राजू बाबा शेख : (१७ एप्रिल १९४२ – ९ फेब्रुवारी २०१८). वारी नृत्याचे जनक. वारी नृत्याचे जनक राजू बाबा शेख यांचे संपूर्ण नाव शेख रियाजउद्दीन अब्दुलगनी असे आहे. राम रहीम एक है असा संदेश घेऊन गावोगावच्या कीर्तन सप्ताहामध्ये तसेच पंढरीच्या वारीमध्ये प्रबोधन घडविणारे वारीनृत्याचे जनक राजू बाबा शेख हे जन्माने मुस्लीम पण वृत्तीने वारकरी होते. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील केज येथील आहे. राजूबाबा शेख यांचा जन्म गरीब मुस्लीम कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. चार भाऊ व एक बहीण असा त्यांचा मोठा परिवार होता. बालपणातच आपल्या आजोळी ते किसनराव पाटील यांच्याकडे अवघ्या सात वर्षाचे असताना कामाला लागले. किसनरावांच्या घरी पाणी भरणे, गुरे सांभाळणे ही कामे ते करीत.

जातीने मुस्लीम असल्याने त्यांना गावच्या श्रीराम मंदिरात प्रवेश नसे. परंतु राजूबाबांना भजनाची गोडी आहे ते मंदिराच्या पायऱ्यांशी बसून भजन ऐकत असतात असे पाहता मंदिरातील पुजारी शेषाद्री महाराज यांनी त्यांना मंदिरात बसून काही अंतर राखून मंदिरात भजन करण्याची परवानगी दिली. रानात काम करताना शाळेत जाणारी मुले त्यांना भेटत असतं. या मुलांकडे राजूबाबानीं शिकण्याची इच्छा प्रकट केली. मुले सकाळी जाताना पाटीवर अक्षरे लिहून द्यायची. राजूबाबा ही अक्षरे गिरवत पाठ करायचे. अशा प्रकारे त्यांनी अक्षर ओळख करून घेतली. विष्णू महाराज कोल्हापूरकर यांचेकडे अवघे आठ वर्षाचे असताना ते कीर्तन शिकले. नदीला पाणी भरायला जाताना ते घागरीचा तोल सांभाळीत त्यातूनच पुढे डोक्यावर पाण्याची भरलेली घागर घेऊन मुखी हरिनाम घेत राजूबाबा नृत्य करू लागले. त्यांचे हे नृत्य गुजरात आणि राजस्थानमधील भवारी नृत्यासारखे होते.

राजूबाबा संतांचे अभंग व गवळणी पाठ करू लागले. मामासाहेब दांडेकरांच्या अभंग मालिका वाचू लागले. गावातील लोक आधी उपेक्षा करायचे; परंतु एक दिवस गावकरी म्हणाले, कार्यक्रम करून दाखवा, मग राम मंदिरात कीर्तन करण्यास गावातील लोकांनी त्यांना परवानगी दिली. १५ वर्षे वयाचे असताना पहिला कार्यक्रम सादर आला. सर्वाना कार्यक्रम आवडला. गावकऱ्यांनी त्यांना ८० रुपये बिदागी दिली. एक रुपयासाठी महिनाभर गायी सांभाळाव्या लागत; परंतु त्या दिवशी एकदम ऐशीं रुपये हातात पडले. ते ताबडतोब पंढरपूरला आले आणि त्यांनी घागर, घुंगरू, पराती अशी खरेदी केली. पुढे पंचवीस वेळा चारधाम यात्रा केली.

श्रीरामपुरला सुमतीबाई लांडे यांनी त्यांचे कीर्तन ठेवले. त्यावेळी राजूबाबा प्रथम प्रकाशात आले. सहयाद्री वाहिनीवर दिंडी ह्या मालिकेत विजय तेंडुलकर यांनी राजूबाबांचे कीर्तन ठेवले. राजूबाबा अनेक कीर्तन सप्ताहात वारी नृत्याचे कार्यक्रम करू लागले. १९९८ साली परळी वैजनाथ येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजू बाबांनी वारी नृत्याचा कार्यक्रम केला. तसेच २००४ मध्ये नांदेड येथे आयोजित झालेल्या लोकोत्सव मध्ये राजूबाबांनी वारी नृत्याचा सादर केला. लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेतर्फे आयोजित झालेल्या लोककला संमेलनामध्ये राजूबाबांनी वारी नृत्याचा कार्यक्रम सादर केला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे नवी दिल्लीत सन २००० मध्ये आयोजित झालेल्या भारतरंग महोत्सवात राजूबाबांना कार्यक्रम सादर करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांच्या कलेचा, कार्याचा सन्मान म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. बालगंधर्व स्मृती पुरस्कार (१९८८), महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार (२०००), भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१३) इत्यादी महत्त्वाच्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

राजूबाबा शेख यांच्या पत्नीचे नाव शेख सायराबानू बेगम असे असून त्यांना २ मुलगे आणि ४ मुली आहेत. सहय्यद सहिदा चाँद, मुम्ताज़ गौंस अली, शेख नस्सरी निशा शेख अन्वर, पठाण यास्मिन राजे खाँ या मुली तर शेख दिलदार रायाज बाबा, शेख जाहेद रियाजउद्दीन अशी मुले आहेत. राजूबाबा शेख यांनी वारी नृत्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना जनमानसात रूढ केली व शेवटच्या श्वासापर्यंत वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू ठेवली.

संदर्भ :

  • खांडगे, शैला, अंतरीचे धावे मनोगत लोककलावंतांचे, संधिकाल प्रकाशन, मुंबई २०२०.