नारळीकर, जयंत विष्णु : ( १९ जुलै १९३८ )

जयंत विष्णु नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णु वासुदेव नारळीकर हे गणिती होते तर मातोश्री सुमती या संस्कृत शिकलेल्या होत्या. सुप्रसिद्ध गणिती मो. शं. हुजूरबाजार आणि विद्युत अभियंता गो. शं. हुजूरबाजार हे त्यांचे मामा. म्हणजे वडील आणि आई अशा दोघांकडून त्यांना विद्वत्तेचा वारसा लाभला होता. पुढे विष्णुपंत नारळीकर बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभाग प्रमुख झाले तेव्हा हे कुटुंब बनारसला आले. त्यामुळे जयंतरावांचे प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण तेथे झाले.

उच्च शिक्षणासाठी जयंतराव केंब्रिज विद्यापीठात गेले. या विद्यापीठातून त्यांनी बी. ए., पीएच्. डी., एम. ए. आणि एस्सी. डी. या पदव्या संपादन केल्या. पीएच्. डी.साठी त्यांचे मार्गदर्शक होते शास्त्रज्ञ फ्रेड हॉयल. गणितातील ट्रायपोस ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले. खगोलशास्त्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना अत्यंत प्रतिष्ठा लाभलेले टायसन पदक आणि स्मिथ पारितोषिक बहाल करण्यात आले.

सहा वर्षे ते केंब्रिज विद्यापीठात अध्यापन करीत होते. १९७२ मध्ये ते भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढच्या काळात नारळीकर तेथे ज्येष्ठ प्राध्यापक आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख बनले. साधारण १९८५ च्या सुमारास विद्यापीठ अनुदान मंडळात, खगोलशास्त्राला वाहिलेले एक आंतरविद्यापीठीय केंद्र उभारण्याच्या दिशेने विचार सुरू झाला होता. त्या वेळेस या मंडळाचे अध्यक्ष असलेले प्रा. यशपाल यांनी हे केंद्र उभारण्याची जबाबदारी नारळीकरांकडे सोपविली. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि १९८८ मध्ये  आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल-भौतिकी केंद्र – आयुका – स्थापन करण्यात आले. नारळीकरांची या केंद्राचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कारकीर्दीत या संस्थेने इतकी प्रगती केली आहे की आज हे केंद्र आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावले आहे. हे केंद्र उभारून आणि नंतर त्याला त्यांनी उत्तम नेतृत्व दिले आहे. त्यांनी आयुकाची धुरा १५ वर्षे सांभाळली आणि २००३ मध्ये ते संचालक पदावरुन निवृत्त झाले. सध्या ते आयुकात सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor) हे पद भूषवित आहेत.

नारळीकरांचे संशोधन मुख्यत: विश्वरचनाशास्त्राशी निगडित आहे. या विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली असे मानले जाते आणि हा सिद्धांत बहुसंख्य शास्त्रज्ञ मान्य करतात. परंतु हॉयल आणि नारळीकर यांनी १९६४ मध्ये एक वेगळाच सिद्धांत मांडून या कल्पनेला हादरा दिला. त्यामुळे नारळीकर एकदम प्रकाशझोतात आले. त्यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली. नारळीकरांच्या संशोधनाची इतर काही क्षेत्रे म्हणजे क़्वासार, कृष्णविवरे, गुरुत्वाकर्षण, माख तत्त्व (Mach’s Principle), पुंज विश्वरचनाशास्त्र (quantum cosmology) आणि Action at a distance physics. १९९९ सालापासून नारळीकर संशोधकांच्या एका गटाचे नेतृत्व करीत आहेत. हा गट पृथ्वीच्या वातावरणातील ४१ कि.मी. उंचीपर्यंतच्या हवेचे नमुने घेऊन त्यात सूक्ष्मजीव सापडतात का याचा शोध घेत आहे. २००१ आणि २००५ मध्ये या बाबत जो अभ्यास झाला त्यानुसार असे जीवाणू सापडले आहेत. आपल्या पृथ्वीवर पृथ्वीबाहेरून आलेल्या जीवाणूमुळे सजीवांची निर्मिती झाली असा एक सिद्धांत मांडण्यात आला आहे. या सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.

नारळीकरांचे ३६७ शोधनिबंध विविध संशोधन नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.

सर्वसाधारणपणे असे दिसते की शास्त्रज्ञ आपल्याच कोशात गुरफटलेले असतात आणि त्यामुळे ते जनसामान्यांपासून दूर असतात. परंतु नारळीकर याला सन्मान्य अपवाद आहेत. विज्ञान सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात. मुंबई दूरदर्शनवरून आकाशाशी जडले नाते ही त्यांची मालिका प्रसारित करण्यात आली. पुढे दूरदर्शनवरून ब्रह्मांड या नावाची हिंदी मालिका प्रसारित झाली. त्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून विज्ञान-प्रसारासाठी विपुल लेखन केले आहे. अशा लेखांची संख्या ११३४ एवढी आहे. विशेष म्हणजे हे लेखन सोप्या भाषेत आहे. त्यांनी विज्ञान-कथा हा प्रकारही हाताळला आणि लोकप्रिय केला आहे. नारळीकरांची  पुस्तके बंगाली, तेलगू, कन्नड, हिंदी, मल्याळम आणि गुजराथी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. इतकेच नाही तर ग्रीक, इटालियन, रशियन, पोलिश, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश आणि चिनी  अशा परदेशी भाषांमध्येही त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. नारळीकरांनी स्वत: लिहिलेल्या, संपादित केलेल्या आणि अनुवाद झालेल्या पुस्तकांची संख्या १४२ आहे. याशिवाय त्यांनी तांत्रिक विषयांवर तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक भाषणेही दिली आहेत.

नारळीकरांचे काम इतके सर्वमान्य आहे त्यामुळे त्यांना विविध मानसन्मान मिळाले. त्यात भारत सरकारचे पद्मविभूषण, बरद्वान, बनारस हिंदू, रुरकी, कोलकता आणि कल्याणी विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेटस, साहित्य अकादमी पुरस्कार, एम. पी. बिर्ला पुरस्कार, भटनागर पुरस्कार, फ्रेंच खगोलीय संस्थेचा प्रिक्स जान्सेन (Prix Janssen) पुरस्कार, विज्ञान-प्रसारासाठी युनेस्कोचा कलिंग पुरस्कार, कॉस्मोलॉजी कमिशन ऑफ द इंटर नॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियन या प्रतिष्ठित संस्थेचे, लंडनच्या रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सहयोगी सदस्य, भारतातील तीन राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय सदस्य, थर्ड वर्ड ॲकेडेमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्य असे अनेक बहुमान आहेत.

संदर्भ :

समीक्षक : हेमंत लागवणकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.