खेडकर, तुकाराम : (१९२८ – १८ एप्रिल १९६४). महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत. तमाशामहर्षी अशी त्यांची ओळख आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील तमाशाचा इतिहास समजून घेताना तुकाराम खेडकर यांचे नाव टाळून पुढे जाता येणार नाही असे अभ्यासकांचे मत आहे. बालाजी इंदुलकर व कासूबाई या दांपत्याचे हे अपत्य. कोकणातल्या खेड तालुक्यातले चिंचघर हे त्यांचे मूळ गाव. तमाशा सृष्टीत गावाचे नाव लावण्याची प्रथा असल्याने तुकाराम यांनी आपला तमाशा सुरु केला तेव्हापासून खेडकर हे नाव लावायला सुरुवात केली.
कोकणातून पोट भरण्यासाठी अनेक लोक मुंबईला येतात त्याप्रमाणे इंदुलकर कुटुंब मुंबईला आले होते. मुंबईत कापड गिरण्यांचा व्यवसाय प्रचंड भरभराटीला आला तेव्हा महाराष्ट्रातल्या गावोगावची मंडळी मुंबईला पोट भरण्यासाठी गेली. अशा गिरणी कामगारांसाठी गिरणगावात अनेक खानावळी चालायच्या. त्यात बालाजी इंदुलकरांची खानावळ प्रसिद्ध होती. लालबाग, परळ, भोईवाडा, भायखळा, वडाळा भागातले गिरणी कामगार, लालबागच्या हनुमान थियेटरमध्ये तमाशा घेऊन आलेले तमासगीर इंदुलकरांच्या खानावळीत जेवायला यायचे.

शंकरराव ढाकमोलीकर नावाचे फडमालक आपल्या कलाकारांसह इंदुलकरांच्या खानावळीत नेहमी यायचे. त्यांच्या तमाशात मदन नावाच्या नाच्या होता. तोही या खानावळीत यायचा. लहानगा तुकाराम सर्वांनाच आवडायचा. तुकाराम दहा बारा वर्षांचा असताना मुंबईत प्लेगची साथ सुरु झाली. यात त्याची धाकटी बहिण आणि त्यापाठोपाठ आई वडिलांचा मृत्यू झाला. तुकाराम अनाथ झाला. शंकर ढाकमोलीकरांनी तुकारामाला आपल्या तमाशात ठेऊन घेतलं आणि त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली. ढाकमोलीकरांनी तुकारामाला तमाशात नाच्या म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला पण तुकारामने थोड्याच दिवसात नाच्या म्हणून काम करण्यास ठाम नकार दिला. त्याचवेळी मदन नाच्याने जाहीर केले की आजपासून तुकाराम माझा मुलगा. मी त्याला सांभाळणार. तेव्हापासून मदन नाच्या तुकारामची मधु आई झाला. पुढे काही दिवसात तुकाराम खेडकर यांनी ढाकमोलीकरांच्या तमाशात पुरुषी भूमिका करायला सुरुवात केली. त्यावेळी पांडुरंग मुळे हे याच तमाशात नाच्या म्हणून काम करीत होते. वाढत्या वयाबरोबर तमाशात काम करणे कठीण झाले म्हणून मदन नाच्याने तमाशा सोडून आपल्या मूळ गावी जायचे ठरवले. आपल्याला माहित असलेले तमाशातले सर्व बारकावे शिकवून मदन नाच्याने तमाशा सृष्टीचा निरोप घेतला. खेडकरांनीही ढाकमोलीकरांच्या तमाशातून बाहेर पडून विठ्ठल कवठेकर यांच्यासोबत आपला स्वतःचा तमाशा फड सुरु केला. पांडुरंग मुळे हेही खेडकरांच्या तमाशात काम करायचे.

१९५५ च्या सुमारास खेडकरांच्या तमाशात एक कलाकार म्हणून कांताबाई सातारकर काम करू लागल्या. ऐतिहासिक वगनाट्ये सादर करण्यात खेडकरांचा हातखंडा होता. रायगडची राणी या वगनाट्यात तुकाराम खेडकर दुहेरी भूमिका साकारायचे. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर संभाजीराजे. याच वगात कांताबाई सोयराबाईची भूमिका करायच्या. खेडकर आणि कांताबाई या वगनाट्यामुळे तुकाराम खेडकर आणि कांताबाई ही जोडी महाराष्ट्रात प्रचंड गाजू लागली. पुढच्याच वर्षी गवळ्याची रंभा  हे वगनाट्य स्टेजवर आले. यालाही उदंड लोकप्रियता लाभली. याचदरम्यान तुकाराम खेडकर आणि कांताबाई हे खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी पैठणला विवाह केला.

१९५७ हे वर्ष सुरु झाले होते. महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात सुरु होती. महाराष्ट्राच्या खेडोपाडी आचार्य अत्रे, सेनापती बापट, दत्ता देशमुख, बॅरिस्टर नाथ पै आदींच्या सभा व्हायच्या. नाथ पै हे कोकणातले. त्यामुळे खेडकरांचा आणि त्यांचा उत्तम स्नेह होता. मुंबईत असताना त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोक जमवून सभा घेण्यासाठी तमाशा हे उत्तम माध्यम आहे हे लक्षात आल्यावर नाथ पै यांनी खेडकरांना शब्द टाकला. तमाशा कलाकारांचे सामाजिक भान हे नेहमीच जागे असते याचे प्रत्यंतर खेडकरांनी लगेचच दाखवून दिले. खेडकरांचा तमाशाची गण गवळण झाली की खेडकर स्वतः स्टेजवर यायचे आणि लोकांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल सांगायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खेडकरांच्या तमाशाच्या तंबूत अनेक सभा झाल्या. काटेकोर नियोजन, सर्वोत्तमाचा आग्रह यामुळे खेडकरांचा तमाशा महाराष्ट्रातील अग्रगण्य तमाशा म्हणून गणला जाऊ लागला. पुढे तमाशा सृष्टीत मोठे नाव मिळवणारे अनेक दिग्गज त्यावेळी खेडकरांच्या तमाशात काम करायचे. चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक, गुलाबराव बोरगावकर, साहेबराव नांदवळकर, शंकरराव कोकाटे, दगडूबा डोणगावकर, लक्ष्मणराव मराठवाडीकर ही सगळी मंडळी खेडकरांच्या तमाशात काम करायची. कुणी उत्तम लिहायचं, कुणी छान गायचं, कुणी छान अभिनय करायचं. शंकरराव कोकाटे तर कधीकाळी लालबाग भागातील नामचीन गुंड म्हणून ओळखला जायचा ; पण खेडकरांचा तमाशा मुंबईला आला की एखाद्या श्रद्धाळू भक्ताप्रमाणे तमाशाला येऊन बसायचा. खेडकरांच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या शंकरराव कोकाटेंनी पुढे खेडकरांचे शिष्यत्व पत्करले. थोड्याच दिवसात गुंडगिरी सोडून तमाशात काम करायला सुरुवात केली. महारथी कर्ण, रायगडची राणी, हरिश्चंद्र तारामती, मराठयांचं भगवं निशाण, सात पिढ्यांचं वैर, पानिपतचा सूड, कलंकिता मी धन्य झाले, बेरडाची औलाद, पाच तोफांची सलामी, विशाळगडची राणी, गवळ्याची रंभा असे पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक वगनाट्ये महाराष्ट्रभर गाजत होती.

एका पावसाळी सिझनमध्ये खेडकरांचा तमाशा लालबागच्या हनुमान थियेटरला आलेला होता. त्यावर्षी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचंड गाजलेले बेरडाची औलाद  हे वगनाट्य मुंबईतही लावले. खेडकरांनी या वगात सत्तू बेरडाची तर कांताबाई सगुणाची भूमिका करायच्या. या वगनाट्याची कीर्ती चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्यापर्यंत गेली. ते मुंबईला आले असताना हे वगनाट्य बघायला आले. सगुणाची भूमिका बघून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी खेडकरांना भेटून कांताबाईंना त्यांच्या चित्रपटात घेण्याची इच्छाही व्यक्त केली होती. अर्थात तमाशाच्या भवितव्याचा विचार करून खेडकरांनी हा विषय टाळला. लग्नानंतर चार वर्षात खेडकरांना अनिता आणि अलका या मुली झाल्या होत्या. पावसाळा नसताना राज्यभर तंबू लाऊन कार्यक्रम करायचे आणि पावसाळ्यात मुंबई किंवा पुण्यात बंदिस्त थिएटरमध्ये कार्यक्रम करायचे असा तमाशा कलावंतांचा वर्षानुवर्षाचा रिवाज होता. १९६१ मधील पावसाळ्यात मुंबईला हनुमान थियेटरला तमाशाचा मुक्काम असताना खेडकरांना मुलगा झाला. त्याचवेळी माधवराव नगरकरांचा तमाशाही हनुमान थियेटरला होता. त्यांनी नाग प्रसन्न रघुवीर  हे वगनाट्य बसवले होते. या वगनाट्यात छोटे बाळ म्हणून नगरकर एक कापडी बाहुली वापरायचे. एक दिवस वग सुरु झाला आणि नगरकरांनी कापडी बाहुलीऐवजी कांताबाईंच्या मांडीवरच्या पाच दिवसाच्या बाळाला स्टेजवर नेले. वयाच्या पाचव्या दिवशी आपल्या मुलाचा तमाशा रंगभूमीवरचा प्रवेश खेडकरांनाही सुखाहून गेलं. त्या दिवसापासून नगरकरांच्या वगनाट्याच्या नावावरून बाळाला सगळेजण रघुवीर म्हणू लागले. जन्मानंतर बाराव्या दिवशी बाळाचे बारसे ठरले. खेडकरांचे मित्र असलेले ज्येष्ठ संगीतकार वसंतराव पवार खास बाळाचा पाळणा म्हणायला आले होते.

रघुवीरच्या पाठीवर खेडकरांना आणखी एक मुलगी झाली. तिचे नाव मंदा ठेवले. मंदाच्या जन्मानंतर काही महिन्यात खेडकरांचा तमाशा नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेला. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात बोकटा गावात खेडकरांच्या तमाशाचा कार्यक्रम होता. रात्री वगनाट्य सुरु होण्यापूर्वी खेडकरांना जुलाबाचा त्रास होऊ लागला. पण काहीही झाले तरी वग करायचाच म्हणून खेडकर अंगात उभे राहण्याचे त्राण नसतानाही स्टेजवर गेले. कसेबसे वगनाट्य पूर्ण केले. तमाशा संपल्यावर त्यांची तब्येत अधिकच बिघडली. तातडीने पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला नेत असतांना वाटेत त्यांचे निधन झाले.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन