देशपांडे, केशव बळवंत : ( १६ सप्टेंबर १९१९– २३ सप्टेंबर १९९३ )केशव बळवंत देशपांडे यांचा जन्म पूर्वीच्या हैद्राबाद संस्थानात असलेल्या परभणी या लहान शहरात झाला. सुरुवातीचे शालेय शिक्षण परभणीमध्ये झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी हैद्राबादला गेले. तेथे त्यांनी उस्मानिया विद्यापीठामधून बी. एस्सी. आणि वनस्पतीशास्त्रामधील एम.एस्सी. पदवी प्राप्त केली.
मायकालॉजी आणि प्लँट पॅथॉलॉजी (Mycology and Plant Pathology) हे त्यांचे अभ्यासाचे आणि संशोधनाचे विषय होते. कृषी खात्यात चार वर्षे सहाय्यक वैज्ञानिक पदावर काम केल्यानंतर ते उस्मानिया विद्यापिठात व्याख्याता म्हणून रुजू झाले. या कालावधीत त्यांना इंग्लंडमध्ये इंपिरियल कॉलेजमध्ये आर. के. एस. वुड या मायकालॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्याची संधी मिळाली. मायदेशी परत आल्यावर ते उस्मानिया विद्यापिठात प्रपाठक होते. नंतर ते नव्याने स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापिठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले आणि या विभागास जागतिक दर्जा देऊन १९७९ साली ते सेवानिवृत्त झाले. वनस्पतीशास्त्र विभागामधील त्यांच्या प्रयोगशाळेस त्यांच्या नावाने ओळख प्राप्त झाली होती. १००च्या वर संशोधन निबंध आणि १९ पीएच्. डी.चे विद्यार्थी ही त्यांची शैक्षणिक संपत्ती होती. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागास जोडून असलेले वनस्पती उद्यान आणि त्यामधील विविध प्रकारच्या वनस्पतींची श्रीमंती आणि प्रयोगशाळा हे कार्य के. बी. देशपांडे यांच्या प्रयत्नांमधून साकार झाले. प्राध्यापकांनी फक्त शिक्षकी पेशाचे कार्य न करता कायम संशोधन वृत्तीने जगावयास हवे, यासाठी ते कायम आग्रही राहिले. मराठवाडा विभागामधील मॉसेसचा (Mosses) संपूर्ण अभ्यास पूर्ण करण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते.
वनस्पतीच्या मुळांशी जोडून असलेल्या बुरशी, मुळांभोवतालचे (Rhizosphere) त्यांचे कार्य या क्षेत्रात त्यांचा अभ्यास होता. के. बी. देशपांडे अमेरिकन मायकालॉजी सोसायटीचे मानद सदस्य होते. त्याच बरोबर इंडियन बोटॅनिकल सोसायटी, इंडियन फायटो पॅथॉलॉजीकल सोसायटी तसेच महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्सेसचेही ते मानद सदस्य होते. मराठी विश्वकोशामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
के. बी. देशपांडे यांचा १९३८ च्या वंदे मातरम चळवळीत आणि हैद्राबाद मुक्तीसंग्रामात सहभाग होता.
संदर्भ :
- Deshpande, K. B., ‘Studies on Nitrogen Metabolism of Rhizoctoniasolani Kuhn.’, Journal of Biological Sciences, 1, pp1-5, 1959.
- Deshpande, K. B., ‘Prospects of Botany Teaching and Research.’ J. Marathwada University, 13(2), pp 142- 154, 1963.
- Deshpande, K. B. and Rao, R., ‘Common Mosses of Aurangabad.’ J. Marathwa University, 2, pp 55-57, 1965.
समीक्षक: चाफेकर, शरद