महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन स्थळ. ते अहमदनगर शहराच्या ईशान्येस सु. ६० किमी. अंतरावर प्रवरा नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे. उत्तर तीरावरील नेवासा हे बुद्रुक म्हणून, तर दक्षिण तीरावरील नेवासा हे खुर्द म्हणून ओळखले जाते. संत ज्ञानेश्वरांनी येथे ज्ञानेश्वरी  लिहिल्याचा उल्लेख संत परंपरेमध्ये असल्याने हे गाव विशेष प्रसिद्ध आहे. तेराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी  ह्या साहित्यांत नेवासा गावाचा उल्लेख निधिवास, निधवास किंवा नेवास असा येतो. कुबेराने तारकासुरापासून वाचण्यासाठी श्रीविष्णूंच्या सांगण्यावरून निधी लपवून येथे ठेवला आणि त्याला निधीवास असे नाव पडले, ही कथा स्कंदपुराणात दिसून येते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे माजी महानिदेशक एम. एन. देशपांडे यांनी गोदावरी – प्रवरा नदीच्या खोऱ्यातील ताम्रपाषाणयुगीन स्थळांच्या गवेषणा दरम्यान या स्थळाचा शोध लावला (१९५४-५५). पुढे या स्थळाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी डेक्कन कॉलेज, पुणे तर्फे पुरातत्त्वज्ञ ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली येथील लाडमोड टेकडी येथे उत्खनन करण्यात आले (१९५४-६०). सदर उत्खननातून प्रागैतिहासिक काळ, उत्तर पुराश्म काळ, मध्य पुराश्म, ताम्रपाषाण युग नंतर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, रोमन कालखंड, बहमनी कालखंड अशा विविध कालखंडांतील संस्कृतींचे अवशेष दिसून आले. ताम्रपाषाण युगानंतर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडापर्यंतच्या एका दीर्घ काळाचे मात्र येथे कोणतेही अवशेष दिसून आले नाहीत.

नेवासा येथील सांस्कृतिक क्रम दर्शविणारी प्रतिकृती, डेक्कन कॉलेज, पुणे.

उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड म्हणजेच इ. स. पू. १५० ते इ. स. २०० या काळातील विविध स्तरांतून त्या त्या काळचे सांस्कृतिक जीवन दिसून आले. पहिला कालखंड हा सातवाहन राजघराण्याशी समकालीन होता, ज्यामध्ये सारवलेली जमीन, विटा, विविध प्रकारची मृद्भांडी आणि अलंकार, हत्यारे यांचा वापर दिसून आला. ताम्रपाषाण काळानंतर असलेल्या प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाचे अवशेष हे रसेट कोटेड (लाल रंग आणि बाहेरील बाजूस पिवळसर रंगात फुलांची नक्षी), पोलादी निळसर रंगाची चमक (एन.बी.पी.डब्ल्यू.) असलेली अशी भांडी, काळी आणि तांबडी मृद्भांडी, जाड काठ असलेली तांबड्या रंगाची मृद्भांडी अशा प्रकारच्या विविध मृद्भांड्यांच्या स्वरूपात आढळले. तसेच मातीपासून बनवण्यात आलेली विविध खेळणी, माणसांच्या विविध प्रतिकृती त्या वेळच्या सांस्कृतिक आणि सामजिक बाबी दर्शवतात. मातीपासूनच बनवण्यात आलेला चैत्य हा फार महत्त्वाचा सांस्कृतिक पुरावा आपल्याला दिसून येतो.

सदर कालखंडामध्ये बांधण्यात आलेली घरे ही एका पेक्षा अनेक खोल्या असणारी होती हे निदर्शनास आले. नेवासा मध्ये ४६४५.१५ चौ. मी. एवढ्या मोठ्या विभागात अशी वस्ती असावी, असे मिळालेल्या अवशेषांवरून दिसून येते. ही घरे पक्क्या आणि मोठ्या विटांची बांधलेली अशी होती. घरांच्या दाराची रुंदी ७६.२ सेंमी. होती. दाराची लाकडी चौकट खोबणीत बसवून लाकडी दारे लोखंडी बिजागऱ्यांनी पक्की करीत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कूपाची सोय करण्यात आलेली होती. अशा कूपात फुटकी खापरे, सडलेले अन्न आणि इतर वस्तू सापडल्या. तसेच येथील उत्खननात याच स्तरावर जळलेले गहू, हरभरा, बाजरी, मूग, रागी ही धान्ये सापडली, ज्यावरून मांसाहाराबरोबरच शाकाहार सुद्धा या काळात केला जाई, हे दिसून आले. याच स्तरावर अगदी मोजकी अशी आहत नाणी (Punch marked coins), तसेच साच्यात ओतून बनवलेली कोणताही लेख नसलेली अशी टंकित नाणी आढळली. सातवाहन घराण्यातील राजा श्री सातकर्णी किंवा सिरी सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी यांची नाणी मिळाली असल्याने कालखंडाची निश्चिती करणे सोपे झाले.

मातीचा चैत्य, नेवासा.

या कालखंडामध्ये माणूस लोखंड आणि तांबे ह्या धातूंचा विविध हत्यारे आणि उपकरणे बनविण्यासाठी जास्त वापर करत असावा. तांबे धातूपासून बनवलेली सळई, बाणांची टोके, भाल्यांची टोके, धार असलेली पाती, नोकहत्यार (point) आणि अंगठ्या, तसेच लोखंडापासून तयार केलेली बाणांची टोके, पाती, सुरे, काही भांडी इत्यादी अवशेष आढळून आले. याचबरोबर हस्तिदंतापासून बनवलेला कंगवा, प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेली अंगठी, गळ्यातील आभूषणे उत्खननात आढळली.

सातवाहन कालखंडानंतर वरच्या स्तरावर इंडो-रोमन काळातील (इ. स. ५० ते २००) रोमन बनावटीच्या अनेक वस्तू येथे आढळून आल्या. त्या काळात होत असणाऱ्या व्यापारामुळे नेवासा गावातील लोकांच्या वापरात रोमन बनावटीच्या वस्तू वापरात होत्या. त्यामध्ये रोमन काचेचे मणी, रोमन पुतळे आणि अर्चना कुंडे, चार पायांची जाती या गोष्टी प्रामुख्याने होत्या. यांबरोबरच अनेक रोमन बनावटीची मृद्भांडी आढळून आली, ज्यांमध्ये लाल चकाकी असलेली (Red polished ware), काळ्या रंगाची रूलेटेड मृद्भांडी (Rouletted ware), लाल रंगाची सुबक बनावटीची आणि चाकावर घडवलेली मेगारॉन (Megaron ware) मृद्भांडी यांचा समावेश होतो. तसेच १२१.९२ सेंमी. उंचीचा अॅम्फोरा (मद्य किंवा ऑलिव्ह तेल साठवणीचा कुंभ) आढळून आला. सदर कुंभ नलिका कृती उदराचा, निमुळत्या बुडाचा, मानेला दोन्ही बाजूंनी हस्तमूठ (Handle) असलेला व गोल तोंडाचा होता. या कुंभातून भारतात समुद्रमार्गे जहाजातून रोमन मद्य आयात केले जाई. या मृद्भांड्यासोबत मध्ये टोकदार उंचवटा असलेली तांब्याची एक संपूर्ण थाळी येथे सापडली. सर्व मृद्भांडी इ. स. पू. पहिले ते इ. स. पहिले शतक या कालखंडात बनवली जात असावीत. मृद्भांडी चाकावर बनवलेली आणि उत्कृष्ट प्रतीची, सुबक बनावटीची, बहुतांश वेळा बाहेरील बाजूस नक्षीकाम केलेली असत.

सातवाहन घराण्यातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी आणि यज्ञश्री सातकर्णी यांची मिळालेली नाणी सातवाहन घराण्याचा इतिहास समजून घेण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला पुरावा आहे. या नाण्यांच्या बरोबरीने नंतरच्या काळात गळ्यात घालण्याचे गोल आकाराचे मोठे अलंकार (roman bullae) आढळले होते. हे अलंकार सोने किंवा शिसे या धातूंपासून किंवा भाजलेल्या मातीपासून तयार केलेले असत. रोमन राजा ऑगस्टस याच्या नाण्यांवर असणारे चित्रांकन येथील गळ्यातील अलंकारावर दिसून आले. शिवाय येथील उत्खननात एकाच रंगात रंगवलेल्या काचेच्या बांगड्या, शंखाचे अलंकार, हस्तिदंतापासून बनवलेल्या बांगड्या, मातृदेवतेच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती सापडल्या.

येथे मिळालेल्या अवशेषांवरून हे शहर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील एक महत्त्वाचे असे सामाजिक, आर्थिक केंद्र असल्याचे लक्षात येते.

संदर्भ :

  • Ghosh, A. Ed., An Encyclopedia of Indian Archaeology, Vol. 2, New Delhi, 1989.
  • Sankalia, H. D. & Deo, S. B. From History to prehistory at Nevasa (1954-56), Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 1960.
  • Sankalia, H. D. & Mate, M. S.  Antiquities of Nevasa, Mumbai, 1960.
  • देव, शांताराम भालचंद्र, महाराष्ट्रातील उत्खनने, माहिती आणि प्रक्षेपण मंत्रालय, प्रकाशन विभाग, भारत सरकार, मुंबई, १९६१.

                                                                                                                                                                                    समीक्षक : प्रमोद जोगळेकर