बेनेरीतो रूथ र. : (१२ जानेवारी १९१६- ५ ऑक्टोबर २०१३ ) विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध नसतानाही बेनेरीतोच्या वडलांनी त्यांच्या मुलींना त्या उपलब्ध करून दिल्या. बेनेरीतो यांनी १९३५ मध्ये ट्यूलेन विद्यापीठाची पदवी घेतली. नंतर त्या न्यूकॉम्बला आल्या आणि तेथे त्यांनी रसायनशास्त्र, सेंद्रीय रसायनशास्त्र आणि थर्मोडायनामिक्स हे विषय शिकवले आणि भौतिक सेंद्रीय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यांनी ट्यूलेन विद्यापीठामधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि नंतर शिकागो विद्यापीठामधून पीएच.डी. पदवी घेतली. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचा बराच कालावधी अमेरिकेच्या साउथ रीजनल रिसर्च सेंटर (USDA)आणि न्यू ऑरलिन्स येथे काम केले. १९८६मध्ये त्या साउथ रीजनल रिसर्च सेंटरमधून निवृत्त झाल्या; आणि त्यांनी ट्यूलेन विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ न्यू ऑरलिन्स येथे शिकवण्याचे काम केले.

बेनेरीतो यांनी सुरकुत्या न पडणारे सुती कापड बनवण्यासाठी रासायनिक प्रक्रियेचा शोध लावला. त्यामुळे त्या कापडात सुरकुत्या न पडणारे त्याच बरोबर न जळणारे आणि डाग न पडणारे कापड तयार झाले. त्यांच्या या शोधाने सुती व्यवसायाला तारले असे म्हटले जाते. या शोधामागचे तंत्र क्रॉस-लिंकिंगहे आहे. क्रॉस-लिंकिंगमध्ये साखळीसारखे सेल्युलोजचे रेणू रासायनिक प्रक्रियेने एकमेकांना जोडले जातात. सुती कापडात सेल्युलोज रेणू एकमेकांना हायड्रोजन बंधाकरवी जोडले जातात. परंतु त्याची ताकद कमी असते. त्यामुळे सुती कापडाला सुरकुत्या पडतात. बेनेरितो यांनी नवीन पद्धत शोधली. त्यामुळे सेल्युलोज रेणूमधील बंध ताकदवान झाला. ह्या नवीन प्रक्रियेत त्यांनी छोटे सेंद्रिय मॉलेक्युल्स सेल्युलोज रेणूमध्ये जोडले.

त्यांच्या वस्त्रशास्त्रातील योगदानाव्यतिरिक्त आणखी वाखाणण्याजोगे काम म्हणजे कोरियन युद्धात अतिशय घायाळ झालेल्या सैनिकांना त्वरित मेद (फॅट्स) देण्याची पद्धत त्यांनी शोधून काढली. त्याचा युद्धात खूप उपयोग झाला. या शिवाय त्यांच्या संशोधनातून तयार झालेले काचेचे धागे प्रयोगशाळेच्या उपकरणांसाठी उपयुक्त ठरले.

रुथ बेनेरीतो ह्यांच्या नावे ५५ पेटंट्स आहेत. त्यांना त्यांच्या टेक्सटाईलमधील कामासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी लेमेलसन एम आय टी लाइफटाइम अचिएव्हमेन्ट पुरस्कार आणि वूमन ऑफ अचिएव्हमेन्ट ॲट वर्ल्ड फेअर हे पुरस्कार मिळाले.

संदर्भ :

  • Ruth Benerito, Cotton Chemist of Permanent Press,renown dies at 97.New York Times-Retrieved 7 October 2013
  • The Woman who changed American Social Fabric with actual fabric,Times October 7, 2013

समीक्षक : दिलीप हेर्लेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.