जामकर, अरुण व्यंकटेश : ( २ जून, १९५२ –    ) अरुण व्यंकटेश जामकर यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जम गावाचा आहे. त्यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातून १९७३ साली एम. बी. बी. एस. केले नंतर शल्यक्रियाशास्त्रात १९७७ साली तेथूनच एम.एस.केले. १९८७ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच्.डी. केले. त्याशिवाय त्यांनी २००६ साली एफ. ए. आय. एम. इ. आर, २००९ सालात एफ. एम. ए. एस. आणि २०१० साली एफ. ए. आय. जी. इ. एस. या वैद्यकिय क्षेत्रातील पदव्या मिळवल्या.

शिक्षणानंतर त्यांनी शल्यचिकित्सा विभाग प्रमुख व नंतर अधिष्ठाता म्हणून काम केले. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी पाच वर्षे पदभार सांभाळला. तसेच नाशिकच्याच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी नऊ महिने कार्यभार सांभाळला.

अरुण जामकर यांनी पीएच्.डी. साठी केलेल्या संशोधनातून असे सिद्ध केले की, कुठल्याही पेशी जर अतिथंड केल्या तर त्यांची क्षमता शिल्लक राहते. यावरच सर्व नवीन प्रजननशास्त्र अवलंबून आहे. जामकर यांनी कर्करोग पेशीवर संवेदीत डुकराच्या पांढऱ्या पेशीवर काम केले. त्यांनी मॅक्सिला (Maxill) च्या कर्करोगावर काम केले. त्यावर पुढे इतरांनी संशोधन करून आजच्या ‘Mono-clonal antibody’ ह्या उपचार प्रकाराचा जन्म झाला.

त्यांच्या संशोधक गटाने जॉन हॉफकिन्स हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली एच. आय. व्ही. ग्रस्त गरोदर स्त्रीच्या नवजात बालकांवर एच. आय. व्ही. चे संक्रमण होऊ नये यासाठी संशोधन केले व त्यावर आधारीत उपचार योजना जागतिक आरोग्य संघटनेने (W.H.O.) मार्गदर्शक तत्त्वे म्हणून स्वीकारल्या.

दुर्बिण शस्त्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांनी नव-नवीन शस्त्रक्रिया शोधून काढून ह्या शस्त्रक्रियेची व्याप्ती वाढविली. नवीन उपकरणे तयार करून त्यावर त्यांनी सहा एकस्वे मिळविली.

वैद्यकिय शिक्षण व वैद्यकिय विद्यार्थ्यांना नीतीशिक्षण वाढावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वैद्यकीय अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करून हा अभ्यासक्रम युनेस्कोच्या बायोइथिक्स अध्यापनामार्फत संपूर्ण भारतात राबवला आहे. त्यामुळे नवीन डॉक्टर्स नीतीमान होण्यासाठी मदत होईल.

मूत्रपिंडाच्या अवयवरोपणामध्ये त्यांनी कामगिरी केली. इंग्लंडमधील फ्रीमन हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेऊन ससून रुग्णालय, पुणे येथे शासकीय सेवेतील पहिली शस्त्रक्रिया केली व ही शाखा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांनी आजवर एकूण पाच पुस्तके लिहिली आहेत. संशोधानपर ४९ निबंध प्रसिद्ध केले. १० संशोधन प्रकल्पावर काम केले. पीएच्.डी. च्या पाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यांना आजवर मिळालेल्या पुरस्कारात रोटरी क्लब, पुणे यांचे सेंट्रल व्होकेशनल ॲवॉर्ड, शिक्षणामधील भरीव कामगिरीबद्दल जागतिक शिक्षण कॉंग्रेसतर्फे पुरस्कार, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे असाधारण डॉक्टर ॲवॉर्ड, इ. टी. नाऊ नॅशनल एज्युकेशन लीडरशीप ॲवॉर्ड, लोकमत नॅशनल एज्युकेशन लीडरशीप ॲवॉर्ड, जीवन गौरव ॲवॉर्ड महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, डॉक्टर रत्न अवार्ड-किराड फौंडेशन आणि गौरव पुरस्कार – उत्तर भारतीय संघ असे आहेत.

संदर्भ :

समीक्षक : राजेंद्र आगरकर