छत्तीसगढचे लोकसाहित्य : छत्तीसगढ हे नवे राज्य आहे. या राज्याची लोकसंस्कृती मात्र अतिप्राचीन आहे. या राज्याची भाषा छत्तीसगढी आहे. माधुर्य आणि सरळपणासाठी ही भाषा जगात प्रसिद्ध आहे. अर्धमागधीच्या अपभ्रंशातून विकसित झालेली पूर्वीची हिंदीची एक समृद्ध बोली म्हणून छत्तीसगढी प्रसिद्ध आहे. आज एक स्वतंत्र भाषा म्हणून छत्तीसगढी प्रतिष्ठित झाली आहे. या भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे. मानवी संस्कृतीच्या इतिहासातील भाषा हा सर्वात मोठा शोध आहे. यापूर्वी मानव संकेतांच्या साहाय्याने आपले अनुभव व्यक्त करीत होता. मनुष्य ज्याचा अनुभव घेतो ते व्यक्त देखील करीत असतो. मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून मानवाने आपल्या अनुभवांच्या संवादासाठी भाषेचा आविष्कार केला. हीच भाषा उत्तरोत्तर मानवाच्या प्रगतीचे माध्यम झाली. भाषा ही दळणवळणाचे आदिम साधन आहे. आपल्या आदिम अवस्थेपासून थेट आताच्या इलेक्ट्रॉनिक युगापर्यंत प्रवास करताना मनुष्य मात्राने आपल्या भाषा संचाराला अधिक समृद्ध केले आहे. पूर्वी साहित्य दोन रूपात विभागले गेले होते. १) अलिखित साहित्य ज्याला आपण लोकसाहित्य म्हणू , २) शिष्ट साहित्य किंवा प्रमाण साहित्य ज्याचे स्वरूप लिखित असते. आता तिसरे रूप ही आपल्या समोर आले आहे ज्याला इलेक्ट्रॉनिक रूप म्हणता येईल.

कोणत्याही प्रदेशातील लोकसाहित्य मौखिक परंपरेच्या माध्यमातून आजही सुरक्षित आहे. वेळ येताच लोकांच्या कंठातून एखाद्या निरझरासारखे हे साहित्य व्यक्त होत आहे. लोकसाहित्य लोकांची मौखिक अभिव्यक्ती आहे. वाणीच्या माध्यमातून हे लोकसाहित्य एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सतत प्रवाही राहते. मौखिक साहित्य हे कोणा एका व्यक्तीची अभिव्यक्ती नसते तर ती समूहाची अभिव्यक्ती असते. ही अभिव्यक्ती प्राचीन काळापासून चालत आली आहे. लोकसाहित्याची अभिव्यक्ती सामूहिक असते. व्यक्तीरहित, समाजाच्या आत्म्याचे समानरूपाने अभिव्यक्त होणे ही बाब लोकसाहित्यात येते. जे मौखिक परंपरेत आहे ते लोकसाहित्य होय आणि जे लोकसाहित्य आहे ते मुख्यतः मौखिक आहे. मौखिक शब्दाची फोड करताना जय प्रकाश जी लिहतात, मौखिक परंपरेचा इतिहास मानवी संस्कृतीच्या इतिहासा इतका प्राचीन आहे. जेव्हा मानवजात लिहीत नव्हती तेव्हा तिच्या अभिव्यक्तीचे एकमेव माध्यम मौखिक परंपरा होती. लेखनाच्या अविष्कारासोबत लिखित शब्दांची परंपरा निर्माण झाली. भाषिक ध्वनीचे रूपांतर अक्षर संस्कृतीत झाले. कालांतराने मुद्रण कलेच्या विकासासोबत अक्षर संस्कृतीचा वेगाने प्रसार झाला. अक्षर संस्कृती मुद्रित पुस्तक ज्ञानाच्या संग्रह आणि संचाराचे माध्यम झाली. जनलोकांमध्ये आजही त्यांचे ज्ञान, त्यांचे साहित्य आणि संस्कृती यांचे दर्शन मौखिक परंपरेच्या माध्यमातून जिवंत राहिले आहे.

छत्तीसगढ हे लोकसाहित्याचे भांडार आहे. छत्तीसगढी लोकगीत, लोककथा, लोकगाथा, लोकनाट्य, वाक‌प्रचार आणि प्रहेलिका आजही प्रत्येकाच्या मुखी आहेत. हे सर्व एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे मौखिक स्वरूपात संक्रांत होत असून लोकमानसाला आनंदाचा साक्षात्कार घडवीत आहे. मौखिक परंपरेच्या शृंखलेत प्रथम छत्तीसगढ च्या लोकगीत परंपरेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. लोकजीवनात लोकगीतांचा एकछत्री अंमल आपणास दिसतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व जीवन अवस्थांमध्ये आपणास लोकगीतांचे दर्शन घडते. लोकगीतांच्या उत्पत्ती संबंधी देवेंद्र सत्यार्थी यांचे मौलिक विचार असे आहेत – ” लोकगीत कुठून येते ? स्मृती – विस्मृतीच्या नजरबंदीच्या खेळातून, काही वेळा अट्टहासातून काही वेळा उदासीतून,जीवनाच्या शेतात ही लोकगीते उगवतात. या लोकगीतांच्या निर्मितीत कल्पना आपले काम करते. रागवृत्ती, भावना इतकेच काय नृत्य देखील आपले काम करते.

छत्तीसगढ मधील लोकगीतांचे वर्णन खालीलप्रमाणे करता येते .

१) संस्कार गीते – जन्माच्या वेळची लोकगीते, विवाह गीते, मृत्यू संस्कार गीते.

२) पर्व, उत्सव ( धार्मिक गीते ) भोजली गीते, माता सेवा, छेडछाड गीते, फाग गीते.

३) ऋतू गीते – बरखा गीते, बारहमासी गीते.

४) श्रमगीते – मनोरंजन गीते – ददरिया, करमा नचौडी गीते.

५) खेळगीते – अट्कन – मटकन, कबड्डी, खो खो, फुगडी, घोर – घोर रानी, कहा जाबे डोकरी.

६) अन्य गीते – लोकभजन, पंथी, देवार, बसदेवा गीते.

संस्कार गीते – संस्कार हे मानवी जीवनाचे मोठे लोकसंचित आहे. संस्कारानेच जीवनात साधनशुचिता येते. भारतीय लोकजीवनात १६ संस्कारांचे वर्णन येते. छत्तीसगढी लोकजीवनात मुख्यतः तीन संस्कार येतात. पहिला जन्म संस्कार, दुसरा विवाह संस्कार आणि तिसरा मृत्यू संस्कार होय. या संस्कारांच्या वेळी छत्तीसगढ मध्ये लोकगीते गाण्याची समृद्ध परंपरा आहे. ही लोकगीते म्हणजे मौखिक अभिव्यक्ती आहे.

सोहर गीते : नवजात बालक, बालिकेच्या जन्माच्या उल्हासात, आनंदात सोहर गीते गायिली जातात. सोहर गीतांमध्ये साधरणतः रामकृष्णा संबंधी गीते गायिली जातात.

काखर भये सिरीशमे

काखर भये लछमन हो ।

ललना काखर भरत भुवाले

सोहर पद गाव व हो ।

विवाह गीत : भारतीय संस्कृतीत विवाह हा एक प्रमुख संस्कार आहे. विवाहाच्या माध्यमातून दोन अनोळखी स्त्री – पुरुष एका पवित्र बंधनात बांधले जातात आणि दोन आत्म्यांचे मीलन होते.

बिहाव गीत : छत्तीसगढ मध्ये विवाह प्रसंगी जी गीते गायिली जातात त्यांना बिहावं गीत म्हटले जाते. गडवा बाजा अर्थात रणसिंग, दफडा, टिमकी, मोहरी आणि मंजिरा – झुमका ही लोकवाद्ये ही बिहाव गीत गाताना वाजविली जातात. विवाह गीतांचे मंगल स्वर वातावरण अधिक आनंदित, मंगलमय करतात. छत्तीसगढी विवाहात मंगनी, चुलमारी, मडवा, देवतेला, तेलचघ्घी, हरदाही, चिकट, लाल भाजी, कुंवर कलेवा, टिकावन, भोवर, बिदा आदी रीतिरिवाज असतात. या प्रत्येक रीती रिवाजात वेगवेगळी गीते गायिली जातात. विवाह गीतांमध्ये भडौनी गीतांचे वेगळेच आकर्षण असते. एक भडौनीगीत उदाहरणादाखल असे –

बने – बने तोला जानेव समधी

मडवा म डारे व बास रे ।

जाला – पाला लुगरा लाने

जरगे तोर नाक रे ।

नादिया तीर के पटुवा भाजी

उल्हवा – उल्हवा दिख थे वे

आय हे बारतिया तेमन

बुढवा – बुढवा दिख थे रे ।

मृत्यू संस्कार गीत : मृत्यू  हे जीवनाचे शाश्व्त सत्य आहे. जो जन्माला येतो त्याला मृत्यू अटळ आहे. छत्तीसगढी लोकजीवनात मृत्यू संस्काराच्या वेळी कबीर पंथी समुदायाची गीते गाण्याची परंपरा आहे. आपल्या संतांनी शरीराला नश्वर तसेच आत्म्याला अमर म्हटले आहे. कबीर पंथी समुदायाच्या गीतात शरीराची क्षणभंगुरता तसेच आत्म्याचे अमरत्व हा विचार अधोरेखित करण्यात आला आहे.

बंगला अजब बने रे भाई

बंगला अजब बने रे भाई

ये बंगला के दस दरवाजा

पवन चलावे हंसा ,

हाड जाम के ईटा बनाए

लहू रक्त के लोहा ,

रोवा केंस के छानी बने है ,

हंसा रहे सुख सोंवा ।

पर्व उत्सव ( धार्मिक गीत ) : मानव प्राचीन काळापासून उत्सवप्रिय राहिला आहे. लोकजीवनात पर्व उत्सव आपल्या धार्मिक जीवनाशी जोडलेले असतात. छत्तीसगढ मध्ये अशा पर्व आणि उत्सवांचे आपल्या मौखिक परंपरांचे यथोचित दर्शन होते.

भोजली गीत : छत्तीसगढ मध्ये महिला आणि किशोरवयीन मुलींचे भोजली व्रत प्रसिद्ध आहे. हे व्रत श्रावण महिन्याच्या सप्तमीपासून पोर्णिमेपर्यत सुरु असते. किशोरी एका टोपलीत गव्हाचे दाणे पेरतात त्यावर पाणी शिंपडून प्रतीकरूपाने सृष्टीचे पूजन करतात. यावेळी गायिल्या जाणाऱ्या गीताला भोजलीं गीत असे म्हटले जाते.

देवी गंगा देवी गंगा लहर तुरंगा

हमर भोजली दाई के भीजे आठो अंगा ।

ओ s ओ s  s s  देवी गंगा ।

आ गईस पुरा बोहा गईस मलगी

हमर भोजली दाई के सोने सोन के कलगी

सुवा गीत : छत्तीसगढ च्या लोकगीतांमध्ये सुवागीतांचे विशिष्ट स्थान आहे. सुवा गीत ही स्त्रियांच्या भावभावनांची अभिव्यक्ती आहे.  सुवा गीत म्हणजे पोपटाचे गीत. रंगी बेरंगी वेषातील साज शृंगार केलेल्या महिला टोपलीत मातीचा पोपट ठेवतात आणि पोपटाभोवती  गोलाकार नृत्य करतात. टाळ्या वाजवून गीते गातात त्यावेळचे दृश्य मनमोहक असते.

तरि हरि – नाहना मोर नहा नरि ना ना कदम तरी मोंगरा के झाडे

येदे झाडे रे सुवना, कदम तरी मोगरा के झाडे ।

सबकर बेटी मैहर जाये रे, सुरजा गहन ससुरारे

ससुरारे रे सुवना, कदम तरी मोंगरा के झाडे ।

रांध दाई रांध दाई घिंवहि कलेवना ओ –

सुरजा लेवन बर जहहौ

ये जराहौ रे सुवना, कदम तरी मोंगरा के झाडे ।

गौरागीत : गौरा व्रताच्या वेळी गायिल्या जाणाऱ्या गीतांना गौरा गीत असे म्हणतात.  दिवाळीच्या वेळी गौरा म्हणजे पार्वती आणि इसर अर्थात शंकर यांच्या विवाहाचे व्रत असते. छत्तीसगढमध्ये शंकर – पार्वती विवाहाचे सर्व विधी पार पाडले जातात. शंकर आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्ती  तयार करून त्यावर रंगीबेरंगी चमकदार कागद चिकटवले जातात. फुल कुचरना, करसा परघाना, गडरा जगी, चाऊर चढाना, स्तुति, देवता चढाना, डढैया झुपना, गौरा सुताना, गौरा विसर्जन आदी क्रियांसोबत वेगवेगळी गीते गाण्याची परंपरा छत्तीसगढमध्ये आहे. सींग, दफडा, मोहरी, टिमकी, मंजिरा, झुमका या लोकवाद्यांच्या साथीने ही गीते गायिली जातात त्यातील एक –

गडरा सुतय मोर गडरी सुतय

ओ सुतय ओ सहर के लोग

बाजा सुतय मोर बजानिया सुतय

ओ सुतय गवड्या लोग

बहगा सुतय मोर बैगीन सुतय

ओ सूतय ओ सहर के लोग ।

माता सेवा जस गीत : छत्तीसगढ मातृशक्तीचा पूजक राज्य आहे, त्यामुळे या राज्यात ठायी ठायी मातृशक्तीचा भाव दिसतो. चैत्र महिन्यात राम नवमीच्या सुमारास येथे वासंतिक नवरात्रोत्सव तसे दसऱ्याच्या वेळी शारदीय नवरात्रौत्सव विधियुक्त व्रत म्हणून आयोजित होते. या व्रतात अखंड दीप प्रज्ज्वलित ठेवून ज्वारीचे बीज पेरून प्रकृतीची म्हणजे सृजनशक्तीची उपासना केली जाते. स्थानिक मंदिरे आणि तीर्थ क्षेत्रांमध्ये ज्वारीच्या व्रताची लगबग असते. या वेळी राज्यातील प्रत्येक माणसाच्या मनात मातृवंदनेचा भाव असतो. या व्रतात गायिल्या जाणाऱ्या गीतांना जस गीत म्हटले जाते. नऊ दिवस गीते गाणारी भजन मंडळी सेवक असतात ते देवीची सेवा करतात. त्यात देवीचा महिमा, शृंगार आदी संबंधी भक्ती गीते सादर होतात.

रन – बन , रन – बन हो ….

तुम खेल व दुलखा , रन – बन रन – बन हो ।

कारवर पूत है बाल बरमदेव कारवर पूत गौरे या

कारवर पूत है बन के रकसा रन बन रन बन हो ।

बाम्हन पूत हे बाल बरमदेव , अहिरा पूत गौरे या

धोबीया पूत हे बन के रकसा रनबन रनबन हो ।

ऋतुगीत / बारहमासी : छत्तीसगढच्या लोकगीतांमध्ये विविधता ठायी ठायी दिसते. या अशीही काही लोकगीते आहेत ज्यांच्यात ऋतूची वर्णने आहेत. या लोकगीतात वर्षाच्या बाराही महिन्यातील वैशिष्ट्यांचे चित्रण केलेले आढळते. त्यांनाच बारमाही गीते म्हणून संबोधले जाते. बारहमासी म्हणजे वर्षांच्या बाराही महिन्यात गायिली जाणारी गीते असाही अर्थ निघतो. बारहमासी गीतात फाग, डंडा, जंवारा, सुवा गीतांचा समावेश होतो.

फागुन महाराज फागन महाराज

अब के गाए ले कब अह हो |

कोन महिना हरेली ,कब तिजा रे तिहार ?

कोन महिना दसेरा ,कब उडे रे गुलाल ?

सावन महिना हरेली ,भादो तीजा रे तिहार

कुंवार महिना दसेरा ,फागुन उडे रे गुलाल |

श्रमगीते किंवा मनोरंजक गीते : छत्तीसगढ ही कष्टकरी शेतकऱ्यांची भूमी आहे. त्यामुळे श्रमासोबत गीत – संगीतही जोडले गेले आहे. श्रम परिहारासाठी गायिल्या जाणाऱ्या गीतांना श्रमगीते म्हटले जाते. कष्टकरी शेतकरी शेतात पेरणी, कापणी, निंदणी आदी कृषीकर्मे करताना तसेच जंगलातील तेंदूपत्ता तोडून तो बैलगाडीत भरून आणताना ‘ ददरिया ‘ गीते गातात. शरीराचा कष्टातून येणारा थकवा घालविताना ‘ करमा ‘ गीते गातात सोबत नृत्य ही करतात. ‘ डंडा ‘ गीते आणि नृत्याची परंपरा छत्तीसगढ मध्ये प्रसिद्ध आहे. ही सर्व गीते मौखिक परंपरेच्या माध्यमातून लोकमानसात लोकप्रिय आहेत. ददरिया गीताचे एक उदाहरण –

ले जा लान दे जंबारा, कोदो के मिरचा हो ले जा लान दे

आमा ला टोरे खाहुंच कहिके ले जा लान देबे

बासी ल खाए अढई कौरा, तोला बईढे ला बलाएवं बढई चौरा ।

ले जा लान दे बे ।

खेळगीते : मुले बहुविध खेळ खेळतात. हे खेळ मनोरंजनासोबत शरीराला सदृढ आणि आरोग्यदायी ठेवतात. छत्तीसगढच्या खेळांचे वैशिष्ट्य असे आहे कि, त्यात गीतांचा अंतर्भाव होतो. खुडवा ( कबड्डी ), खो – खो, अट्कन – मटकन, फुगडी, डॉडी – पोहा, घोर – घोर रानी, कहा जाबेडोकरी, आती- पाती आदी खेळांमध्ये मुले गीतांसह खेळ खेळतात .एक खेळगीत असे-

कहा जाबे ओ डोकरी, लाठी धरे एक मोटरी

बडहर मन के खोवा, जलेबी हमर गरीब के ठेठरी

कहा जाथस डोकरी ? महुवा बिने ला हमु ल लेगबे का ?

तोर दाई ला पूछा था । घूस – घूस ले मोटाये, डोकरी कुदे जस चिंगरी मछरीं

अन्य गीते : छत्तीसगढ मध्ये लोकगीतांची मोठी परंपरा आहे. ही गीते विविधरंगी असतात. या लोकगीतांचे तेज इंद्रधनुष्यासारखे शोभायमान असते. अशा गीतांमध्ये देवारगीत, तसदेवा गीत, लोकभजन, पंथी गीत आदींचा समावेश आहे. पंथी गीत आणि नृत्य तर जगप्रसिद्ध आहे. छत्तीसगढ मध्ये महान संत गुरु बाबा घासीदासांची मोठी परंपरा आहे. माणूस – माणूस एक समान हा सतनाम संदेश त्यांनी प्रसारित केला. पंथी नर्तक देवदास बंजारे यांनी पंथी नृत्याचे आपले कौशल्यविश्व् स्तरावर पोहोचविले. गुरु घासीदास यांच्या  चरणी अर्पण केलेले एक पंथी गीत असे –

ये गिरौद जाबो न अपन गुरु के दर्शन पाबो न ।

माता अमरौतीन, पिता माहंगू दास है गिरोंदपुरी म जनम लिए, बाबा घासीदास

राऊत दोहे : छत्तीसगढ मध्ये यादव जातीचे लोक राहतात. त्यांचा प्रमुख व्यवसाय गोपालन आणि गोचारण आहे. दिवाळीच्या सणात यादव जातीचे लोक राऊत नृत्य करतात. राऊत नृत्य हे शौर्याचे प्रतीक आहे. नृत्यासोबत हे लोक दोहे गातात. तुलसी कबीरांच्या दोह्यांसारखे हे दोहे छत्तीसगढ च्या लोकजीवनाशी जोडलेले असतात. राऊत दोह्यांची संख्या हजारांच्या वर आहे. मौखिक परंपरेच्या माध्यमातून दिवाळीच्या सुमारास हे दोहे घरोघरी सर्वांच्या मुखी असतात. राऊत दोह्याचे एक उदाहरण –

वृंदावन के कुंज गालीन में , ऊंचा पेझ खजूर

जा चढ देखे नंद कन्हैया ग्वालिन कतका दूर ।।

अरसी फुले घामाघम ??? मुनगा फुले सफेद

बालकपन में केवरा बदेव , जवानी में होंगे ????

छत्तीसगढच्या लोककथा : छत्तीसगढच्या लोकजीवनात मनोरंजनासाठी लोककथांचे स्थान महत्वाचे आहे. लोककथा ह्या समाजजीवनाला शिक्षण देतात. समाजजीवनाचा मार्ग प्रशस्त करण्याचे काम लोककथा करतात. लोककथांचे श्रवण व्हावे म्हणून अबाल – वृद्ध सतत आतुर असतात. या लोककथांमध्ये धार्मिक कथा, व्रत वैकल्या संबंधी कथा, पशुपक्ष्यांसंबंधी कथांचा समावेश असतो. लोककथा ह्या मौखिक परंपरेचा आनंददायी झरा आहेत. डूडी रक्सीन, सतबंतीन, कोलिहा डथ चल रे तुमा बाटे – बाट, चुरकी – मुरकी अशा शेकडो मनोरंजक आणि बोधप्रद लोककथा मौखिक परंपरेच्या माध्यमातून लोकरंजनाचे कार्य करतात. लोकगाथा कथागीत म्हणून देखील ओळखली जाते. कथागीतात दीर्घ कथा गीताच्या माध्यमातून सादर केली जाते. कृष्ण देव उपाध्याय यांच्या मतानुसार, लोकगाथा ही अशी कथा असते जी गीतांतून सादर केली. सत्येंद्र देखील लोकगाथांमध्ये आणि गेयतेला प्राधान्य देतात. छत्तीसगढमध्ये मौखिक परंपरेत लोकगाथेचा मोठा वारसा आहे. छत्तीसगढची लोकगाथा पांडवांनी जागतिक स्तरावर मानमान्यता आणि प्रसिद्धी प्राप्त केली आहे. पद्मविभूषण तीजनबाई, झाडू राम देवांगन, पूनाराम निषाद, ऋतू वर्मा आदी पंडवानी कलाकरांनी आपल्या गायन प्रतिभेने सर्वांना सम्मोहित केले आहे. भरथरी, दसमतकैना, लोरिक चंदा (चंदौनि) ढोला मारू, गोपी चंदा गुजरी गहिरीन, कुबर रसालू, हीरा – मारा, फुलबासन, अहिमन रानी, राजा वीर सिंह, कल्याणसाय अशा अनेक लोकगाथा जनमानसात लोकप्रिय आहेत. लोकगाथेत गीत – संगीत आणि अभिनय या त्रिवेणीचा प्रवाह अखंड प्रवाहित असतो या लोकगाथांमध्ये लोक आवाहन असतो.

पंडवानीचे एक उदाहरण असे –

लडे के बेरा समझ लेगे ग ।

तै लडे के बरा समझ लेबे ।

तोला जानेव बलवान, लडे के बेरा समझ लेवे

कुंती के मै पुत्र कहावंव, अर्जुन हे मोर नाम ।

युधिष्ठिर के छोटे भाई , करवं तोर ले संग्राम

तोला जाने व बलवान लडे के बेरा समझ लेबे

भरथरी गायनाचे उदाहरण

घोडा रोये घोडसार म घोडसार म ओ

हाथी रोवय हाथीसार म

मोर रानी ये ओ, महलो म रोवय

मोर राजा रोवय दरबार

म दरबारे म भाई ये देजी ।

बोये म सोना जामे नहीं, मोती तुरे न डार ।

बार – बार हीरा तन नई आय, खोजे मिले न उधार ।

छत्तीसगढच्या म्हणी, वाक्प्रचार, प्रहेलिका : म्हणींना छत्तीसगढ मध्ये हाना म्हणून संबोधले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्ती विशेषाच्या उक्तीला लोकस्वीकृती मिळते तेव्हा तिचे रूपांतर म्हणींमध्ये होते. मौखिक परंपरेतील म्हणी म्हणजे जनलोकांच्या अनुभव आणि ज्ञानाचे संचित होय, ठेवा होय. छत्तीसगढमध्ये हाना  भाषेचे सौंदर्य वाढवितो. त्याबरोबर भाषेची प्रभावी सर्जनशीलताही वाढते. एखादी निरक्षर व्यक्ती देखील आपल्या भाषेत हानाचा उपयोग करून जनसामन्यांना प्रभावित करते. छत्तीसगढच्या काही म्हणी –

खीरा चोर चोंधरी चोर, धीरे – धीरे सेंध फोर (सुरवातीला मुलगा गावातील काकडी, मका आदींची चोरी करतो जर त्याच्यावर अंकुश ठेवला नाही तर तो भिंत फोडून चोऱ्यामाऱ्या करू लागेल)

जइसे – जइसे घर दुवार, तइसे – तइसे फइरका । जइसे – जइसे दाई ददा, तइसे – तइसे लडका ।। (जसे ज्याचे घर असते तसेच त्याला दरवाजे लागतात. जसे आई बाप असतात तसाच त्यांचा मुलगा असतो. आई – वडिलांच्या आचरणावर मुले सद्गुणी आहेत कि दुर्गुणी आहेत हे ठरते) .

छत्तीसगढी म्हणी सारखीच प्रहेलिकांची परंपरा ही मुख्यतः मौखिक परंपरा आहे. छत्तीसगढमधील प्रहेलिकाना जनौला असेही म्हटले जाते. या प्रहेलिकांनी बुद्धीला चालना मिळते तसेच मनोरंजनही होते. आधुनिक युगात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झालेली आहेत. प्रहेलिकांचा वास्तव जीवनातील उपयोग कमी होत असला तरी लोकजीवनात मौखिक परंपरेच्या स्वरूपात त्यांचे अस्तित्व अबाधित आहे. एक जनौला म्हणजेच प्रहेलिका खालील प्रमाणे

एक सींग के बोकरा, मेरेर मेरेर नारियाया ।

मुंह डहर चारा चरे, बाखा डहर पगुराये ।।  ( उत्तर :चक्की )

खोडोर – खोडोर खोडरी, छ : आखि तीन बोडरी

( उत्तर : नांगर हाकणारा शेतकरी )

छत्तीसगढचे लोकनाट्य : लोकनाट्य हे लोकजीवनाचा आरसा समजले जाते. लोकनाट्यात स्थानिक लोकजीवनातील परंपरा, राहणीमान, रीतिरिवाज यांचे स्पष्ट चित्र रंगवलेले असते. त्याचे दर्शन लोकनाट्यातून होते. लोकजीवनात जे जे घडते, चांगले – वाईट, चढ – उतार, हानी – लाभ, सुख -दुःख हे सर्व लोकनाट्याचे कथानकात हाताळले जातात. जनलोक आपल्या परिघात जे दृश्य पाहतात. त्या दृश्य आणि घटनांची गुंफण लोकनाट्यात केली जाते. हास्य – विनोद आणि स्वप्ने, आशा आणि विश्वास यांचा अंतर्भाव या लोकनाट्याच्या लोकरंगात पुरेपूर होतो. अभिनय आणि संवादातून जे मर्म लोकरंगमंचावर सादर होते तेच लोकनाट्य. अन्य लोककला प्रकारांसारखी छत्तीसगढची लोकनाट्य परंपरा मौखिक स्वरूपाची आहे. येथील लोकनाट्यांमध्ये रहस, चंदैनी, भतरानाट , नाचा या लोकनाट्यांची समृद्ध परंपरा आहे. नाचा छत्तीसगढचे सर्वाधिक लोकप्रिय लोकनाट्य आहे. ‘नाच मध्ये गीत – संगीत , नृत्य आणि अभिनयाचा सुंदर समन्वय साधलेला असतो. नाचामध्ये गीत – संगीत, नृत्य आणि अभिनयाचा सुंदर समन्वय साधलेला असतो. नाचामध्ये आजही पुरुष कलाकार स्त्रियांची भूमिका साकार करतात. नाचा लोकनाट्याची कोणतीही संहिता नसते. नाचाचे कलाकार एखादा प्रसंग किंवा कथा परस्परांशी संवाद साधून बसवून घेतात आणि गंमत किंवा प्रहसनाच्या रूपात सादर करतात. लोकनाट्य  नाचा हे मौखिक परंपरेचे सर्वात चांगले उदाहरण आहे. नाचामध्ये  नचौडी गीताने वर्तमान स्थितीवर मार्मिक भाष्य केले जाते ते असे –

मुसवा मगन भइगे, बासी रोटी खाके,

मुसवा मगन भइगे, नासी रोटी खाके

ओमन खाथे दार भात, घी ल चुहा के

हमन खायन रुक्खा सुक्खा करम ल ????

मुसवा मगन भइगे, बासी रोटी खाके ।

छत्तीसगढच्या नाचा कलाकरांनी जगभर आपला लौकिक प्रस्थापित केला. हबीब तनवीर यांच्या चोर चरणदास नाटकाने जगभर प्रसिद्धी मिळविली. ते नाचा परंपरेवर आधारित आहे.

संदर्भ :

  •  Parmar, Shyam,Folklore of Madhya Pradesh,National Book Trust, India,1972.
  • Twente,Theophil H., Folk Tales of Chhattisgarh India,Literary Licensing, LLC, 2013.

भाषांतर :  प्रकाश खांडगे