लॉफ, आंद्रे मिशेल : ( ८ मे १९०२ ते ३० सप्टेंबर १९९४ )

आंद्रे लॉफ यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीची सुरुवात वयाच्या १९ व्या वर्षी पॅरिसच्या पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये झाली. ३० व्या वर्षी रॉकफेलर फाउंडेशनतर्फे अनुदान मिळवून त्यांनी पीएच्.डी. प्राप्त केली. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ एडवर्ड चॅटन यांचा सहकारी म्हणून सतरा वर्ष काम करण्याचे भाग्य त्यांना लाभले.

लॉफ यांची १९३८ मध्ये पाश्चर इन्स्टिट्यूटच्या प्रमुख पदावर नियुक्ती झाली. याच काळात त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे संशोधन झाले. त्यात प्रामुख्याने विषाणू मायक्रो बायोटा  व पोलिओ विषाणू याचा समावेश होतो. १९३२-३३ मध्ये रॉकफेलर अनुदानातून हॅम्बुर्गयेथील प्रयोगशाळेत प्रोहिमॅटिन या हिमोग्लोबीनमधील लोहयुक्त घटकाचा त्यांनी अभ्यास केला. १९३६ मध्ये पुन्हा रॉकफेलर अनुदानातून लॉफ व त्यांच्या पत्नी डेव्हिड केलिन यांनी केंब्रिजमधील प्रयोगशाळेत ग्राम निगेटिव्ह दंडाकार जंतूच्या प्रजातीवर महत्त्वपूर्ण अभ्यास केला. १९५२ मध्ये पॅरिस येथे लॉफ पाश्चर संस्थेत सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. बॅक्टेरिओफाजेस हे जीवाणूंना खाणारे विषाणू होत. काही वेळा अनेक नवीन विषाणू तयार होतात तर इतर वेळी नवीन विषाणू तयार करण्यासाठी त्यांना जीवाणूंच्या अनेक पिढ्यांमधून जावे लागते. हीच प्रक्रिया ‘लायसोजेनी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

आंद्रे लॉफ यांना डेस विज्ञान अकादमीतर्फे लालेमंट, नॉरी, चौसर पेटिटडीओरमाए हे पुरस्कार देऊन सन्मानित केले. लॉफ हर्वी सोसायटी, जैवरसायन अमेरिकन सोसायटी, जनरल मायक्रोबॉयोलॉजी सोसायटी व अमेरिकन बोटॅनिकल सोसायटी यांचे मानद सदस्य होते. रॉयल नेदरलँड आर्टस व सायन्स अकादमीचे ल्युवेनहॉक पदक आणि ब्रिटिश जैवरासायनिक सोसायटीचे केलिस ब्रिटीश पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आंद्रे लॉफ यांना १९६५ मध्ये वैद्यक व जीवशास्त्रामधील नोबेल पुरस्कार त्यांच्या विषाणूंच्या जीवाणूपेशीत वास्तव्य करून त्यास इजा करण्याच्या कार्यप्रणालीला मिळाला. यालाच लायसोजेनी (Lysogeny) असे म्हणतात. आंद्रे लॉफ यांनी नोबेल व्याख्यानात विषाणू- जीवाणूंचा सुसंवाद कसा होतो ते सखोलरित्या सांगितले. लॉफ यांनी आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजैविक संस्थांचे मानद अध्यक्ष पद भूषविले. तसेच ते मेडिकल सायन्सेस संघटनेच्या आंतरराष्ट्रीय समितीचे सदस्य होते. रॉयल सोसायटीचे विदेशी सदस्य होते.

विषाणूंच्या वर्गीकरणासाठी वापरली जाणारी LHT ही Lwoff, Horne व Touriner या त्रिकूटाने शोधलेली पद्धत प्रसिद्ध केली. आंद्रे लॉफ यांनी विषाणू व पेशीमधील चयापचय तसेच संवादाच्या सहाय्याने त्यांचा विकास व उत्क्रांती यासाठी आयुष्यभर काम केले.

आंद्रे लॉफ पॅरिस येथे मृत्यू पावले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे