नौटंकी :  भारतातील प्रसिद्ध लोकनाट्यप्रकार. भारतात उत्तरप्रदेशातच नव्हे तर राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाब या राज्यात हा लोकनाट्य प्रकार लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेशात तो अधिक प्रसिद्ध आहे. भारताच्या उत्तरेकडे नौटंकी या लोकनाट्य कलाप्रकाराला उदंड लोकप्रियता प्राप्त झालेली दिसते. एका आख्यायिके प्रमाणे नौटंकी हे मुलतानच्या सुलतानाच्या मुलीचे नाव होते. तिचे फूलसिंह नावाच्या तरुणावर प्रेम बसले. पण ते प्रेम यशस्वी होऊ शकले नाही. याच असफल प्रेमाची कथा लोकमानसात रुजली आणि ती पुढे नाट्यरुप पावली. यावरून या लोकनाट्यप्रकाराला नौटंकी असे नामाभिधान प्राप्त झाले.अशी एक आख्यायिका प्रचलित आहे.

नवनाट्य या संज्ञेचा अपभ्रंश होऊन नौटंकी शब्द रूढ झाला, असे काही अभ्यासकांचे  म्हणणे आहे. असे ही म्हटले जाते की मूळ संगीत प्रधान असलेल्या या प्रकाराला नौटंकी हे नाव सन १९१० च्या आसपास प्राप्त झाले ते उत्तरप्रदेशातील कानपूर मध्ये. याचे श्रेय नक्कारा वादक मैकू उस्ताद यांना दिले जाते. मैकू उस्ताद यांनी या खेळा दरम्यान मध्ये नक्कारा ठेऊन चहूबाजू ने झिल ठेवली ज्याची संख्या १२ होती. सादरीकरणाच्या वेळी त्या झिलवर लाकडी वाजवायच्या काठीने ताल देत शेवटी नक्कारावर टंकार देत असे, ही एक नवीन टंकार होती. म्हणून या लोकनाट्याचे नाव नवटंकार वरून नौटंकी असे नाव पडले. भाट, चारण या नावाने ओळखली जाणारी लोकगायकांची एक जमात आहे. यापैकी चारणांच्या गीतकाव्यातून निर्माण झालेल्या गीतनाट्यांत ऐतिहासिक युद्धकथा, गरीब आणि असहाय लोकांना मदत करणारे दरोडेखोर किंवा लोकमानसात घर करून राहीलेल्या अलौकिक प्रेमकथा, नाट्यपूर्ण रीतीने म्हटल्या जाणार्‍या कथागीतांतून नौटंकीचे रूप सिद्ध झाले असेही म्हटले जाते. प्राचीन काळापासून निरनिराळी सोंगे घेऊन लोकरंजन करणारा एक ‘स्वाँग’ नावाचा लोकधर्मी नाट्यप्रकार प्रचलित होता ; त्यातून नौटंकी या प्रयोगरूप कलाप्रकाराचा जन्म झाला असे अभ्यासक मानतात. एखाद्या कलाप्रकाराचे मूळ शोधणे, ही तशी अवघड गोष्ट आहे. अनेक लोकरंजन पर कलाप्रकारांची निर्मिती निम्न स्तरातील भटके करीत असतात असे सकृत् दर्शनी दिसतेच त्यामुळे चारणांच्या लोककथा गायनातून नौटंकी या लोकनाट्यप्रकाराचा जन्म झालेला असावा,असे अनुमान केले जाते.

नवरंग उधळणारी आणि नखरा करणारी तरूण स्त्री म्हणजे नौटंकी हा अर्थ लक्षात घेतला असता. नौटंकी या लोकनाट्यप्रकाराचे स्वरूप लक्षात येते. नौटंकी सादर करणार्‍यांच्या हाथरस आणि कानपुरी अशा दोन परंपरा असून हाथरस शैलीचा प्रर्वतक नत्थुराम शर्मा आणि कानपुरी शैलीचा प्रवर्तक श्रीकृष्ण पहेलवान होता, असे म्हटले जाते. हाथरस शैली मध्ये अनेक छंद आणि रागदारी संगीताचा वापर केलेला असतो तर कानपूरी शैलीतील नौटंकी मध्ये सोंगाला अधिक प्राधान्य असते. मथुरेची भगत परंपरा हाथरस मध्ये स्वांग झाली आणि कानपूर मध्ये याच स्वांगाला नौटंकी म्हटल्या गेले. भगत परंपरेचे विषय मुख्यत: भक्तीपरक होती, ब्रज क्षेत्राचे हे लोकनाट्यरूप ख्याल लावणीच्या वैविध्यतेने भरपूर भक्तीपरक न रहाता श्रृंगारीक झाले. या अंतर्गत अनेक प्रेमकथांना खास रंग देऊन प्रस्तुत करण्याची पद्धत सुरू झाली. हेच कारण असावे म्हणून हाथरसच्या स्वांग मंडळ्या उत्तरप्रदेशाच्या कानपूर शहरात सर्वाधिक लोकप्रिय झाल्या. हे शहर भोजपूरी क्षेत्रातील मिल-मजूरांचे होते ते जेव्हा स्वांगच्या रंगमंचावर श्रृंगारीक कथा प्रस्तुत होतांना बघायचे तेव्हा ते आपले भान हरवून बसायचे. चिरंजीलाल छीपी आणि नत्थाराम गौडची स्वांग मंडळी कानपूर मध्ये लोकप्रिय होती. या मंडळाच्या व्यावसायिक प्रगतीमुळे अनेक स्वांग मंडळाचा जन्म झाला. कानपूर चे श्रीकृष्ण मेहरोत्राची श्रीकृष्ण संगीत मंडळ ची प्रेरणा वरील मंडळच होते या प्रकारे हाथरसचे स्वांग कानपूरमध्ये नक्काराच्या अभिनव प्रयोगासोबत नौटंकी झाला आणि यांनी आपली शैली हाथरस शैलीच्या प्रतियोगीतेत अनेक नवीन प्रयोग केले.

हाथरस शैली नौटंकी

कानपूर शैलीची नौटंकीची स्पर्धा हाथरस शैली सोबत होती. त्यांची दृष्टी पारसी थियेटरच्या व्यावसायिक प्रगती वर होती. त्यांनी देखील पारसी थियेटर प्रमाणे नेपथ्य सज्जा आणि अन्य देखावे करण्याचा प्रयत्न केला याच कारणाने कानपूर शैलीच्या नौटंकीमध्ये अतीनाटकीयपणा आला जो पारसी थियेटरचे चरित्र होते. नौटंकीच्या रंगमंचावर पारसी थियेटरच्या अनेक लोकप्रिय कथा सादर झाल्या. नगारा, ढोलक, तुणतुण्यासारखे वाद्य, सारंगी आणि हार्मोनिअ‍म ही नौटंकीची प्रमुख वाद्ये असून या वाद्यसंगीताच्या गजरात नौटंकीच्या प्रयोगाची सुरुवात होते. गणपती, श्रीकृष्ण, शिव या देवतांना आणि गुरूला वंदन करणारी नमन गीते सुरूवातीला म्हटली जातात. या नमनगीतांत काही उर्दू छंद व रागदारीचा उपयोग केलेला असतो नंतर रंगाहे पात्र रंगभूमीवर येते. रंगाहा नौटंकीचा सुत्रधार असतो.  नौटंकीच्या पूर्ण प्रयोगावर त्याचे नियंत्रण असते. पार्श्वगायन करणे, कथासुत्राची सुरुवात करणे. नाट्यप्रयोगाचे स्वरुप विशद करणे प्रयोगातील विविध प्रसंगाचे सांधे जोड करून जुळवा जुळव करणे अशा प्रकारच्या सर्व जबाबदार्‍या रंगा मोठ्या कौशल्याने पार पाडत असतो. ध्रुवपदांची आवर्तने, पद्यात्मक, संगीतमय संवाद, मोहक नृत्य यातून नौटंकीची कथा विकसित होत असते. हे नृत्य महाराष्ट्रातील तमाशाच्या लावणीनृत्याची आठवण करुन देणारे असते. पूर्वी स्त्रियांच्या भुमिकाही पुरूषच करीत असत.पण आता स्त्रियांच्या भूमिका स्त्रियाच करीत असतात. भारती, सात्वती, आरभाटी या अभिनयवृत्तीचा मुक्ताविष्कार नौटंकीमध्ये केला जातो. मखौलिया हे नौटंकीतील आणखी एक वैशिष्ट्पूर्ण पात्र तमाशातील सोंगाड्याचे अनेक विशेष या पात्रात दिसतात. मुख्यत: विनोदनिर्मिती करुन कथेला आणि एकूणच कथेला मुक्त रुप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मखौलिया करीत असतो. समोर बसलेल्या एखाद्या मान्यवर व्यक्तीची खिल्ली उडविणे, अवतीभवती घडणार्‍या घटनांबद्दल उपहास प्रचुर भाष्य करणे आणि त्यातून विनोद निर्मिती साधणे हे काम मखौलिया करीत असतो.

कानपूर शैली नौटंकी

नौटंकीचे पारंपरिक अधिष्ठान धार्मिक होते असे सांगतात, पण आजच्या नौटंकीच्या प्रयोगात धार्मिक अधिष्ठानाच्या कोणत्याही खाणाखुणा आढळत नाहीत. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक विषयांवर बेतलेल्या कथा नौटंकीत सादर केल्या जातात. मयुरध्वज, ध्रुवबाळ, राजा हरिश्चंद्र, श्रवणकुमार इत्यादी विषयावरील पुराणकथा सादर केल्या जात असल्या तरी हिर-रांझा, लैला-मजनू, शहजादी नौटंकी, पद्मावती या प्रकारच्या श्रृंगारिक कथा अधिक लोकप्रिय असलेल्या दिसतात. पण बदलत्या काळानुसार कलावंतानी कथेचे विषय बदललेले दिसतात. आझादी का राज, टिपू सुलतान, सुभाषचंद्र बोस, जालियानवाला बाग, गरीबी का खुदा,  या प्रमाणेच नागन, सनातन, संसार, मदर इंडीया, अनारकली, दिल की प्यास या सारख्या चित्रपटांवर आधारलेल्या कथाही नौटंकीत सादर केल्या जातात. अमरसिंह राठोड, आग्र्याची चढाई, सुलतान डाकू अशा वीर रस प्रधान कथांची निवड करून त्या अधून-मधून नौटंकीत प्रयोगरूपाने सादर केल्या जातात.

नौटंकीचा रंगमंच साधा असतो. देवळाच्या समोरचे आंगण किंवा सार्वजनिक ठिकाणची मोकळी जागा निवडून उघड्या पटांगणावर बिछाईत घालून प्रयोग केल्या जातो. कधी कधी पंधरा ते वीस फुट लांबी-रूंदी असणार्‍या लाकडी तक्त पोशीवर नौटंकीचा प्रयोग होत असतो. रंगमंचाच्या चारही बाजू उघड्या असल्याने रंगमंचाच्या चारही बाजूने प्रेक्षक बसलेले असतात. त्यामुळे नौटंकीतील कलावंतांना चौफेर नृत्य करावे लागते. संवादाच्या वेळी सतत हालते रहावे लागते. पूर्वी हिलालच्या ऊजेडात नौटंकीचा प्रयोग केला जाई. आज मात्र विजेच्या दिव्यांचा प्रकाशासाठी वापर केला जातो. ध्वनिक्षेपकाचा वापरही आता सर्वत्र केला जातो. नौटंकी मंडळी एका गावाहून दुसर्‍या गावी खेळ करण्यासाठी सतत भटकत असतात. पूर्वी बैलगाडीतून घोड्याच्या छकड्यातून नौटंकी मंडळी एका गावातून दुसर्‍या गावी जात असत. पण आता त्यात बदल झाला असून स्वत:ची वाहन व्यवस्था त्यांनी केलेली आहे. एकाच वेळी पन्नास साठ माणसांचा ताफा घेऊन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नौटंकी मंडळी प्रवास करतात.

श्रृंगार प्रधान कथानक, उत्तान श्रृंगाराचा मुक्त आविष्कार यामुळे नौटंकी कडे बघण्याचा अभिजनांचा दृष्टीकोण दूषित असलेला दिसतो. अनेकांनी नौटंकीवर टिकाही केलेली आहे. १९६१ मध्ये नौटंकीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही झाली. तेव्हा तत्कालीन सरकारने लोककला महोत्सवाचे आयोजन केले आणि नौटंकीतील दोष काढून टाकावे असा ठरावही करण्यात आला. या सार्‍या नौटंकीच्या संदर्भात घडलेल्या गोष्टी ध्यानात घेता महाराष्ट्रातील तमाशाला ज्या कठीण परिस्थितीतून जावे लागले, तीच स्थिती नौटंकीची होती असे म्हणता येईल. तमाशा आणि नौटंकी या कलाप्रकारात किती साधर्म्य आहे, ही गोष्ट उपरोक्त घटनेवरून ध्यानात येईल. तमाशा प्रमाणेच अनेक दिव्ये पार करीत, संकटाचा मुकाबला करीत नौटंकीला आपले अस्तित्त्व अबाधित ठेवावे लागले आहे. गुलाबबाईनी नौटंकीला राष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.

संदर्भ :  हितैषी, नंदल, लोकनाट्य नौटंकी, एक विवेचन, राका प्रकाशन, अलाहाबाद, २०१८.