अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट (ए.पी.आय.) : ( स्थापना २० मार्च १९१९, न्यूयॉर्क )
ए.पी.आय. ही तेल आणि नैसर्गिक वायू व्यवसायाशी निगडीत असलेली अमेरिकन संघटना आहे. पेट्रोलियम उद्योगात कार्यरत असलेल्या उत्पादन, तेल शुद्धिकरण आणि विपणन करणार्या सुमारे ६५० कॉर्पोरेट कंपन्यांची ही संघटना प्रतिनिधित्व करते. या संघटनेचे मुख्यालय १९६९सालापासून वॉशिंग्टन येथे आहे. संस्थेच्या मुख्य उपक्रमात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
१) शासन व्यवस्था, कायदेकानू आणि नियामक घटना यांच्याशी औद्योगिक क्षेत्रासाठी वकिली करणे, वाटाघाटी करणे आणि बाजू मांडणे.
२) आर्थिक विश्लेषण, विषचिकित्सा आणि पर्यावरणीय परिणामाबाबींसंबंधी संशोधन करणे.
३) औद्योगिक परिमाणांची निर्मिती करून तत्संबधी प्रमाणपत्रे देणे, तसेच शैक्षणिक व्याप्ती वाढविणे.
४) पेट्रोलियम उद्योगाशी निगडीत संशोधन प्रकल्प राबविणे.
अमेरिकेतील पेट्रोलियम व्यवसायाचा वास्तविक प्रारंभ १८५९ सालापासून पश्चिम पेन्सिल्विनियातील ड्रेकवेल येथून सुरू झाला होता. १९५९ मध्ये ए.पी.आय.ने एक परिषद आयोजित करून खनिजजन्य पदार्थाच्या ज्वलनाने हवेचे प्रदूषण होते आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो, याचा इशारा दिला होता.
ए.पी.आय. चे मानक विभाग भिन्नभिन्न उपसमित्यात विभागलेले आहेत. तेलक्षेत्रात लागणारी आयुधे आणि वापरत असलेले पदार्थ, तेल शुध्दीकरणासाठी लागणारी साधने, पाइपलाइनसाठी प्रमाणबध्द उपकरणे, आग व सुरक्षितता, पेट्रोलियम पदार्थांचे मोजमाप इत्यादीसंबधी प्रमाणे तयार करण्यास ही संघटना कटिबध्द असते. ए.पी.आय ग्राव्हीटी, ए.पी.आय. नंबर, ए.पी.आय.एकक अशी पेट्रोलियम व्यवसायाशी निगडीत पारिभाषिक नामकरणे प्रचलित आहेत.
समीक्षक : हेमचंद्र प्रधान