रशियाच्या नैर्ऋत्य भागात असलेल्या कॉकेशस पर्वतराजीतील, तसेच यूरोपातील सर्वोच्च ज्वालामुखी शिखर. कॉकेशस पर्वतश्रेणी ही यूरोप व आशिया खंडामधील पारंपरिक नैसर्गिक सरहद्द समजली जाते. कॉकेशस पर्वतातील ग्रेटर कॉकेशस या मुख्य श्रेणीच्या उत्तरेस २० किमी. आणि रशियन किस्लव्हॉट्स्क या नगराच्या दक्षिण-नैर्ऋत्येस ६५ किमी. वर हे शिखर आहे. एल्ब्रुस हा एक मृत ज्वालामुखी असून त्यात दोन जुळे ज्वालामुखी शंकू आहेत. त्यांपैकी पश्चिमेकडील शंकूची उंची ५,६४२ मी., तर पूर्वेकडील दुसऱ्या शंकूची उंची ५,५९५ मी. आहे. पश्चिमेकडील शिखरावर २५० मी. व्यासाचे ज्वालामुखी कुंड आहे. माऊंट एल्ब्रुस शिखराने १३८ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. हे कायमस्वरूपी बर्फाच्छादित असणारे शिखर असून त्यावर २२ हिमनद्या आहेत. या हिमनद्यांमुळे येथे उगम पावणाऱ्या बक्सान, कुबान आणि मल्का या नद्यांना पाणीपुरवठा होतो.

एल्ब्रुस शिखर अस्थिर भूमंचावर स्थित असून या ज्वालामुखीच्या खाली तप्त शिलारस आहे. एल्ब्रुसची निर्मिती सुमारे अडीच द. ल. वर्षांपूर्वी झालेली असावी. नूतनतम (होलोसीन) युगात हा ज्वालामुखी जागृत होता. ‘ग्लोबल व्हॉलकेनिझम प्रोग्रॅम’च्या अंदाजानुसार त्याचा शेवटचा उद्रेक इ. स. ५० च्या सुमारास झाला असावा. याच्या पूर्व उतारावर अजूनही भूगर्भातून गंधकयुक्त वायू बाहेर येत असतो. त्याच्या उतारवर्ती भागांत अनेक खनिजयुक्त पाण्याचे झरे आहेत.

गिर्यारोहणाच्या व पर्यटनाच्या दृष्टीने कॉकेशस प्रदेशातील हे प्रसिद्ध केंद्र आहे. एल्ब्रुस शिखरावर दोन मार्गाने चढाई करता येते. उत्तर चढाईचा मार्ग दक्षिण मार्गापेक्षा अधिक दुर्गम आहे. ट्रामगाडी (केबल कार) आणि खुर्चीयान या सुविधांमुळे येथील सामान्य मार्ग सर्वांत सोपा, सुरक्षित आणि वेगवान आहे. पूर्वेकडील कमी उंचीचे शिखर पहिल्यांदा जुलै १८२९ मध्ये रशियन लष्कराच्या मोहिमेतील खिलर काचीरॉफ यांनी, तर पश्चिमेकडील अधिक उंचीचे शिखर १८७४ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील फ्लॉरेंस क्रॉफर्ड ग्रोव्ह, फीड्रिख गार्डनर, हॉरॅक वॉकर आणि स्वीस मार्गदर्शक पीटर नुबेल यांनी सर केले. १९६४ मध्ये येथे गिर्यारोहण व पर्यटनासाठीचा एक मोठा तळ स्थापन करण्यात आला असून तेथे मोठ्या प्रमाणावर क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रशियन आणि अमेरिकन गिर्यारोहकांनी एल्ब्रुस शिखर सर करण्याची स्पर्धा सुरू केली असून पहिली शर्यत १९९० मध्ये झाली.

प्रतिवर्षी सुमारे साडे तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटक या प्रदेशाला भेट देतात. येथील पर्यटनाला आल्प्सच्या तुलनेत शंभर वर्षांनंतर सुरुवात झाली असली, तरी ते आज अत्यंत वेगाने वाढत आहे; मात्र वाढत्या पर्यटकांच्या संख्येबरोबर एल्ब्रुस शिखरावर प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. एल्ब्रुस आणि त्याच्या आसपासचा परिसर १९८६ पासून राष्ट्रीय उद्द्यान म्हणून संरक्षित असला तरी, अझो खोऱ्यामध्ये नवीन इमारतींचे बांधकाम वेगाने चालू आहे. हिमकडे कोसळण्याचा धोका असला, तरी पर्वताच्या बाजूस नवीन बांधकामे, दुकाने, बाजारपेठा यांचा वेढा पडत आहे.

समीक्षक : वसंत चौधरी

https://www.youtube.com/watch?v=v1z787ZeZFQ