टेस्लर, लॉरेन्स गॉर्डन : ( २४ एप्रिल १९४५ ते १६ फेब्रुवारी २०२० )

टेस्लर यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्राँक्स भागात झाला. त्यांचे शालेय व पदवीपर्यंतचे शिक्षण क्रमश: ब्राँक्स विद्यालय आणि महाविद्यालयात झाले. शालेय वयापासूनच गणिताची विशेष आवड असलेल्या टेस्लर यांनी अविभाज्य संख्या निर्माण करण्याकरिता एक रीत विकसित करून शिक्षकांसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षी संगणकशास्त्र आणि त्यानंतर चार वर्षांनी गणितातील पदवी प्राप्त करत स्टॅनफर्ड विद्यापीठात आपले नाव गाजवले. शिक्षण घेत असतानाच टेस्लर यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आजूबाजूच्या परिसरात संगणक कार्यक्रमाच्या (प्रोग्रॅमिंग) सेवा पुरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे या काळाच्या अग्रगण्य संगणक प्रोग्रॅमरमध्ये टेस्लर यांचे नाव मानाने घेतले जाऊ लागले. पुढे काही काळ प्रादेशिक आर्थिक मंदीमुळे त्यांचे काम कमी होऊ लागले, तसे त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेत काम करत, महत्त्वपूर्ण भूमिका बजावली उदा., पालो अल्टो फोन डिरेक्टरीचे अद्ययावती करण्यात टेल्सर यांच्या प्रोग्रामिंगने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. व्हिएटनाम  युद्धविरोधी चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. वक्तृत्व स्वातंत्र्य अधोरेखित करत चळवळीचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. आयबीएम कंपनीची संगणकातील एकाधिकारशाही संपवण्याबाबतीतही त्यांनी बरेच प्रयत्न हाती घेतले. प्रत्येकाला संगणक वापरायला मिळावा ही त्यांची भूमिका होती.

पुढे त्यांनी झेरॉक्स पीएआरसी [Xerox Palo Alto Research Center (PARC)] या कंपनीमध्ये पर्सनल कम्प्युटिंग या विषयावरील प्रयोगशाळेत काम करताना वर्ड प्रोसेसर प्रोग्राम म्हणजे आज्ञावलीमध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस यावर काम करण्यास सुरुवात केली. झेरॉक्स कंपनीच्या पहिल्यावहिल्या पर्सनल कम्प्युटरसाठी जिप्सी हा वर्ड प्रोसेसर तयार केला. आपले उत्पादन हे इतरांपेक्षा वेगळे आणि वापरण्यास अत्यंत सोपे असले पाहिजे, तसेच सध्याच्या वापरातील त्रुटी आपल्या उत्पादनातून पूर्णपणे नष्ट कराव्यात, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी कॉपी-पेस्टची अत्यंत महत्त्वाची सुविधा विकसित केली. हा शोध एवढा महत्त्वपूर्ण व कळीचा होता, की आज जवळपास चाळीस वर्षानंतरदेखील कॉपी-पेस्टचा समावेश नसलेला एकही वर्ड प्रोसेसर बाजारात नाही.

पुढे मग टेस्लर यांनी झेरॉक्स कंपनीला रामराम ठोकला आणि ते ॲपल कंपनीत दाखल झाले. जे हवे असेल तेच पडद्यावर असेल, या उद्देशाने ते प्रोग्राम विकसित करत होते. १९८३ मध्ये कम्प्युटर ग्राफिकल इंटरफेस आणि माऊस असणारा संगणक त्यांनी जगासमोर आणला. एखादा मजकूर टंकलिखित करीत असताना काही शब्द वारंवार उपयोगात असतात, अशा शब्दांकरिता कॉपी-पेस्ट या संकल्पनेचे आणि चुका सुधारण्यासाठी म्हणून अनडू (Undo) या संकल्पनेचे जनक म्हणजे टेस्लर होय.

टेस्लर १९९० सालापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळून ॲपल कंपनीचा एक अविभाज्य भाग बनले.१९९० मध्ये ॲपल कंपनीचे उपाध्यक्ष ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. डिजिटल पर्सनल असिस्टंट असलेल्या टॅबलेट पीसी यामध्ये त्यांचे काम हे अत्यंत वाखाणण्याजोगे होते. त्याशिवाय ‘Apple Lisa’ आणि ‘Apple Newton’ यांची निर्मिती तसेच ‘Object Pascal’ ही भाषा विकसित करून ‘Mac App’ हे प्रसिद्ध उत्पादन तयार करण्यात त्यांचे भरीव योगदान होते.

ते २००१ साली ॲमेझॉन या विख्यात ऑनलाईन शॉपिंग कंपनीत, उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झाले. तिथे २००४ पर्यंत त्यांनी ॲमेझॉनच्या संकेतस्थळावरील युजर इंटरफेसची जबाबदारी प्रभावीपणे पेलली. ते संकेतस्थळ सर्वसामान्यांना आकर्षित करणारे असे ठरले असून त्याचे बऱ्याच अंशी श्रेय टेस्लर यांना जाते.

एक सफल संगणकशास्त्रज्ञ म्हणून त्यांचे नाव कायम स्मरणात राहील.

त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचे वय ७४ वर्षे होते.

संदर्भ :

  • “Lawrence Tesler, Pioneer of Personal Computing, Dies at 74”.The New York Times. Retrieved February 20, 2020.
  • Al Kossow, “Oral History of Lawrence G. “Larry” Tesler”, Computer History Museum, 2013, Reference number: X6762.2013

समीक्षक :  विवेक पाटकर