वेंकटरमण, टी. एस. : ( १५ जून १८८४ – १८ जानेवारी १९६३ )

थिरूवैयारू सांबासिवा (टी.एस.) वेंकटरमण यांचा जन्म दक्षिणेतील सालेम जिल्ह्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्रिची येथे झाले. त्यांनी चेन्नई (मद्रास) येथील प्रेसिडेंसी कॉलेजमधून वनस्पतीशास्त्र विषयात पदवी घेतली. पदवीनंतर त्यांची मद्रास विद्यापीठामध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून निवड झाली. मद्रास विद्यापीठातून  एम.एस्सी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर ते वनस्पतीशास्त्रज्ञ बार्बर यांचे सहाय्यक म्हणून रूजू झाले. चेन्नई शासनाचे कृषी विभागाचे संशोधन कार्य कृषी महाविद्यालय सैदपेठ येथे चाले. वेंकटरमण त्या ठिकाणी प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करत. पुढे हे केंद्र कोईमतूर येथे नेण्यात आले. वेंकटरमण यानी मेंडेलप्रमाणे घरीच प्रयोग सुरू केले. त्यांच्या संशोधनाचे महत्त्व लक्षात घेवून आंध्र विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. पदवी प्रदान केली.

वेंकटरमण हे शिक्षक होते. पुसा येथील इंपिरिअल डिपार्टमेंट ऑफ केन ब्रिडींग विभागात वरिष्ठ सहाय्यक बनले. येथे त्यांनी सात वर्ष संशोधन केले. दक्षिण भारतातील पिकाची त्यांना चांगली माहिती होती. उत्तरेत कार्य करताना एकाच पिकाच्या भिन्न वातावरणात वाढणाऱ्या जाती, त्यांचे वाण प्रकार हे समजून घेता आले. ऊस हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय. त्यांनी सोबत हरभरा, कोबी, सातू, गहू, मुळा अशा विविध पिकांची गुणसूत्रे अभ्यासली. त्यांच्या संकरित वाण निर्मितीचे प्रयत्न केले. पंडित मदन मोहन मालवीय यांनी कुपोषणावर मात करण्यासाठी ऊस आणि साखर यावर संशोधन करावे असे वेंकटरमण यांना सांगितले. त्यावरून  पुसा येथील केंद्रात त्यांनी प्रयोग सुरू केले. त्या काळी एकाच जनुकीय गटातील वाणांचा संकर घडवण्यात येत असे. बार्बर यांच्या सेवानिवृत्तीनंतर वेंकटरमण कोइमतूर येथील शुगरकेन प्रजनन केंद्राचे प्रमुख झाले. भारतातील लागवडीखालील स्थानिक ऊस कमी गोडीचा आणि कडक होता. त्याला पाणी खूप लागे. पीक तयार व्हायला अठरा महिने लागत. परदेशातून साखरेप्रमाणे ऊसही आयात करत. अशा परिस्थितीत भारतात सुयोग्य ऊसाचा वाण तयार करण्यासाठी वेंकटरमण यांनी कार्य सुरू केले. या केंद्रात महिला संशोधक जानकी अम्मल यांची वेंकटरमण यांना मोठी मदत झाली.

दक्षिणेतील स्थानिक ऊसाला फुलोरा येई. मात्र उत्तरेतील ऊसाला तो येत नसे. त्यांनी उत्तरेतील ऊसाचे वाण आणून कोईमतूर येथे लावले आणि त्या वाणालाही फुलोरा आला. त्यांचा संकर करून नवीन वाण तयार केले. यातील कांही चांगले वाण होते. मात्र मऊ गाभ्याचा जास्त गोडी असणाऱ्या, लवकर वाढणाऱ्या, उंच वाढणाऱ्या आणि कमी कालावधीत येणाऱ्या ऊसाचे वाण तयार होत नव्हते. म्हणून त्यांनी बांबूचा ऊसाबरोबर संकर घडवला. त्यातून वेगळ्या ऊसाच्या वाणाची मालिका तयार झाली. कोईमतूरमधून सीओ ही अक्षरे निवडून नव्या वाणांची नावे ठेवली.

सीओ २०५, २५५, २९९, ३१२, ३१३, ५१३ आणि सीओ ५२७ या सुधारित जातींनी भारताला ऊस उत्पादनात आघाडीवर आणले. भारत कांही वर्षातच साखर निर्यात करू लागला. या कार्यात वेंकटरमण यांनी केलेली वाणांची निवड, त्यांच्या फुलोऱ्याचा काळ, बीज निर्मितीचा अभ्यास यांचा वाटा फार मोठा होता. संशोधन प्रसिद्ध न करता झालेल्या या ऊस क्रांतीने जगाला आश्चर्यचकित केले. ब्रिटीश शासनाने तर या कार्यामुळे वेंकटरमण यांना ‘सर’ ही उपाधी प्रदान केली. आजही यातील कित्येक जातीची लागवड भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंडोनेशिया आणि पाकिस्तानात होते. सीओ २८१ हे वाण अमेरिकेतील लुइसाना प्रांतात, या वाणाबरोबर सीओ २९० वाण दक्षिण अफ्रिकेत लावण्यात येऊ लागले. क्युबामधून भारत ऊस आणि साखर आयात करत होता. त्या राष्ट्रातही सीओ २८१ वाणाची लागवड होऊ लागली. केवळ पावसाच्या पाण्यावर येणारा सीओ ५८३ हे वाणही त्याकाळी खूप लोकप्रिय झाले होते. १९१९ पासून सेवानिवृत्त होईपर्यंत वेंकटरमण कोईमतूर येथील ऊस केंद्रात कार्यरत राहिले. त्यांच्या या कार्यामुळेच ‘ऊसाचा जादूगार’ म्हणून जग त्यांना ओळखू लागले.

वेंकटरमण इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे संस्थापक, आंतरराष्ट्रीय स्तरावर जेनेटिक्स काँग्रेस असोसिएशनचे सदस्य, इंडियन सोसायटी फॉर जेनेटीक्स अँड प्लँट ब्रिडींगचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय ऊस व साखर उत्पादक संघाचे सदस्य व विभागीय अध्यक्ष अशा अनेक ठिकाणी त्यांनी कार्य केले. त्यांना  रावसाहेब, रावबहाद्दूर, कमांडर ऑफ द इंडियन एंपायर, सर या उपाधी देऊन ब्रिटीश शासनाने त्यांचा गौरव केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. कृषी विभागाचे अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांना कार्य करण्याची संधी मिळाली.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा