भारतीय वनस्पती विज्ञान सर्वेक्षण संस्था : ( स्थापना – १३ फेब्रुवारी १८९० )
अगदी पुरातन काळापासून भारतातील वनस्पती संसाधनांनी संपूर्ण जगाच्या लोकांना आकर्षित केले आहे. सर्व प्रथम इजिप्तने भारताबरोबर वनस्पती व्यापार सुरू केला. त्यानंतर अरब, तुर्की, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि शेवटी इंग्रज लोकांनी व्यवसाय सुरू केला. इंग्रजांनी व्यापारासाठी इस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली व १७८७ साली सिबपूर (कोलकाता) येथे त्यांना हव्या असणाऱ्या वनस्पती मिळवण्यासाठी पहिले वनस्पती उद्यान उभारले.
भारतीय वनस्पती विज्ञान सर्वेक्षण संस्था हिची स्थापना कोलकाता येथे केली. ही संस्था भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि ऋतुमान बदल या मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते. या मुख्यालयाच्या अधिपत्याअंतर्गत रॉयल इंडियन बोटेनिक गार्डन याची स्थापना हावडा येथे झाली. हल्ली त्याचे नाव आचार्य जगदीशचन्द्र बोस इंडियन बोटनिक गार्डन असे आहे. या उद्यानाचा विस्तार ११० हेक्टर जमिनीवर असून येथे १४,००० वनस्पतींची संपदा येथे आहे. रॉबर्ट कीड हे या उद्यानाचे पहिले अधीक्षक होते.
या मुख्यालयात गार्डनव्यतिरिक्त वनस्पती संरक्षण, संशोधन, वनस्पती जतन व संवर्धन तसेच वनस्पती संपत्तीचा अभ्यास या गोष्टी होतात. भारतातील धोक्यात असलेल्या वनस्पतींच्या जाती गोळा करून त्यांचे जर्म प्लाझमा आणि जनुक बँक प्रस्थापित करणे, नष्ट होणाऱ्या संभाव्य वनस्पतींवर लक्ष ठेवणे अशीही कामे येथे होतात.
या मुख्यालयात फ्लोरा सेल, अबीजी वनस्पती विभाग, बीजाणूशास्त्र विभाग, पारिस्थितीकी विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग, प्रकाशन विभाग आहेत.
सेंट्रल नेशनल हर्बेरियममध्ये जवळजवळ २५ लक्ष वनस्पतींचे शुष्क नमुने जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्याचा उपयोग भारतातील आणि परदेशातील व्यक्तींना संशोधनासाठी होतो.
भारतीय वनस्पती विज्ञान सर्वेक्षण या संस्थेच्या अधिपत्याखाली भारतात विविध ठिकाणी अकरा विभाग आहेत. त्या प्रत्येक विभागात असलेल्या वनस्पतींवर संशोधनाचे आणि त्यांच्या जतनाचे काम करतात. विभाग स्थापन करताना संपूर्ण भारताचे योग्य प्रतिनिधीत्त्व व्हावे याची काळजी घेतली जाते.
ते अकरा विभाग व त्यांची मुख्यालये अशी आहेत: १) दक्षिण विभाग, कोइम्बतूर; २) उत्तर विभाग, डेहराडून; ३) पूर्व विभाग शिलॉंग; ४) पश्चिम विभाग, पुणे; ५) मध्य विभाग, अलाहाबाद; ६) शुष्क विभाग, जोधपूर; ७) अंदमान-निकोबार विभाग, पोर्ट ब्लेअर; ८) अरुणाचल विभाग, इटानगर; ९) सिक्कीम-हिमालय विभाग, गंगटोक; १०) बोटॅनिकल गार्डन ऑफ इंडियन रिपब्लिक, नोएडा, उत्तर प्रदेश येथे आणि ११) डेक्कन विभाग, हैदराबाद.
भारतीय वनस्पती विज्ञान सर्वेक्षण संस्थेने फ्लोरा ऑफ इंडिया हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प या अकरा विभागातील माहितीवरून संकलीत केला जातो.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, भारत सरकारने वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. जानकी अंमल यांना परदेशाहून बोलावून घेतले आणि या संस्थेची पुनर्रचना करण्याची विनंती केली. त्यांच्या सूचनेनुसार संस्थेत सुधारणा झाल्या. या संस्थेचे कार्य खालीलप्रमाणे चालते.
- शोधमोहीमा काढून भारतातील वनस्पतींची सूची तयार करून त्यांचे वर्गीकरण सामान्यपणे मिळणाऱ्या वनस्पती, सुरक्षित वनस्पती, दुर्मिळ वनस्पती, नाजूक परिसंस्था असे करणे आणि त्यांचे प्रकाशन करणे.
- नष्टप्राय होत चाललेल्या वनस्पतींची वेगळी सूची बनवून त्या मिळण्याच्या जागांची यादी बनवणे. अशा वनस्पतींचे उद्यान बनवून त्यांची उपलब्धता वाढवणे.
- भारतीय वनस्पतीवरील पारंपारिक ज्ञानाचे सर्वेक्षण आणि सूची बनवणे.
- भारतातील वनस्पतींची संगणकीय यादी ( डेटा बेस) बनवणे, त्यात वनस्पतींचे शुष्क नमुने (हर्बेरीयम), जिवंत नमुने, वनस्पतींची चित्रे जमवणे.
- महत्त्वाच्या वनस्पतींवर संशोधनात्मक लिखाण करणे.
- अन्न देणाऱ्या पारंपारिक वनस्पतींचा शोध घेणे व त्यांचा अभ्यास करणे.
- वनस्पतींच्या वर्गीकरणाचा (प्लांट टेक्सोनॉमी) व्याप्ती वाढवणे.
- एखाद्या जागेच्या पर्यावरणीय परिणामाचा अभ्यास करणे.
- वनस्पती उद्याने आणि शुष्क वनस्पतींची संग्रहालये तयार करणे व त्यांचे जतन करणे.
- भारतातील वनस्पतींच्या बिया, परागकण आणि अपुष्प वनस्पतीतील बीजकण गोळा करून त्या कुठे मिळतात याचा नकाशा तयार करणे
या संस्थेत विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात. संस्थेने आजवर बरीच पुस्तके व सूचीग्रंथ प्रकाशित केलेली आहेत.
संदर्भ :
समीक्षक : चंद्रकांत लट्टू