बॅन्टिंग, फ्रेडरिक ग्रँट : ( १४ नोव्हेंबर १८९१ ते २१ फेब्रुवारी १९४१ )

फ्रेडरिक ग्रँट बॅन्टिंग यांचा जन्म कॅनडाच्या दक्षिणपूर्व ऑन्टारियो येथे ॲलिस्टनमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ॲलिस्टन हायस्कूलमध्ये झाले. १९१० मध्ये त्यांनी पदवी संपादन केली आणि टोरंटो विद्यापीठाच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये ब्रह्मज्ञानाचा (Divinity/Ministry) अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. एक वर्षानंतर, बॅन्टिंग यांनी टोरंटो विद्यापीठाच्याच वैद्यकीय शाळेत आपली बदली करुन घेतली. १९१५ मध्ये त्यांनी रॉयल कॅनेडियन आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये नोंदणी केली परंतु मेडिकलचे प्रशिक्षण टोरंटो विद्यापीठामध्येच सुरू ठेवण्याची परवानगी घेऊन वैद्यकीय पदवी प्राप्त केली. १९१४-१९१८ च्या पहिल्या महायुद्धात बॅन्टिंग कॅनडाच्या सैन्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते, प्रथम इंग्लंड आणि त्यानंतर फ्रान्समध्ये, केंब्राय येथे त्यांच्या हाताला दुखापत असूनही, त्यांनी जखमींवर उपचार केले आणि सैनिकी क्रॉस मिळविला. नंतरची दोन वर्षे, बॅन्टिंग टोरोंटोमधील मुलांच्या रुग्णालयात निवासी शल्यचिकित्सक होते आणि नंतर त्यांनी ऑन्टारियो लंडन येथे आपली शस्त्रक्रियेची खासगी प्रॅक्टिस सुरू केली. तसेच लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ओंटारियो मेडिकल स्कूलमध्ये ते शरीरविज्ञानशास्त्राचे प्रशिक्षकही होते. जोसेफ फॉन मिरिंग आणि ऑस्कर मिंकोव्स्की यांना १८८९ मध्ये आढळले की कुत्र्यांचे स्वादुपिंड पूर्णपणे काढून टाकल्यामुळे तीव्र स्वरूपाचा मधुमेह होतो. यावरून शास्त्रज्ञांनी असे गृहित धरले की स्वादुपिंडांत साखरेचे चयापचय नियंत्रित करणारे काही अर्क असावेत, परंतु हा अर्क वेगळा करण्याच्या प्रयत्नात ते वारंवार अपयशी ठरले. मे १९२१ मध्ये बॅन्टिंग स्वादुपिंडाच्या अंतर्गतस्रावांविषयी संशोधन करण्यासाठी टोरोंटो विद्यापीठात गेले. लंडनमध्ये त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिस तशी संथ होती त्यामुळे आर्थिक चिंता तर होतीच तरीही काहीतरी महत्त्वपूर्ण किंवा भव्य संशोधनकार्य करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. स्वादुपिंडाच्या विषयावर जेव्हा ते व्याख्यानाची तयारी करत होते, तेव्हा सर्जरीच्या एका जर्नलमधील संबंधित लेखाद्वारे त्यांची मधुमेह आणि स्वादुपिंडाच्या संशोधनाबद्दलची आवड अधिक तीव्र झाली. या लेखात हे व्यक्त केले होते की जेव्हा स्वादुपिंडाच्या नलिकेमध्ये खडयांमुळे अडथळा निर्माण होतो, तेव्हा स्वादुपिंडाच्या बाहेरील एसीनर (Acinar) पेशी नष्ट होतात, पण आतील आयलेटच्या (Islet) पेशी तशाच शाबूत राहतात. बॅन्टिंगची कल्पना ही होती की स्वादुपिंडाच्या नलिकांना जाणीवपूर्वक बांधल्याने त्यातील एसीनर पेशी निकाम्या करायच्या व व्यवस्थित असलेल्या आयलेट पेशीपासून अंतर्गतस्राव वेगळे करायचे. तसेच हे स्राव साखरेच्या चयापचयात मदत करते हे आधीपासूनच सिद्ध झाले होते, कदाचित हाच स्राव मधुमेहावरील उपचार असू शकतो, असे त्यांनी नमूद केले. या संभाव्यतेचा शोध घेत असताना बॅन्टिंग यांनी अनेक लोकांशी चर्चा केली, ज्यांपैकी टोरंटो विद्यापीठाचे शरीरविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक जे. जे. आर. मॅकलिओड यांनी त्यांना प्रयोगकामांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्याच वर्षी त्यांनी कुत्र्यांमधील स्वादुपिंडावर, चार्ल्स बेस्ट (ते त्यावेळी वैद्यकीय विद्यार्थी होते) यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली. बॅन्टिंग आणि बेस्ट यांनी सात आठवड्यांसाठी अनेक कुत्र्यांच्या स्वादुपिंड नलिका बांधल्या. त्यामुळे स्वादुपिंडाच्या काही पेशी संकुचन पावल्या, परंतु लँगरहॅन्सच्या आयलेटच्या (Islet of Langerhans) पेशी तशाच शाबूत राहिल्या आणि त्यातून प्राप्त केलेले हे अर्क इंजेक्शनने त्यांनी कृत्रिम मधुमेह असलेल्या कुत्र्यांमध्ये (ज्यांचे स्वादूपिंड काढून टाकले होते) त्यांना दिले. कुत्र्यांचे आरोग्य त्वरित पूर्ववत झाले. हाच अर्क पुढे मधुमेह रूग्णांच्या उपचारसाठी प्रभावी ठरला. बॅन्टिंग आणि बेस्टने या अर्काचे नाव आयलेटिन ठेवले, परंतु मॅक्लॉडने ते आयलँड या लॅटिन शब्दापासून इन्सुलिन असे केले. कॅनेडियन जीवरसायनशास्त्रज्ञ जेम्स बी. कॉलीप यांनी अर्कातून इन्सुलिन शुद्ध केले, जे १९२२ च्या उत्तरार्धात व्यावसायिकपणे सर्वत्र उपलब्ध झाले. १९२२ मध्ये, १४ वर्षाचा लियोनार्ड थॉम्पसन हा मधुमेहाचा पहिला रुग्ण होता ज्याला इन्सुलिन देण्यात आले व त्याचा प्रतिसादही चांगला मिळाला.

फ्रेडरिक ग्रँट बॅन्टिंग व चार्ल्स एच. बेस्ट यांना स्वादुपिंडातून इन्सुलिन संप्रेरक काढण्यास सर्वप्रथम (१९२१) यश लाभले. ते मधुमेहासाठी जगभरात रामबाण आणि अत्यंत महत्त्वाचे उपाय सिद्ध झाले. मे १९२३ मध्ये त्यांच्या या कामगिरीसाठी बॅन्टिंग आणि स्कॉटीश शरीरविज्ञानतज्ज्ञ जे. जे मॅक्लेओड यांना मेडिसिनचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. १९२३ मध्ये, बॅन्टिंग टोरोंटो विद्यापीठात बॅन्टिंग आणि बेस्ट मेडिकल रिसर्च विभागाचे संचालक झाले. १९२७ मध्ये बॅन्टिंग यांची रॉयल सोसायटी ऑफ कॅनडाचे सहकारी म्हणून निवड करण्यात आली. १९३४ मध्ये किंग जॉर्ज V यांनी बॅन्टिंग यांना नाइट हा किताब प्रदान केला, तसेच त्याचवर्षी लंडनच्या रॉयल सोसायटीचे सहकारी म्हणून त्यांची निवड झाली. दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५), बॅन्टिंग यांनी कॅनेडियन सैन्याच्या वैद्यकीय दलात प्रमुख म्हणून आणि कॅनडाच्या राष्ट्रीय संशोधन परिषदेच्या वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. बॅन्टिंग यांना त्यांच्या संशोधनाच्या व्यतिरिक्त कलेतही रूची होती आणि ते स्वतः एक कुशल कलाकार होते. बेल्जियम, कॅनडा, क्रोएशिया, कुवैत, ट्रान्सकी, उरुग्वे आणि स्वित्झर्लंड या देशांनी पोस्टाची तिकिटे काढून फ्रेडरिक ग्रँट बॅन्टिंग यांना गौरविले.

वयाच्या ४९ व्या वर्षी, लष्करी मोहिमेवर असताना बॅन्टिंग यांचा न्यू फाउंडलँडजवळ विमान अपघातात मृत्यू झाला.

संदर्भ :

  • Aab Best C H (November 1, 1942) Frederick Grant Banting (1891-1941)-Obituary Notices of Fellows of Royal Society 4(11) 20.26 doi:10 1098/rsbm 1942 0003
  • ‘Frederick Grant Banting (1891-1941) co-discoverer of Insulin’ Journal of American Medical Association 198 (6) 660-61.1966 doi:10 1001/jama 1966.03 110 190142041
  • Frederick G. Banting-Facts Nobel/Prize.org Nobel Media AB Retrieved September 26, 2013

समीक्षक : राजेंद्र आगरकर