयी ते विशेष करून ओळखले जायचे. १९०३ साली त्यांनी ‘द चेंजेस विच ऑकर इन द मसल्स ऑफ अ बिटल ड्यूरिंग मेटामॉरफॉसीस’ (रुपांतराच्या वेळी बिटल कीटकांच्या स्नायूंमध्ये होणारे बदल) या शीर्षकाचा शोधनिबंध प्रकाशित केला.

ब्रीड १९१३ मध्ये न्यूयॉर्कमधील जिनेव्हाच्या न्यूयॉर्क कृषी प्रयोग केंद्राच्या जीवाणूशास्त्र विभागाचे प्रमुख झाले. १९२७ साली अमेरिकन जीवाणूशास्त्र मंडळाचे ते अध्यक्ष झाले. १९२० पासून १९५६ पर्यंत ते जीवाणूंच्या वर्गीकरणासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निर्माण केलेल्या बर्गीज मॅन्युअल ऑफ डिटरमीनेटीव बॅक्टेरियालॉजीचे ते प्रमुख संपादक होते.

सॅम्युअल केट प्रेस्कॉट या युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिकेच्या अन्न आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या सोबत काम करून दुधातील मृत आणि जिवंत सूक्ष्मजंतूंची संख्या मोजण्यासाठी प्रत्यक्ष सूक्ष्मदर्शीय पद्धत विकसित केली. बाजारात उपलब्ध असलेल्या दुधाचा दर्जा तपासण्यासाठी ही पद्धत आजही प्रचलित आहे.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे