हॉवर्ड, अल्बर्ट : ( ८ डिसेंबर,१८७३ – २० ऑक्टोबर, १९४७ )

ब्रिटनमधील श्रॉपशायर परगण्यात अल्बर्ट यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रेकिन महाविद्यालयातून झाले. पुढे त्यांनी सेंट जॉन कॉलेजमधून केंब्रिज विद्यापीठाची निसर्ग विज्ञान विषयातून पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी कृषीशास्त्राचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी कृषीशास्त्राचा शिक्षक म्हणून इंपिरिअल डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चरल कॉलेजमध्ये कामाला सुरुवात केली. नंतर त्यांची वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून कृषी महाविद्यालयात नियुक्ती झाली. १९०५ पासून भारताचा कारभार पाहणाऱ्या खात्यामध्ये त्यांची बदली झाली. या खात्यात वनस्पतीशास्त्रातील अर्थ सल्लागार म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर त्यांची भारतात पाश्चिमात्य शेती पद्धती रूजविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली.

लॉर्ड कर्झन यांनी त्या काळी पुसा येथे कृषी संशोधन संस्था सुरू केली होती. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे मोठी जिवीतहानी होत होती. यातून जनतेला वाचवायचे असेल तर कृषी उत्पादन वाढवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची होती. अन्नधान्य खरेदी करून ते सरकार पूर्ण करू शकत नव्हते. त्यासाठी भारतात लॉर्ड कर्झन यांच्या पुढाकाराने कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक संशोधकांच्या नियुक्त्या झाल्या. त्यामध्ये अल्बर्ट यांचा समावेश होता. अल्बर्ट यांनी पुसा येथील कृषी संशोधन केंद्रात कार्य सुरू केले. त्यानी सुरुवातीला येथील लोकांच्या आहाराच्या पद्धतीचा अभ्यास सुरू केला. एकदा जंगलात फिरताना त्यांना कांही आदिवासी भेटले. त्यांच्या आहार पद्धतींची त्यानी माहिती घेतली. तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की हे लोक निसर्गत: पिकवलेली फळे आणि अन्य घटक खाऊनही ही मंडळी धष्टपुष्ट आहेत. त्यांनी या मंडळींच्या शेतीचा अभ्यास केला. इतर ग्रामीण भागातील शेती पद्धती अभ्यासली. त्यातून पिकणाऱ्या पदार्थातील सकसपणा अभ्यासला आणि नंतर त्याना या शेती पद्धतीचे महत्त्व समजले. पाश्चिमात्य शेती पध्दती भारतात रूजविण्यासाठी आलेले अल्बर्ट भारतातील शेती पद्धतीच्या हळूहळू प्रेमात पडू लागले.

भारतीय शेतीतून होणारे अन्नधान्याचे उत्पादन हे अधिक पोषक असल्याचे निरीक्षणांती त्यांच्या लक्षात आले. माती जर सकस असेल, वनस्पतींना आवश्यक असणारे सर्व अन्नघटक धारण करणारी मृदा असेल आणि अशा मातीत उत्पादित झालेले अन्न आहारात असेल तर मानव आणि पशू आजारी पडणार नाहीत असे प्रतिपादन अल्बर्ट यांनी केले. हे शास्त्रीय पातळीवर तपासून त्यांनी ‘माती निरोगी असेल तर मानव आणि पशू निरोगी राहतील’ असे त्यांनी सांगितले. पीक काढणी केल्यानंतर पिकाचा उर्वरीत भाग जमिनीत कुजवणे आणि शेतात पसरण्याची पद्धत याचा त्यांनी अभ्यास केला. शेतातील टाकाऊ घटक कुजवण्यासाठी त्यांनी इंदौर संस्थानाच्या शेतीत प्रयोग केले. विशिष्ट आकाराचा खड्डा घेऊन त्यामध्ये सेंद्रिय खतांची निर्मिती करणे ही पद्धती पुढे इंदौर पॅटर्न म्हणून ओळखली जाऊ लागली. भारतीय शेतकरी माझे गुरू आहेत असे ते अभिमानाने सांगत.

वनस्पती उत्पादन विभागाचे संचालक म्हणूनही अल्बर्ट यांनी काम पाहिले. इंदौर आणि राजपुताना संस्थानाचे ते कृषी मार्गदर्शक होते. रॉयल सोसायटीने फेलो म्हणून त्यांची नियुक्ती केली. इंदौरच्या शेती संशोधन केंद्राचे ते प्रमुख होते. अल्बर्ट यांनी सेंद्रीय खत बनवण्याचा इंदौर पॅटर्न विकसित केला. तसेच ॲग्रीकल्चरल टेस्टामेंट (Agricultural testament) हे सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करणारे पुस्तक त्यांनी लिहिले. भारतीय शेती पद्धतीचा पुरस्कार करणारे त्यांचे फार्मिंग ऑर गार्डनिंग फॉर हेल्थ ऑर डिसिज  (‘Farming Or gardening for health or disease’) हे पुस्तक प्रकाशित झाले. या व्यतिरिक्तही त्यांचे अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

मातीचे महत्त्व ओळखून रासायनिक खतांना त्यांनी दूर केले. खत कंपन्यांना हे मानवणारे नव्हते. शासनाला त्यांचे हे उद्योग पटले नाहीत. मात्र नंतर त्यांना ‘सर’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. शेवटचा श्वास घेईपर्यंत हा संशोधक भारतीय शेती पद्धतीचा पुरस्कार करत राहिला.

भारतात वारंवार मोठे दुष्काळ पडत होते. या दुष्काळावर मात करायची तर आधुनिक पाश्चात्य शेती पद्धत शिकविण्यासाठी अल्बर्ट यांना ब्रिटीश शासनाने भारतात पाठवले होते. परंतु भारतातील पारंपारिक शेतीच्या प्रेमात पडून ते शेती कशी करावयाची हे शिकायचे असेल तर भारतात या असे सांगू लागले. त्यामुळे सर अल्बर्ट हॉवर्ड सेंद्रीय शेती पध्दतीचे जनक म्हणून ओळखले जातात.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा