मक्षिका पंजर या कीटकभक्षक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र, स्फुरद व पालाश ही मूलद्रव्ये मातीतून शोषली जातात. परंतु काही वनस्पती दलदलीच्या वा वालुकामय प्रदेशात वाढतात. अशा ठिकाणी नत्राचे प्रमाण मातीत फारच कमी असते. नत्र हा वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यावश्यक घटक आहे, अशा वेळी नत्राची गरज भागविण्यासाठी काही वनस्पती कीटकभक्षण करतात. अशा वनस्पतींना कीटकभक्षक वनस्पती (Insectivorous plants) म्हणतात. कीटकांच्या शरीरातून त्यांना नत्रयुक्त पदार्थ व इतर आवश्यक मूलद्रव्ये उपलब्ध होतात. या वनस्पतींच्या पानांचे व इतर भागांचे विविध प्रकारे रूपांतर झालेले दिसते. अशा प्रकारच्या कीटकभक्षक वनस्पतींचे १५ वंश व सु. ४५० जाती आहेत. ड्रॉसेरा, घटपर्णी, मक्षिका पंजर ह्या त्यापैकी काही कीटकभक्षक वनस्पती आहेत.
मक्षिका पंजर ही ड्रॉसेरेसी कुलातील डायोनिया जातीतील एकमेव वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव डायोनिया मसायपुला (Dionaea muscipula) असे आहे. हे एक छोटे झाड असून झाडाच्या मुख्य खोडापासून ५ ते १५ सेंमी. लांबीच्या पानांचे गुच्छ निघतात; ते जमिनीला समांतर असतात. याचा मुख्य अक्ष लांब व उंच असून त्यावर फुलांच्या छोट्या वल्लरी असतात. या प्रत्येक वल्लरीवर २ ते १४ फुले असतात. पानांचे दोन भाग असतात, खालचा भाग कर्णिकाकृती असून तो मध्य शिरेने जोडलेला असतो. वरच्या भागातील पाते मांसल असून त्याची दोन अर्धवर्तुळाकृती पाळे असतात. जाड मजबूत मध्य शिरेने ती एकमेकांशी जोडलेली असतात. पाळे प्रपिंडीय असून त्यांच्या काठावर दातांप्रमाणे लांबट व बारीक केस असतात. प्रत्येक पाळ्यावर तीन संवेदनशील व ताठर केस असतात; त्यांना स्पर्श होताच पुस्तकाप्रमाणे दोन्ही पाळे एकदम मिटतात. काठावरील दात एकमेकांत अडकून राहिल्यामुळे आत अडकलेले कीटक बाहेर जाऊ शकत नाहीत. क्षणार्धात पानावर बसलेला कीटक सापळ्यात अडकून जातो. अशा रीतीने कीटक बंदिस्त होताच प्रपिंडातून पाचक रस स्त्रवू लागतात. पाचक रसांमुळे थोड्याच दिवसांत कीटकाच्या शरीराचे अपघटन होते व त्यातले पदार्थ पाळ्यांमधून शोषले जातात.
गांधील माशीवर्गातील कीटक हे मक्षिका पंजरचे भक्ष ठरणारे कीटक आहेत. हे कीटक पानांकडे आकर्षित होतात. याबाबत एक संशोधन केले गेले. कीटकांना आकर्षित करण्यासाठी वनस्पतींच्या पानांवर मधाचे थेंब टाकले असता थोड्याच वेळात काही कीटक व माशा मधाच्या थेंबाकडे झेपावले, परंतु आपण सापळ्यात अडकले जात आहोत याची कल्पना त्यांना नसते. पानांमधूनसुध्दा नैसर्गिक रीत्या मधासारखा द्रव स्त्रवला जातो. ह्या मधुर द्रवाकडे अनेक कीटक झेपावत राहिले व क्षणार्धात ते सापळ्यात अडकले. कीटकाचे विघटन झाल्यानंतर पाळ्या उघडून अवशेष बाहेर फेकले जातात. साधारणत: दहा दिवसानंतर सापळा उघडतो. तीन ते चार कीटकांची शिकार झाल्यानंतर सापळारूपी पान गळून पडते. निसर्गातील हा एक चमत्कारच मानला जातो.(पाहा :चित्रफीत)
मांसाहारी वनस्पती आपल्या फुलांवर येणाऱ्या कीटकांमधील परागीकरण करणाऱ्या कीटकांना ओळखून त्यांना खात नसल्याचे संशोधन कॅरोलिना राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. उत्तर कॅरोलिना (अमेरिका) येथील विल्मिंटन परिसरातील सुमारे १६० किमी. परिघामध्ये ही वनस्पती आढळते. ही वनस्पती नष्ट होत असल्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीने संशोधिका एल्सा यंगस्टेंडट प्रयत्नशील आहेत. कीटकांचा फडशा पाडताना ही वनस्पती आपल्या फुलांचे परागीकरण करणाऱ्या कीटकांवर हल्ला करत. संशोधक क्लाईड सोरेनसॉन यांचे निरीक्षण असे की, सापळ्याचा रंग फुलांपेक्षा वेगळा असून त्याद्वारे इतर कीटक प्रजातींना आकर्षित केले जाते. स्थानिक परिसंस्थेमध्ये वणवे लागून गेल्यानंतर ही वनस्पती चांगल्या प्रकारे फोफावते. अशी ही वैशिट्यपूर्ण वनस्पती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या वनस्पतीचे घरगुतीकरण (Domestication) करून बागेमध्ये व कुंड्यांमध्ये लावणे व तिचे संवर्धन करून ही प्रजाती टिकविणे शक्य आहे.
संदर्भ : https://en.vikipedia.org/wiki/Venus flytrap
समीक्षक : शरद चाफेकर