पेटन, राउस : (५ ऑक्टोबर, १८७९ – १६ फेब्रुवारी, १९७०)
पेटन राउस यांचा जन्म टेक्सास येथे झाला. बाल्टिमोर, मेरीलॅन्ड येथील परिसरात पेटन यांस निसर्गाची ओढ लागली व रानावनातील फुलांचा विस्तृत अभ्यास करून अठराव्या वर्षी त्यांनी बाल्टिमोर सन (Baltimore Sun) या नियतकालिकात त्यावर लेख लिहिले. राउस यांनी बीए (B. A) व एम डी (M.D) या पदव्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून मिळवल्या.
कर्करोग होण्याची कारणे अनेक असतात. उदा., अल्ट्रावायोलेट किरणे, अपायकारक रसायने, धूम्रपान, इतकेच नव्हे तर काही प्रकारच्या कर्करोगाला विषाणुदेखील कारणीभूत असतात. विषाणूंवरचे संशोधन राऊस यांनी केले. सर्वसाधारणपणे शरीरातील पेशींमधील सर्व कार्याचे नियंत्रण गुणसूत्रामधील जनुके करत असतात. परंतु वरील कारणांमुळे कार्यात बिघाड निर्माण झाल्याने ह्या पेशींचे अनावर संवर्धन होते व कर्करोग होतो. ह्या पेशींमधील परिवर्तित जनुकांना ऑन्कोजीन्स असे म्हणतात.
एकदा एका महिलेने राउस यांच्याकडे एक आजारी पाळीव कोंबडी सोपवली. तिच्या पोटात एक मोठी गाठ दिसत होती. त्या गाठीचे निदान व उपचार करून झाले व इथूनच कर्करोगाच्या संशोधनास एक महत्त्वाचे वळण लागले. तोपर्यंत कर्करोगाबद्दल अत्यंत अल्प माहिती होती. त्यात कर्करोग हा विषाणुंमुळे सुद्धा होऊ शकतो याची कोणालाच कल्पना नव्हती.
रोगनिदान तज्ञ (pathologist) म्हणून रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना त्यांनी रेट्रोवायरस (Retrovirus) या जातीतील सार्कोमा वायरस (Sarcoma virus) वर बरेच संशोधन केले. पाळीव कोंबड्यांमध्ये सार्कोमा या प्रकारचा कर्करोग आढळतो व गाठीतील पेशींमधील स्त्रावामुळे सशक्त कोबड्यांमध्ये हा रोग पसरू शकतो. स्त्रावामधील विषाणूंमुळे ही लागण होते असे कळून चुकले. कालांतराने या विषाणूंचे नामकरण राउस सार्कोमा वायरस (Rous Sarcoma Virus) असे केले गेले. या संशोधनामुळे कर्करोग व त्याची जनुके (oncogenes) ह्यांमधे संबंध जोडण्यास सोपे झाले.
पेटन राउस हे याच संशोधनासाठी १९६६ साली नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले.
अनेक विद्यापीठानी त्यांना मानद सदस्यत्व बहाल केले होते. राउस इंग्लंडच्या रॉयल सोसायटीत परदेशी सदस्य म्हणून आणि रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनमध्ये निवडले गेले. डेन्मार्कच्या रॉयल सोसायटी व नॉर्वेच्या अकॅडॅमी ऑफ सायन्स ॲन्ड लेटर्सचे सदस्य, वाइझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे ऑनररी फेलो व पॅरिसच्या अकॅडॅमी ऑफ मेडिसिनमध्ये फॉरेन कॉरस्पॉन्डंट ही विविध पदे भूषविली. नॅशनल अकॅडॅमी ऑफ सायन्सेसचे कोवॅलेंको मेडल व अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे विशिष्ट सेवा पदक राउस यांना मिळाले. अमेरिकन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे लॅस्कर अवॉर्ड, युनायटेड नेशन्सचे कॅन्सर रिसर्चचे पारितोषिक, जर्मनीचे पॉल एऱ्हलिक – लुडविग डार्मस्टॅटर अवॉर्ड (Paul Ehrlich- Ludwig Dormstadter) हेही त्यांना मिळाले.
पहिल्या महायुद्धा दरम्यान पेटन राउस यांनी जखमी सैनिकांना रक्त पुरवण्यात व त्यांची शुश्रुषा करण्यात बराच काळ व्यतीत केला. अमेरिकेत रक्तपेढ्या स्थापन करण्यात त्याचा वाटा होता. त्यानंतर परत त्यांनी कर्करोगाच्या विषाणूंवर लक्ष केंद्रित केले. कर्करोगाची सुरुवात व त्याचा प्रादुर्भाव ह्यावर त्यांनी संशोधन केले.
ते न्यूयॉर्क येथे मृत्यु पावले.
संदर्भ :
- http://blogs.plos.org/workinprogress/2012/02/09/the-story-of-peyton-rous-and-chicken-cancer/
- http://www.encyclopedia.com/people/medicine/medicine-biographies/francis
- http://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1966/rous-bio.htm
समीक्षक : रंजन गर्गे