बेहेरे, तुलसीदास हरिश्चंद्र : ( १५ मे १९५२ – ६ जानेवारी २०१८ ). लोकसाहित्याचे अभ्यासक, नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या लोकनाट्याचे अभ्यासक आणि संशोधक. त्यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले जवळील तुळस या गावी झाला. त्यांनी जन्मगावीच शालेय शिक्षण पूर्ण केले. १९६९ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत मराठी आणि संस्कृत या विषयांत त्याकाळच्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम आले होते आणि त्यासाठीच महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार शिष्यवृत्तीचे ते मानकरी ठरले होते. घरची शेती आणि गुरे सांभाळून त्यांनी अभ्यास केला होता. १९७४ साली बाॅम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये (बीपीटी) लिपिकाच्या हुद्द्यावर ते रुजू झाले. त्याच वर्षी आपली नोकरी सांभाळून मुंबईतील माटुंग्याच्या, रूपारेल महाविद्यालयातील कला शाखेतून मराठी आणि संस्कृत या विषयांमध्ये त्यांनी पदवीही मिळविली. रूपारेल महाविद्यालयातील प्रा.ल. ग. जोग सरांनी रुजवलेल्या साहित्यजाणीवेमुळे त्यांना लेखन प्रेरणा मिळाली.  पुढील काळात त्यांनी रमेश कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दक्षिण कोकणातील दशावतार आणि कर्नाटकातील यक्षगान’ या तुलनात्मक अभ्यासातून ग्रंथ साकार केला. २००५ साली मुंबई विद्यापीठाने हा ग्रंथ मान्य करून त्यांना दशावतार या विषयात आचार्य पदवी दिली. त्याच वर्षी मुंबई विद्यापीठाने लोककला अकादमीमध्ये मानद प्राध्यापक म्हणून प्रायोगिक लोककला या विषयासाठी त्यांना बेहेरेंना व्याख्याते म्हणून नियुक्त केले.

बीपीटीच्या कलाविभाग अंतर्गत होणाऱ्या एकांकिका स्पर्धांतून बेहेरेंचा लेखन प्रवास सुरू झाला. सोबतच त्यांनी कथा, कविताही लिहील्या आणि एकांकिका दिग्दर्शितही केल्या. सुलतान आणि सुंदरी, कप्तान, जेल, म्युझियम, खेळता दशावतारी नेटके, अरण्य देशाची गोष्ट, काका विधाते यांच्या अझीजान  कादंबरीवर आधारित क्रांतिज्वाला, सर्वेअर, एकलव्य, नाविका रे, मुक्काम पोस्ट  इत्यादी एकाहून एक सरस एकांकिका त्यांनी लिहील्या. बेहेरेंचा एकांकिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकस, अर्थपूर्ण आणि प्रयोगशील होता. त्यांच्या एकांकिकांमध्ये लोकसंगीत, लोककलांचा वापर सर्रास असायचाच. विषयांचे वैविध्य, गूढता, आधुनिकतेला सामोरे जाण्याचा त्यांचा अट्टाहास होता. वैविध्यपूर्ण संगीताचा वापर त्यांच्या एकांकिकांचे सादरीकरण नाविन्यपूर्ण करत असे. या सर्व एकांकिकांची दखल त्यावेळच्या परीक्षकांनी आणि वर्तमानपत्रांतील समीक्षकांनी आवर्जून घेतली आहे. त्यांच्या या एकांकिकांना अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये लेखनाच्या आणि दिग्दर्शनाच्या पारितोषिकांनी गौरविले गेले. त्यांनी गुरुकुल, वंदे मातरम्, वृंदावनसारखी बालनाट्ये देखील लिहिली आणि सादर केली आहेत.

१९७७ साली बेहेरेंनी विजय मोंडकरांच्या निनादया संस्थेकरिता राज्य-नाट्य स्पर्धेसाठी म्युझियम  हे पाहिले नाटक लिहिले व तिथून प्रत्येक वर्षीच्या राज्य-नाट्य स्पर्धेसाठी कलाकृती सादर केल्या. काली वेणा (कथा-पटकथा-संवाद), मृत्यू गोल, चिं .त्र्य. खानोलकरांच्या कोंडुरा  कादंबरीवर आधारित कोंडुरा  ही नाटके त्यांनी लिहिले व सादरही केले. त्यांनी महाभारताच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे लेखन केले आहे, द्रौपदीचा दीर्घांकही त्यांनी लिहिला व सादर केला.

बेहेरेंनी १९७८ साली आयएनटी संस्थेच्या लोककला संशोधन दौऱ्यात अशोकजी परांजपे यांच्यासोबत, कोकणातील लोककलांचा अभ्यास केला आणि त्यांना आयुष्याचे ध्येय सापडले. अभ्यास दौऱ्यातून दशावतारी राजा हे संशोधित नाटक जन्माला आले. दशावतारी कलाकाराचे वास्तव जीवन आणि दशावतारी नाटकातील अलौकिक जीवन यातील संघर्ष त्यांनी यात मांडला आहे. त्या नाटकाचे आयएनटीने ५० प्रयोग केले व लोकाग्रहास्तव अजून ५० प्रयोग झाले. याच नाटकाचे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग करून, व्यावसायिक नाटकांमध्ये आणण्याचा प्रयत्न ही बेहेरेंनी केला होता. ज्यात संकासुराची भूमिका स्वतः वठवली होती. या नाटकात दशावतारी बाजाचे संगीत, आगमन-निर्गमन, उत्स्फूर्त संवाद, मुख्यत्वे कोकणची पार्श्वभूमी आहे. अशा अत्यंत बंदिस्त स्वरूपातील हे नाटक नारायणराव बोडस, अरविंद पिळगांवकर, राजा मयेकर, सविता मालपेकर इत्यादी नामवंत कलावंतांनी सादर केले होते. दशावतारी राजा  या नाटकामुळे बेहेरे नाटककार म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला आले. दशावतारी नाटकाला या निमित्ताने प्रतिष्ठा प्राप्त झाली. वृत्तपत्रांनी, समीक्षकांनी, जाणकारांनी, बुजुर्गांनी तसेच ज्येष्ठ रंगकर्मींनी बेहेरेंचे कौतुक केले होते. लहानपणापासून पाहिलेल्या शेकडो दशावतारी नाटकांपासूनच ‘दशावतारी राजा’ ही संजीवनी त्यांना मिळाली होती. दशावतारी खेळ सादर करणाऱ्या कलाकारांना, संगीतकारानां, शैलीला, त्या वेशभूषांना, रंगभूषांना व या कलेशी जोडलेल्या सर्वानांच कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याची ही संधी या नाटकातून बेहेरेंना मिळाली. १९७८ मध्ये बीपीटीच्या अंतर्गत एकांकिका स्पर्धेमध्ये खेळता दशावतारी नेटके  ही एकांकिका त्यांनी सादर केली होती. ज्यात पारंपरिक संगीतातून आशयघन आणि अत्यंत देखणा असा कलापूर्ण प्रयोग सादर केला होता. त्याकरिता लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नेपथ्य पारितोषिकांचे ते मानकरी ठरले होते. त्यातूनच पुढे दशावतारी राजा  नाटकाचे तांत्रिक अंग विस्तारित गेले. २०१४ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली येथे भारत रंगमहोत्सवात गरुड जन्म  या पारंपरिक आख्यानाची रंगावृत्ती सादर केली.

१९७८ सालापासून ते अखेरपर्यंत त्यांनी दशावतारी नाट्यकलेवर अनेक दीर्घ लेख लिहिले, व्याख्याने दिली, परिसंवाद केले. दशावतारी कलेतील सादरीकरण आणि आशय यात बेहेरेंचा व्यासंग अतिशय दांडगा होता. आविष्कार संस्थेच्या आर्य चाणक्य  या नाटकात व गोवा हिंदू संस्थेच्या विजया मेहता दिग्दर्शित हयवदन  या नाटकात दशावतारी बाजाचा वापर करून या कला प्रकारावरची परिपूर्णता त्यांनी सिद्ध केली. तसेच आर्य चाणक्य  या नाटकात पात्रांचे आगमन-निर्गमन दशावतारी पद्धतीने करून वेगळाच अनुभव दिला होता. हयवदन नाटकातील चपखलपणे बसविलेले दशावतारी संगीत बेहेरेंचा नाट्य-कलेला दिलेला एक सन्मान होता.

संगीत नाटक अकादमीने दशावतारी कलेची नोंद घेत बेहेरेंना भोपाळच्या भारत भवनमध्ये व दिल्लीच्या श्रीराम सेंटरमध्ये प्रात्यक्षिक आणि व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. १९८७ साली बनारसला दशावतारी बाजातील नाटक एकलव्य  सादर करून त्यावरील परिसंवादासाठी त्यांना आमंत्रितही केले होते. कला जगवायची असेल, जोपासायची असेल तर तिच्यात नवे पैलू शोधले पाहिजेत व बदलत्या काळाबरोबर नव्या गोष्टी स्विकारायला हव्यात असे बेहेरेंचे ठाम मत होते. पारंपरिक कथांना आधुनिक काळाशी बांधणे, त्यातील मिथके वर्तमानात आणून नाट्य-बीजाला नवा आयाम देणे त्यांना सहजरीत्या जमत असे. जलधरवृंदाच्या दशावतारी आख्यानात वृंदा सती जाते हा संदर्भ टाळून, पर्यावरण रक्षण करण्याचे तत्त्व त्यांनी कथेमध्ये शोधले आहे. गरुड जन्माचे क्लिष्ट आख्यान दोन तासात संगीताच्या, रंगभूषेच्या वेगळ्याच रंगावृत्तीने, देखणेपणाने सादर केले आहे. राजा रुक्मांगदाच्या सत्त्वशील जीवनातील सुख-दुःखाचे क्षण दशावतारी अभिनेत्याच्या आयुष्यातील सुखदुःखांशी सहजपणे गुंफले आहेत.

पूर्वी महिलांना दशावतारी नाटकांत प्रवेश मिळत नसे, असा पारंपरिक संकेत अजूनही बहुअंशी आहे, हा संकेत सारून मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीच्या विद्यार्थिनींकरवी दशावतारी नाटकाचा पूर्वरंग आणि उत्तररंगचा एक प्रयोगही बेहेरेंनी बहारदारपणे सादर केला होता. झांझ, पखवाज, हार्मोनियम इतक्याच संगीत मेळामध्येही नाटक फुलवता आले पाहिजे इतके ते अस्सल असावे असे त्यांना वाटे. साहित्यातील नवरसांची प्रचिती संवादातून, संगीतातून अधिकाधिक तीव्र होत गेली पाहिजे हे तत्त्व त्यांनी अखेरपर्यंत पाळले होते. रसांचा परिपोष करणारी, कथानकाला पुढे नेणारी, भक्तीगीते, भावगीते, अभंग त्यांनी स्वतः रचले, संगीतबद्धही केले होते. लहानपणापासून जे अभंग आणि भजने ऐकली होती त्यांची शैली, नाद आणि लय, आपल्या नाटकात त्यांनी घट्ट पकडून ठेवली. नाटकाच्या कथानकला दर्जेदार बनवण्याचे काम या संगीताने केले तेच रसिकांना भावले.

बेहेरेंनी कोकणातील दशावतारी कलावंतांचे सर्वेक्षण करून त्यांना सरकारी निवृत्ती वेतन मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी दशावतारी लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याचे तसेच या कलेला राजमान्यता मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

संदर्भ :

  • बेहरे, तुलसीदास, कोकणाचा दशावतार आणि कर्नाटकातील यक्षगान, मुंबई,२०२०.