ॲलिसन,जेम्स पॅट्रिक : ( ७ ऑगस्ट १९४८ )
जेम्स ॲलिसन यांचा जन्म अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील अलिस येथे झाला. जेम्स ॲलिसन शाळेत असताना त्यांच्या गणिताच्या शिक्षकांनी त्यांना आठव्या इयत्तेत असताना जीवशास्त्राची गोडी लावली. त्यांनी सूक्षमजीवशास्त्र या विषयातील पदवी टेक्सास विद्यापीठामधून घेतली आणि जॉर्ज बॅरी किट्टो यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्सास विद्यापीठामधून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. संपादन केली. १९७४-७७ या कालावधित स्क्रिप्स क्लिनिक अँड रीसर्च फाउंडेशन कॅलिफोर्निया येथे रेण्वीय प्रतिक्षमताशास्त्रात (molecular immunology) काम केले. १९७७ पासून त्यांनी कॅलिफोर्नियातील बर्कलेच्या लुडविग सेंटर फॉर कँन्सर इम्युनोथेरपी संस्थेचे संचालक अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
ॲलिसन ११ वर्षाचे असताना त्यांची आई लसिकाग्रंथीच्या कर्करोगाने (lymphoma) वारली. त्यांचे दोन काकाही कर्करोगाने मरण पावले. त्यांचा थोरला भाऊही पूरस्थ ग्रंथीच्या (prostate cancer) कर्करोगाने दगावला. त्यामुळे आणि विज्ञानात अत्युच्च पदवी घेताना त्यांना प्रतिक्षमता संस्थेविषयी कुतुहल निर्माण झाल्या नेत्यांनी प्रतिक्षमता विज्ञान संशोधन करण्याचे ठरवले. प्रयोग करत असताना विकरांच्या सहाय्याने उंदरांमधील कर्करोगाची गाठ नाहीशी झाली आहे असे त्यांना आढळून आले. प्रतिक्षमता यंत्रणा कर्करोगाचा नाश करण्याकरिता उपयुक्त ठरेल असा विश्वास ॲलिसन यांना होता. आता त्यांची संशोधनाची पुढची दिशा ठरली-ती म्हणजे रक्तामधल्या टी-पेशी.
मानवी शरीरातील प्रतिक्षमता दोन प्रकारची असते. जन्मजात (innate) आणि अनुकूलक (adaptive/acquired). जन्मजात प्रतिक्षमता यंत्रणेमधील भक्षक व सैनिकी पेशी शरीरात शिरलेल्या जीवाणू किंवा परजीवींचा नाश करतात. अनुकूलक प्रतिक्षमतेमध्ये टी-पेशी आणि बी-लसिका पेशींचा सहभाग असतो. टी-पेशी आणि बी-पेशींचा स्त्रोत मूळपेशी आहेत (स्टेम सेल्स). टी-पेशी या यौवन लोपी (thymus) ग्रंथीत कार्यरत असतात. त्यांचे मुख्य कार्य कर्करोगाच्या पेशी मारणे आणि रोगप्रतिकार प्रतिसादावर नियंत्रण करणे. टी लसीका पेशींपैकीमारक टी पेशी (killer T cells) संसर्ग झालेल्या पेशी पृष्ठभागावर जीवाणू विषाणूंची प्रथिने असल्यास त्यांची पाहणी करतात. तर सहाय्यक टी लसीका पेशी (helper T cells) प्रतिक्षमता यंत्रणेमधील इतर पेशींना बाह्यकणांचा मुकाबला करण्यास आणि प्रतिसाद देण्यास मदत करतात. नियंत्रक टी-लसीका पेशी (regulatory T cells) या प्रतिक्षमता यंत्रणेवर नियंत्रण ठेवतात. स्मृती टी पेशी (memory T cells) अस्तित्वात असलेल्या प्रतिजनांविरूद्ध संरक्षण देण्याचे काम करतात. नैसर्गिक मारक टी पेशी (natural killer T cells) या इतर श्वेतपेशींवर आणि प्रतिकार प्रतिसादावर नियंत्रण करणाऱ्या घटकावर नियंत्रण ठेवतात.
बी लसिका पेशी या अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. या प्रामुख्याने प्रतिद्रव्य (antibody) तयार करतात. बी पेशींचे पण स्मृती पेशी (memory cells) आणि नियंत्रक किंवा नियामक (regulatory) पेशी असे प्रकार आहेत.
या विशिष्ट पेशी आपल्या प्रतिक्षमता यंत्रणेच्या खास दूत आहेत. या पेशींना बाह्यकणांचा पूर्वेतिहास ज्ञात असतो. म्हणजे एखादा बाह्यकण पुन्हा पुन्हा आक्रमण करत असेल, तर त्या बाह्यकणाचे शरीरात वावरणे आणि त्याच्याशी झालेली देवाणघेवाण ह्या पेशी ओळखतात आणि मुकाबला करतात. म्हणूनच त्यांचा कर्करोग निवारणात उपयोग होऊ शकेल अशी खात्री अॅलिसन यांना होती.
ॲलिसन यांना रक्तामधील टी लसीका पेशींबद्दल खूप आकर्षण होते. टी लसीका पेशी, पेशी पृष्ठभागावरील घातक प्रथिने ओळखू शकतात. असे एक प्रथिन ॲलिसन आणि त्यांच्या सहायकांनी १९८२ साली शोधले. तसेच पेशींवरील प्रतिजन ग्राही टोकाची (antigen receptor) रचना शोधून काढली. पुढे त्यांनी असे सिद्ध केले की टी पेशींना उत्तेजित करण्याकरिता आणि जगण्याकरिता सीडी-२८ (cd-28-cluster of differentiation) या सहाय्यक दर्शक रेणूची आवश्यकता असते. सीटीएलए – ४ (CTLA-4- cytotoxic lymphocyte associated Protein 4) हा पेशीभक्षक श्वेताणूंशी जोडलेला प्रथिनाचा रेणू असतो आणि हा रेणू टी पेशींच्या कार्याला प्रतिबंध करतो असे सिद्ध झाले. परंतु या प्रथिनाचे नक्की कार्य उलगडले नव्हते. ॲलिसन यांनी यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या अंदाजानुसार सीटीएलए – ४ ला जर अडथळा केला तर टी पेशी मुक्त होतील आणि कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करतील. या गृहितकावर आधारीत प्रयोग त्यांनी सुरू झाले. त्यापूर्वी त्यांनी उंदरांवर प्रयोग केले गेले. प्रारंभी सर्व उंदरांना कर्करोग सुरू करणाऱ्या पेशी टोचल्या. एक गट तसाच ठेवला. तर दुसऱ्या गटातील उंदरांना सीटीएलए-४ ला अडथळा करणारे प्रतिद्रव्य (monoclonal antibodies) टोचण्यात आले. पहिल्या समूहातील सर्व उंदीर मरण पावले. तर दुसऱ्या गटातील सुमारे ९० टक्के उंदरांमधील कर्करोगाची गाठ नाहीशी झाली. ॲलिसन यांनी हा प्रयोग पुन्हा करून पाहिला. काळजीपूर्वक केलल्या या प्रयोगातून त्यांना दिसून आले की कर्करोगाची गाठ अक्षरश: विरघळून गेली आहे. याशिवाय सीटीएलए-४ प्रतिद्रव्यामुळे दीर्घकाळ अडथळा होत असल्याचे आढळून आले. इतर प्राण्यांवरील प्रयोगाचे निष्कर्ष आशादायक होते. या प्रयोगामुळे एका नव्या उपचार पद्धतीचा उदय झाला. याला ॲलिसन यांनी नाव दिले ‘प्रतिक्षमता तपासनाका नाकेबंदी उपचार पद्धत’ (immune checkpoint blockade therapy). ही पद्धत विविध प्रकारच्या कर्करोगांवर प्रभावी दिसून आली. याचे स्वामीत्व हक्क ॲलिसन यांनी घेतले. त्यानंतर खूप अडथळे पार करत अखेर लिपिलिमुमाब ( Ipilimumab) हे औषध तयार झाले. कर्करोग निवारण करणारे हे पहिले प्रभावी औषध ठरले. हे संशोधन क्रांतिकारी ठरले.
प्रचलित कर्करोग निवारण पद्धतींचे काही दुष्परिणाम होते. कर्करोगाने दगावणाऱ्या रूग्णांची संख्या लक्षात घेता ॲलिसन यांची उपचार पद्धत नक्कीच परिणामकारक होती. हे संशोधन प्रत्यक्षात यायला १९७३-२०१८ एव्हढा कालावधी जावा लागला. या पद्धतीचे महत्व ओळखून जेम्स पॅट्रिक ॲलिसन यांनी कर्करोग निवारणासाठी शोधलेल्या नवीन उपचार अथवा चिकित्सा पद्धतीस म्हणजेच ‘प्रतिकार तपासनाका नाकेबंदी उपचार पद्धत’ (immune checkpoint blockade therapy) यास २०१८ साली शरीराक्रिया विज्ञान व वैद्यक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
संदर्भ :
- https://www.britanica.com
- https://medicinalnewstoday.com
- https://whatisbiotechnolgy.org
समीक्षक : मोहन मद्वाण्णा