लेले, रामचंद्र दत्तात्रय : ( १६ जानेवारी १९२८ )
रामचंद्र दत्तात्रय लेले यांचा जन्म आंध्र प्रदेशातील हैद्राबादमध्ये झाला. १४ व्या वर्षी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. हैद्राबादच्या उस्मानिया मेडिकल कॉलेजमधून वयाच्या २१ व्या वर्षी, १९४९ मध्ये त्यांनी एम.बी.बी.एस.ची पदवी उर्दू माध्यमातून शिकून प्राप्त केली. महात्मा गांधींच्या खेड्यातील सेवा करण्याच्या आवाहनाने प्रेरित होऊन लेले यांनी स्वेच्छेने ५ वर्षे ग्रामीण वैद्यकीय सेवा केली. १९५५ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमधून ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीनचा डिप्लोमा केला. त्यानंतर सहा महिन्यातच त्यांनी एमआरसीपी एडिनबर्ग आणि पुढच्या वर्षी एफआरसीपी लंडन या पदव्या मिळवल्या. १९६६ मध्ये लेले हे सायक्लोट्रॉनच्या (अणुवैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे उपकरण) संपर्कात आले. त्याच वर्षी त्यांनी कॅनडातील हॅमरस्मिथ रूग्णालयामध्ये न्यूक्लियर मेडिसिनची फेलोशिप प्राप्त केली. १९६८-७२ मध्ये ते ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. रुग्णालय, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७२-७३ या काळात त्यांची जे. जे. रुग्णालयाचे डीन म्हणून नियुक्ती झाली. जुलै १९७३ मध्ये त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात मुख्य चिकित्सक आणि अणुवैद्यकीय विभागाचे संचालक म्हणून रूजू होण्यास आमंत्रित केले. येथे त्यांनी आपल्या देशातील सर्वात पहिला व पूर्णपणे विकसित अणुवैद्यकीय विभाग आणि रेडिओ-इम्युनोॲसे (Radio-immunoassay) यांची यशस्वीरित्या स्थापना केली. आज त्यांच्या या योगदानामुळे संपूर्ण आशिया खंडातील ट्रिपल हेड गॅमा कॅमेरा सुविधा जसलोक रुग्णालयात उपलब्ध आहे, जी भारताव्यतिरिक्त केवळ जपानमध्येच आहे. त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्र (बी.ए.आर.सी.) च्या हेल्थ फिजिक्स विभागाच्या सहकार्याने संपूर्ण बॉडी काउंटरची स्थापना केली. या उपकरणाच्या मदतीने रक्त, लघवी व मलाचे नमुने न घेता रक्तातील लोह आणि व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण, लघवी वाटे जाणारी प्रथिने तसेच शौचात आढळणारे रक्ताचे प्रमाण मोजता आले.
लेले यांनी १0 पुस्तके आणि १00 हून अधिक वैद्यकीय शोधनिबंध लिहिले आहेत, ते विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांचे क्लिनिकल सायन्स अँड क्लिनिकल रिसर्च आणि क्लिनिकल ॲप्रोच ही दोन्ही पुस्तके सर्व डॉक्टरांसाठी खूपच उपयुक्त आहेत. त्यांनी भारतात व परदेशात विविध शहरांमध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत. उत्कृष्टतेचा ध्यास (‘Pursuit of Excellence’) हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या साध्या, सरळ व ध्येयवादी (शक्तिशाली) जीवनाचे उत्तम वर्णन आहे. (हे तरुण व वृद्ध डॉक्टरांकरिता उत्कृष्ट प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक आहे) रेडिओसोटोप (कार्बन -१४ आणि ट्रिशियम) चा वापर करून आयुर्वेदिक औषधांचे प्रमाणीकरण करणे आणि १० आयुर्वेदिक मध्ये रसायन हे अल्झायमर रोगात कितपत उपयोगी आहे या संशोधनात ते सक्रिय आहेत. त्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प क्षयरोगाच्या इमेजिंग आणि उपचारासाठी ॲप्टामर्सची निर्मिती करणे हा आहे. (ॲप्टामर्स हा शब्द लॅटिन आप्टास म्हणजे फिट आणि मेरोस म्हणजे भाग यापासून आला आहे. हे लहान डीएनए किंवा आरएनए रेणू असतात. ते निवडकपणे आणि त्याच्या वैशिष्ट्यासह विशिष्ट लक्ष्याशी प्रतिबद्ध होऊ शकतात. इमेजिंग आणि उपचारासाठी यांचा वापर केला जातो.
भारतात त्यांनी सर्वप्रथम टेक्निशिअम -99m आधारित किरणोत्सर्गाचा (Radioisotope) शिरेतून वापर, तसेच १९७८ मध्ये न्यूक्लियर कार्डियोलॉजी (Nuclear Cardiology), १९८२ मध्ये न्यूक्लियर स्टेथोस्कोप (Nuclear Stethoscope) आणि १९८८ मध्ये सिंगल फोटॉन एमिशन कॉम्प्यूट्युटेड टोमोग्राफी (एसपीईसीटी) (SPECT) स्कॅन या सुविधा प्रस्थापित केल्या.
अणुवैद्यकीयशास्त्र (Nuclear Medicine) ही एक विशिष्ट वैद्यकीय शाखा आहे, ज्यामध्ये रोगांचे निदान आणि उपचार करण्यासाठी किरणोत्सर्गाचा (Radioisotope) वापर केला जातो. न्यूक्लियर इमेजिंग (Nuclear Imaging) च्या सहाय्याने बहुतेक वेळा डॉक्टरांना जटिल रोग उदा., कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि चेतासंस्थेचे विकार यांची सुरुवातीच्या टप्प्यातच अचूक निदान आणि तसेच शरीरात रोगाचा विस्तार कितपत झाला आहे आणि दिलेल्या उपचारांचा प्रतिसाद कसा आणि किती आहे हे ठरवण्यास मदत होते. न्यूक्लियर इमेजिंगला (Nuclear Imaging), आण्विक किंवा फंक्शनल इमेजिंग असे ही म्हणतात. या रोगनिदान पद्धतीने आपल्या शरीरात पेशींच्या स्तरावर काय घडत असते याचे तपशीलवार चित्रे मिळते. अणुवैद्यकीय शास्त्रात (Nuclear Medicine) मूलत: शरीरविज्ञानशास्त्र (Physiology) आणि जीवरसायनशास्त्राचे (Biochemistry) तत्त्व लागू होतात. इतर निदानात्मक इमेजिंग पद्धती (जसे एक्स-रे, सीटी स्कॅन, इ.) शारीरिक संरचनेची छायाचित्रे देतात, तर न्यूक्लियर इमेजिंग (Nuclear Imaging), शरीरातील रासायनिक व जैविक प्रक्रियांच्या मूल्यांकनाच्या आधारे शरीर कसे कार्य करते याची माहिती देते. या इमेजिंग प्रक्रियेमध्ये, रुग्णांना रेडिओॲक्टिव्ह ट्रेसर (radioactive tracer) चे इंजेक्शन दिले जाते. गॅमा कॅमेरा, एसपीईसीटी (SPECT) आणि पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) (PET) स्कॅनच्या सहाय्याने थोड्या थोड्या वेळाने ट्रेसरचे वितरण मोजले जाते, यावरून शरीरातील विविध अवयवांच्या प्रक्रिया कशा घडत आहेत याची माहिती मिळते. याच्या आधारे शरीरचे कार्य व्यवस्थित आहे की नाही हे कळते. या क्षेत्रातील नवीन शोध म्हणजे टॅग केलेल्या मोनोक्लोनल ॲन्टीबॉडीज (antibodies) चे इंजेक्शन देऊन संसर्गजन्य रोगांचे निदान जास्त चांगल्या प्रकारे करता येते.
त्यांना रोटरी क्लबचा कम्युनिटी सर्व्हिस अवॉर्ड, असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाने सुरू केलेल्या प्रतिभाशाली शिक्षक पुरस्काराचे पहिले मानकरी, पद्मभूषण आणि धन्वंतरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांचे सुपुत्र डॉ. विक्रम लेले, १९८८ साली जसलोक हॉस्पिटलमध्ये रुजू झाले. १९९६ मध्ये इंडो-अमेरिकन सोसायटीने त्यांना एकाच क्षेत्रात- अणुवैद्यकीय शाखेत प्रतिष्ठा मिळविणारे पिता आणि पुत्र म्हणून त्यांचा सत्कार केला. आर.डी. लेले यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी एन.टी.आर. आरोग्यविज्ञान विद्यापीठ, आंध्र प्रदेश यांजकडून आणि इंडियन न्यूक्लियर सोसायटीची होमी भाभा जीवन गौरव मिळाले आहेत.
संदर्भ :
- https://www.jaslokhospital.net/Content/ResearchPaper/jaslok-hospital-medical-research-bulletin-jul-sep2016.pdf
- http://drrdlele.com/
- https://www.mayoclinicproceedings.org/article/S0025-6196(11)63086-3/fulltext
समीक्षक : राजेंद्र आगरकर